Tuesday, September 6, 2011

दिनविशेष : ६ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या आठवड्याचे

६ सप्टेंबर
१. सांगली जिल्हयातील ज्येष्ठ वृक्षमित्र व सागरेश्वर अभयारण्याचे शिल्पकार धोंडिराम महादेव मोहिते यांचे निधन. (२०००)
२. मराठी भाषेतील चरित्रकार व संत महिपती बुवा ताहराबादकर यांनी समाधी घेतली. (१७९०)
३. जुन्या जमान्यातील मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री कमलाबाई (बेबी) गोखले यांचा जन्म. (१९०१)
४. कोल्हापुर संस्थानातील सर्व सार्वजनिक ठिकाणे व विहिरी शाहूमहाराजांनी दलितांसाठी खुल्या केल्या. (१९१९)
५. भारताचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. १९४८ च्या ऑस्ट्रेलियातील दौर्‍यात ते सहभागी होते. (१९७९)
इतरः
अ. पदार्थाचे सर्वात छोटे मूलकण म्हणजे अणु - या अणुसिध्दान्ताचा जनक जॉन डॉल्टनचा जन्म. (१७७६)
ब. सुप्रसिद्ध जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे निधन. (१९९८)
७ सप्टेंबर:
१. संस्कृतचे गाढे पंडित, आधुनिक मुंबई शहराचा पाया घालणारे कार्यकत्यापैकी एक आणि कुष्ठरोगावर औषधोपचार करणारे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. भाऊ दाजी लाड यांचा जन्म (१८२४)
२. हिंदुस्थानी परंपरेतील सुप्रसिध्द गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म. (१८४९)
३. पहिली स्वदेशी बॅंक प्रस्थापित, बॅंक ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. (१९०६)
४. सुप्रसिध्द डॉक्टर व सामाजिक कार्यकत्र्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (१९२७)
८ सप्टेंबर:
१. संत मुक्ताबाईचा जन्म. (१२७९)
२. ब्रिटिशाविरुध्दच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ जणांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी देण्यात आले. (१८५७)
३. टिळकांवरील राजदोहाच्या पहिल्या खटल्यास प्रारंभ. (१८९७)
४. शेगावच्या श्री गजानन महाराजांचे महानिर्वाण. (१९१०)
५. मराठी संगीतविश्वावर अविस्मरणिय छाप उमटवणारी पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म. (१९३३)
६. कविवर्य वा. रा. कांत यांचे निधन. (१९९१)
७. पहिल्या महिला जैवरसायनशास्त्रज्ञ डॉ. श्रीमती कमला सोहोनी यांचे निधन. (१९९७)
८. महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे आध्यात्मिक मार्गदर्शक , गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे निधन. (१९९९)
इतरः
अ. कॅरबियन सागरातील झंझावती वादळाने सागरातच २०० कोटी टन पाऊस पडला, त्यामुळे आलेल्या प्रचंड लाटेन टेक्सासमधील ४५०० व्यक्ती वाहून गेल्या. (१९००)
ब. फिरोज गांधी यांचे निधन. (विमान अपघात? की घातपात? )
९ सप्टेंबर:
१. रविकिरण मंडळाच्या 'किरण' या पहिल्या संग्रहाचे प्रकाशन. (१९२३) - १९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते
इतरः
अ. ब्रिटिशांविरुध्द लढणार्‍या तेरा राज्यांच्या युतीस 'युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ' असे म्हणण्याचा निर्णय अमेरिकन कॉंग्रेसने घेतला. (१७७६)
१० सप्टेंबर :
इतर :
अ. कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद यांनी पाकविरुध्दच्या युध्दात खेमकरण विभागात शत्रूच्या रणगाडयांमधून होणार्‍या बॉंबवर्षावाला न जुमानता आघाडीवर असलेला शत्रूचा रणगाडा उद्ध्वस्त केला व लगेच जागा बदलून दुसर्‍या रणगाडयाला नष्ट केले. या कारवाईत त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देऊन गौरविले गेले.
११ सप्टेंबर :
१. भूदान चळवळीचे जन्मदाते आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (१८९५)
२. आत्माराम रावजी देशपांडे र्ऊफ कवी अनिल यांचा जन्म. (१९०१)
३. मुंबईत प्रथमच 'बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅड ट्रॅमवेज' या कंपनीकडून विजेचे दिवे लागले. (१९०५)
४. मध्ययुगीन मराठी साहित्य व दख्खनी भाषेचे व्रतस्थ अभ्यासक आणि स्वातंत्र्यसैनिक डॉ. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांचे निधन. (२००१)
इतरः
अ. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे अतिरेक्यांनी विमाने आदळून उद्ध्वस्त केले. (२००१)

