Tuesday, May 15, 2012

जन-गण-मन राष्ट्रगीताची शताब्दी

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

आज २७