Ashok Patil Replies:
सागर यांच्या या आठवड्याच्या 'दिनविशेष' सदरातील पहिल्याच नोंदीने मला खूप आनंद झाला आहे, हे मुद्दाम नमून करीत आहे.
समाजातील अनेक घटकांसाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून जी लोकोपयोगी कामे चालविली जातात ती प्रामुख्याने 'मुलांमाणसा'साठी असे दिसते. पण धोंडिराम म. मोहिते यानी 'मानव' निर्मित जे 'सागरेश्वर अभयारण्य' निर्माण केले आहे त्याला इथल्या प्रत्येक सदस्याने केव्हा ना केव्हा तरी भेट देऊन त्या "साथी हाथ बढाना" संकल्पनेतून पूर्ण केलेल्या कार्याला तसेच ते करणार्‍या त्या 'वृक्षमित्रा' च्या प्रयत्नास सलाम केलाच पाहिजे असे मला मनापासून वाटते. श्री.मोहिते यांच्या कामाला त्यानंतर त्याचे महत्व जाणून सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावकर्‍यांनीही तितकीच मोलाची मदत केली आहे. मानवनिर्मित अभयारण्यात शासनाच्या वन विभागाने आजुबाजूच्या गावच्या सरहद्दीवरील कित्येक चौ.कि.मी. डोंगरावर असंख्य झाडे लावली असून पर्यावरण समतोलाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य जपले आहे. सुरुवातीच्या काळात या परिसरात अभयारण्य निर्माण करण्याच्या दृष्टीने याच परिसरातील लोकांनी पुढाकार घेऊन डोक्यावरुन पाणी आणून ओसाड डोंगरावर खड्डे खोदले व झाडे जतन केली हे तर केवळ अशक्य वाटणारी बाब. डोंगर कपारीतून झिरपणार्‍या पाण्याचा साठा करून घरी भरलेल्या घागरी आणण्याचे प्रकार आपल्याला माहीत असतात, पण घरात कष्टाने आणलेले पाणी परत डोंगरावर नेऊन ते त्या ओसाड ठिकाणी लावलेल्या झाडांना घालून त्यांचे जतन करणे हा प्रकार केवळ नवलाचा म्हणावा लागेल. वृक्षमित्र मोहिते यानी त्यासाठी कशाप्रकारे गावकर्‍यांना तयार केले असेल याची कल्पनाच केलेली बरी.
या भागाचे आता जंगलात रुपांतर होऊ लागले आहे. अनेक प्रकारचे वृक्ष आणि प्राणी या अभयारण्यात आढळतात. हरण, सांबर, कोल्हे, या प्राण्यांबरोबरच विविध पक्षीही अभयारण्यात मोठया प्रमाणात आहे.
धन्यवाद सागर.

दिनविशेष : २९,३० व ३१ ऑगस्ट

महिना संपतोय त्यामुळे फक्त ३ दिवसांचे दिनविशेष देत आहे. पुढे गुरुवारी सप्टेंबरच्या आठवड्याचे दिनविशेष देईन.
२९ ऑगस्टः
१. मराठीतील पहिली कादंबरी 'यमुना पर्यटन' लिहिणारे बाबा पद्मनजी यांचे निधन (१९०६)
२. शाहिर अमर शेख यांचे निधन. (१९६९)
३. 'बनगरवाडी' या कादंबरीमुळे लोकप्रिय झालेले लेखक व्यंकटेश माडगुळकर यांचे निधन. (२००१)
इतर पण महत्त्वाचे:
१. सन १८८२ मध्ये इंग्लंड हरल्यानंतर त्या कसोटीत वापरलेल्या बेलची (यष्टिविट्टया ) राख करुन ऑस्ट्रेलियास भेट देण्यात आली. त्यामुळे १८८३ मधले कसोटी सामने 'अ‍ॅशेस' म्हणून संबोधण्यात आले आणि अ‍ॅशेस मालिका सुरु झाली
२. सन १९०५ मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म...
३० ऑगस्टः
१. 'काका , मला वाचवा,' अशी रघुनाथरावांच्या नावाने धावा करणार्‍या नारायण पेशव्याची गारद्यांकडून हत्या. (१७७३)
२. महाराष्ट्रातील अग्रगण्य कायदेपंडित, नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भवानी शंकर नियोगी यांचा जन्म. (१८८६)
३. 'गोटया', 'दाजी' अशा मराठीतील अजरामर व्यक्तीरेखा जन्माला घालणारे लेखक ना. धो. ताम्हणकर यांचा जन्म. (१८९३)
४. महामहोपाध्याय व प्रख्यात वक्ते बाळशास्त्री हरदास यांचा जन्म. (१९१८)
५. ख्यातनाम संगीतकार व भावगीत गायक दशरथ पुजारी यांचा जन्म. दशरथ पुजारी यांनी भावगीत, भक्तिगीते , अभंग , लावण्या, नाटय गीते, समर गीते अशा विविध गान प्रकारांवर स्वत:ची मुद्रा उमटवलेली आहे. पुजारी यांनी स्वरबध्द केलेल्या गीतांची संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त भरते (१९३०)
६. 'चाफा बोलेना' या अजरामर कवितेचे कवी नारायण मुरलीधर गुप्ते - 'बी' (टोपणनाव) यांचे निधन. - (१९४७)
३१ ऑगस्टः
इतर पण महत्त्वाचे:
१. १९६८ - सर गारफील्ड सोबर्स यांनी एका षटकात ६ षटकार फटकावले.
२. ब्रिटीश राजघराण्यातील सौंदर्यवती 'प्रिन्सेस डायना' चे अपघाती निधन..


Ashok Patil Replies:
सागर ~ ज्या घटना एरव्ही दुर्लक्षिल्या गेल्या असत्या त्या तुमच्या या अनोख्या धाग्यामुळे प्रकर्षाने समोर येत आहेत हे पुन्हा एकदा सांगणे भाग आहे आणि तुम्ही आपले नित्याचे काम सांभाळून ही माहिती गोळा करता हे आणखीन् एक वैशिष्ट्य.
आता काहीसे या तीन दिवसातील तपशीलाबद्दल :
१. मराठीतील पहिली कादंबरी 'यमुना पर्यटन' लिहिणारे बाबा पद्मनजी यांचे निधन (१९०६) : खरे नाव बाबा पदमनजी [पुस्तकावरही असेच नाव आहे]
३. 'बनगरवाडी' या कादंबरीमुळे लोकप्रिय झालेले लेखक..... : असा उल्लेख करणे म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांच्या 'माणदेशी माणसं' वर अन्याय होईल. 'बनगरवाडी' चे प्रथम प्रकाशन 'मौज' च्या १९५४ च्या दिवाळी अंकात तर पुस्तक रूपात ते डिसेंबर १९५५ मध्ये आले. पण त्या अगोदर १९४८ मध्ये 'माणदेशी माणसं' सार्‍या महाराष्ट्रात गाजली.
'माणदेशी माणसं' बद्दल खुद्द व्यंकटेश माडगूळकर यानी लिहिले आहे : "माणदेशी माणसं" हे पुस्तक वयाची चाळिशी गाठेअल, त्याची गणना मराठीतील साहित्य-लेण्यांत होईल, असं मात्र मला वाटलं नव्हतं. काही पुस्तकं लेखकाला चकवून मोठी होतात, हेच खरं."
यावरून स्पष्ट होईलचे की व्यंकटेश माडगूळकर हे नाव सर्वत्र लोकप्रिय झाले ते 'माणदेशी माणसं' मुळेच.
असो.
३. सन १९०५ मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म... : सरकारतर्फे हा दिवस "क्रीडा दिन" म्हणून संपन्न होतो.
४. १९६८ - सर गारफील्ड सोबर्स यांनी एका षटकात ६ षटकार फटकावले. : यातील एक गंमत म्हणजे ग्लॅमॉर्गनच्या ज्या गोलंदाजाने ते सहा चेंडू टाकले त्याचे नाव 'माल्कम नॅश'. हा त्यानंतर कुठेच चमकला नाही, पण तो नेहमीच 'सर गारफिल्ड सोबर्स' यांच्याबाबत कृतज्ञ राहिला. कारण ? त्याच्या मते 'सोबर्समुळेच माझे नाव 'जागतिक रेकॉर्डे' मध्ये नोंदविले गेले'.
५. "डायना' बद्दल काय लिहावे ? तुम्ही केवळ "डायना" चा मृत्यु असे जरी लिहिले असते तरी ती सौंदर्यवती नजरेसमोर आलीच असती.

अरे सागरबाबा, धन्यवाद कशाबद्दल ? किंबहुना तू आमच्या डोक्याला या धाग्यानिमित्ताने काही खाद्य पुरवितोस त्याबद्दल इथले सदस्य तुलाच धन्यवाद देत असतात. असो.
१. २९ ऑगस्ट 'क्रिडा दिन' साजरा केला जातो हे वर आले आहेच. या दिनाचे आणखीन् एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी भारताचे राष्ट्रपती क्रिडा क्षेत्रातील 'अर्जुन', 'द्रोणाचार्य', 'खेल रत्न' आदी पुरस्कार त्या त्या विजेत्यांना राष्ट्रपती भवनात प्रदान करतात, हे माहीत असणे गरजेचे आहे. [यंदाच्या 'अर्जुन' वीरात आमच्या कोल्हापुरचे दोघे १. जलतरणपटू वीरधवल खाडे आणि २. नेमबाज कु.तेजस्विनी सावंत होते, ही आम्हा करवीरकरांसाठी एक विशेष बाब.]
२. कवि 'बी' यांचा उल्लेख तुम्ही केला आहे. इथे हे सांगणे गरजेचे आहे की 'बी' या टोपणनावाने दोघे लिखाण करीत असत. एक वरील कवि नारायण मुरलीधर गुप्ते तर दुसरे बाळकृष्ण अनंत भिडे. श्री.गुप्ते स्वतःला 'BEE' असे संबोधित तर श्री.भिडे यानी बाळकृष्ण मधील B घेतले होते.


Siddhu Patil Replies:
दिनविशेष माहिती दिल्यामुळे आमच्या ज्ञानात मोलाची भर पडली. अशीच माहिती शक्य असेल तर दररोज देत चला..
सन १८८२ मध्ये इंग्लंड हरल्यानंतर त्या कसोटीत वापरलेल्या बेलची (यष्टिविट्टया ) राख करुन ऑस्ट्रेलियास भेट देण्यात आली. त्यामुळे १८८३ मधले कसोटी सामने 'अ‍ॅशेस' म्हणून संबोधण्यात आले आणि अ‍ॅशेस मालिका सुरु झाली.
'अ‍ॅशेस'
१८८२ च्या कसोटी मालीकेमध्ये इंग्लंड हरल्यानंतर त्या कसोटीत वापरलेल्या यष्टिविट्टया ची राख करुन एका कुपीत भरुन ती कुपी ऑस्ट्रेलियास भेट देण्यात आली. तेव्हापासुन इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधील कसोटी मालीका म्हणजे 'अ‍ॅशेस'.
 

दिनविशेष : ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट

मी सुटीवर असल्याकारणाने दिनविशेष देऊ शकलो नाही. त्यामुळे ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट काळातील दिनविशेष देत आहे
११ ऑगस्टः
- प्रसिद्ध विदुषी लेखिका इरावती कर्वे यांचा स्मृतीदिन - यांनी लिहिलेली युगान्त , भोवरा , महाराष्ट्र एक अभ्यास, इ... अनेक पुस्तके गाजली. (१९७०)
- भिंगारकर देशमुखांनी चार हजार रुपयांसाठी इंग्रजांना नगर किल्ल्यात कसे शिरावे, याची माहिती दिली आणि इंग्रजांनी तो किल्ला सहज जिंकला. (१८०३)
- ज्येष्ठ पत्रकार व लेखक वि. स. वाळिंबे यांचा जन्म. (१९२८)
- 'भारत छोडो' आंदोलनाला उग्र रुप. मुंबईत चार ठिकाणी गोळीबार. (१९४२)
- ज्येष्ठ क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचे निधन. (१९९९) - सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी घडवलेला पहिला कसोटी क्रिकेटपटू म्हणून हे ओळखले जात.
१२ ऑगस्ट :
- पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म. (१८७२)
- लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात यांचा जन्म. (१९०६) - लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात हे ’चीफ ऑफ जनरल स्टाफ’ या पदावर होते
- चलेजाव चळवळीत पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार - दोन ठार १६ जखमी (१९४२ )
- सर विठ्ठलदास ठाकरसी यांचे निधन एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ यांच्याच देणगीतून साकार झाले. त्यांनी महर्षी कर्वे यांना यासाठी १५ लाख दिले होते. (१९२२)
- प्रख्यात लेखक आणि वक्ते बाळशास्त्री हरदास यांचा मृत्यु. (१९६८)
- पहिली जागतिक मराठी परिषद सूरु. अध्यक्ष होते कविवर्य कुसूमाग्रज. (१९८९ )
१३ ऑगस्टः
- बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे - यांचा जन्मदिवस (१८९०) - खानदेशातील काळ्या मातीत या अत्भुत कवीरत्नाचा जन्म.
(मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यांचा गौरव होतो. अवघी १० वर्षांची लेखनकारकीर्द आणि अजरामर होण्या एवढे लेखनकौशल्य )
- पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे निधन (१७९५) 
- आचार्य अत्रे (प्रल्हाद केशव अत्रे) यांचा जन्म. (१८९८) - व्यासंगी, प्रभावी लेखक आणि वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमूल्य योगदान, असे हरहुन्नरी प्रतिभावंत.
- साहित्यिक विश्राम बेडेकर यांचा जन्म. (१९०६) - यांच्या रणांगण या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
- ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते. (१९८८)
- नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले. (२००४) अभूतपूर्व आणि अविस्मरणीय घटना
१४ ऑगस्ट:
- मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. (१८६१)
- 'ठणठणपाळ' नावाने प्रसिद्ध लेखक, साहित्यिक व नाटककार जयवंत दळवी यांचा जन्म. (१९२५)
१५ ऑगस्ट:
- भारताचा स्वातंत्र्यदिन मुंबईत दिमाखाने साजरा (१९४७) - हेच चित्र सर्व महाराष्ट्रात होते. सर्वत्र दिवाळीच्या सणासारखे वातावरण होते.
१७ ऑगस्ट - हा थरारक दिवस कोण विसरेल बरे?
- छत्रपति शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कावेबाज पकडीतून आणि त्याच्याच साम्राज्यातून केलेली स्वत:ची आणि बालसंभाजीची यशस्वी आणि थरारक सुटका. (१६६६)
- शिक्षणतज्ज्ञ गुरुवर्य बाबूराव जगताप यांचा जन्म (१८८८) - यांच्याबद्दल दुर्दैवाने मला फारशी माहिती उपलब्ध झाली नाही. ज्यांच्याकडे ही माहिती असेल त्यांनी कृपया द्यावी.
१८ ऑगस्ट:
- पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्म. (१७००) - प्रचंड पराक्रमी असले तरी मस्तानी साठी जास्त (कु)प्रसिद्ध झाले. पण मराठी साम्राज्याच्या पेशवाईची मुहुर्तमेढ याच पेशव्यानी रोवली.
१९ ऑगस्ट :
- सुप्रसिध्द मराठी अभिनेते मास्टर विनायक यांचे निधन (१९४७ )
- पुण्याचे जगप्रसिध्द जादूगार रघुवीर (भोपळे) यांचे निधन. (१९८४)
२० ऑगस्टः
- महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांचा जन्म. (१२२१)
- पेशवाईतील पराक्रमी सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांचे निधन. (१७६७)
२१ ऑगस्ट :
- मुंबईचे राज्यपाल माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी मराठीतून शिक्षण देण्यासाठी जनहितार्थ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था व शाळा स्थापन केली. (१८२२)
- सेवासदन' या संस्थेचे संस्थापक गोपाळकृष्ण देवधर यांचा जन्म. (१८७१)
- महाराष्ट्र्रीय चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्म. (१९१०)
- विष्णू दिगंबर पलूस्कर स्मृतीदिन (१९३१) - महर्षितुल्य , संगीत प्रसारक , गायनाचार्य पंडित म्हणून हे ओळखले जात.
- भारताचे गाजलेले अष्टपैलू क्रिकेटपटू विनू मांकड यांचे निधन. (१९७८)
२२ ऑगस्ट :
- मराठी चित्रपट व नाटयसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुर्यकांत मांढरे यांचे निधन.



सागर ~ या निमित्ताने कित्येक गोष्टींना उजाळा मिळतो, हे या अनोख्या धाग्याचे वैशिष्ठ्य ठरत आहे.
अभिनेते सूर्यकांत यांच्या स्मृतीदिनानिमित्य एक आठवण जागी झाली. इथे तिच्याविषयी थोडेसे लिहिले तर तुम्हाला गैर वाटणार नाही अशी आशा आहे.
पडद्यावर अन्यायाविरूध्द मुठी उंचावून लढणारा रांगडा नायक दाखविणार्‍या या आमच्या कोल्हापुरच्या तितक्याच रांगड्या नायकाला मात्र प्रत्यक्ष जीवनात कोर्टकचेर्‍यांने जेरीस आणले होते. १९८८ च्या आगेमागे सदनिकेसाठी पैसे भरल्यावर बिल्डरने अंतर्गत सजावटीसाठी जवळजवळ दोन लाख श्री.सूर्यकांत यांच्याकडून घेऊन ते हडप केले होते आणि रिकामा फ्लॅट त्याना देऊ केला होता. त्या अन्यायाविरूद्ध संतापून जाऊन ते कोर्टात गेले होते. पण नित्याच्या त्या 'दे तारीख पे तारीख...तारीख पे तारीख' असे करत करत त्याना कोर्टाकडून न्याय मिळायला तब्बल नऊ वर्षे लागली....आणि ज्यावेळी निकाल त्यांच्या बाजूने लागला त्या अगोदर तीन वर्षे त्यांचा मृत्यू झाला होता. [कोल्हापूरात फार चर्चिला गेला होता हा प्रसंग. करवीरकरांचे खूप प्रेम होते चंद्रकांत आणि सूर्यकांत या बंधूंवर ]
Real Life आणि Reel Life मधील हा फरक मन विषण्ण करतो.

धन्यवाद सागर.
का कोण जाणे, माझा असा समज झाला होता की तुम्ही देत असलेल्या 'दिन विशेष' मध्ये अधिकची [किंवा त्या त्या व्यक्तीच्या अप्रकाशित घटनांविषयी] माहिती देणे उचित नसते. पण ज्याअर्थी व्यवस्थापक तसेच धागाकर्ते म्हणजे तुम्ही 'सूर्यकांत' विषयी आक्षेप घेतलेला नाही, त्याअर्थी तशी माहिती देणे गैर नाही.
असो. वर तुम्ही 'गुरुवर्य बाबुराव जगताप' यांच्याबाबत काही माहिती असल्यास द्यावी असे सुचविले आहे. कोल्हापूरातील शैक्षणिक सुधारणाच्याबाबतीत त्यांचाही वाटा होता. मागे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु एम.जी.ताकवले यांना 'गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार' मिळाला त्यावेळी अवॉर्डच्या निमित्ताने श्री.जगताप यांच्या कार्याविषयीही माहिती [जरी अल्प असली तरी] मिळाली होती.
१८९३ मध्ये जन्म झालेल्या बाबुरावानी १९१४ मध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या पदरी बडोद्यात ए.डी.सी. म्हणून सेवेत रूजू झाले. तेथील अनुभवाच्या आधारावर १९१८ मध्ये पुण्यात येऊन त्यानी 'श्री शिवाजी मराठा हायस्कूल' ची स्थापना केली. शिक्षकी पेशात उतरणार्‍या युवकांनी 'बी.एड.' चे शिक्षण घेणे गरजेचे आहे याचा त्यानी सातत्याने पाठपुरावा केला होता. निव्वळ त्याच विषयाला वाहिलेले 'शिक्षक' नावाचे मॅगेझिन त्यानी तब्बल ४० वर्षे चालविले होते. शासनाच्या पाठयपुस्तक मंडळाने पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गांसाठी श्री.जगताप यानी संपादित केलेली पाठयपुस्तके अभ्यासक्रमात लावली होती, हे त्यांचे फार मोठे योगदान होते. पुणे जिल्हा शिक्षण बोर्डाचे ते सलग ५ वर्षे अध्यक्ष होते तर सरकारने 'कोल्हापूर संस्थाना'चे एज्युकेशनल डायरेक्टर म्हणूनही त्यांची नियुक्ती केली होती. त्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील दूरस्थ भागातील मुलांनी 'फ्री बोर्डिंग' मध्ये प्रवेश घेऊन आपली शैक्षणिक उन्नती करावी यासाठी त्यानी प्रचार केला होता. लॉ बोर्डाच्या कमिशनर पदीही त्यांची सरकारने काही काळासाठी नियुक्ती केली होती. १९६२ मध्ये ते पुण्याचे महापौर म्हणून निवडले गेले होते.
१ आक्टोबर १९७८ ला पुण्यात त्यांचे निधन झाले.
पुण्याच्या शुक्रवार पेठेत त्यांचा पुतळाही उभा करण्यात आला आहे.
 
 

दिनविशेष : ३ ऑगस्ट

आज ३ ऑगस्ट , आजचे दिनविशेष पाहूयात
१. क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती
३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव या लहानशा गावी क्रांतीसिहांचा जन्म झाला.
नाना पाटील हे प्रतिसरकारच्या माध्यमातून ग्रामीण जनतेत ‘स्वातंत्र्य’ मूल्य रुजवणारे क्रांतिकारक आणि बहुजन समाजाला विकासाकडे नेण्याचा सक्रियतेने प्रयत्न करणारे राजकीय नेते होते त्यांच्या या कार्यामुळेच ते क्रांतिसिंह म्हणून ओळखले जातात.
नानांनी तुफानी सेना ही सशस्त्र क्रांतीकारकांची संघटना बांधली व या सेनेच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडले.
ब्रिटीश सत्तेचा प्राण असणार्‍या रेल्वे, पोस्ट , इत्यादी सेवांवर हल्ले करून, ब्रिटीशांचा खजिना लुटून नानांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याचा उपयोग केला.
शूरा मी वंदिले
या महान क्रांतिसिंहाला कोटी कोटी नमन.

दिनविशेष : २ ऑगस्ट

दिनविशेष २ ऑगस्ट :
आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात.
१. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलतज्ज्ञ व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. ( १९३०) यांनी गणिताच्या आधारे प्लुटो ग्रहाचा शोध लावला. आणि त्याचे महत्त्व तत्कालीन विद्वानांना पटवूनही दिले. पण अर्थातच भारतीय ज्योतिष पाश्चात्य विद्वान कायमच दुर्लक्षित करत आले आहेत त्यामुळे प्लुटोचा शोध लावण्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही. खगोलशास्त्राच्या इतिहासात व्यंकटेश बापूजी केतकर यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात तरी सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. ग्रहगणित या ग्रंथाचे कर्ते
२. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखाराम बापू बोकील यांचे निधन. ( १७८१ )
३. मुंबईतील ईस्ट इंडिया कंपनी बंद करुन व्हिक्टोरिया राणीने भारताच्या सत्तेची सूत्रे स्वत:कडे घेतली. (१८५८)
४. मराठी थोर साहित्यिक पु. शि. रेगे यांचा जन्म. (१९१०) - यांच्या भावकविता खूप प्रसिद्ध होत्या
५. प्रसिध्द गीतकार आणि शायर शकील बदायुनी यांचा जन्म. त्यांची 'दर्द', 'मदर ईडिया', ';उडन खटोला' , 'मेरे मेहबूब' वगैरे चित्रपटांतील गाणी कमालीची गाजलेली आहेत . (१९१६)
६. नगर जिल्हयातील डॉ. आरोळे पती-पत्नींना मेगॅसेसे अ‍ॅर्वॉड जाहिर. (१९७९) यांच्या कार्याची माहिती या दुव्यावर मिळेल

दिनविशेष : १ ऑगस्ट

आज तीन महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या
१. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी
२. अण्णाभाऊ साठे जयंती
३. असहकार चळवळ दिन
महाराष्ट्राच्या इतिहासात सोन्याचे पान लिहिणार्‍या या सर्व वीरांना मानवंदना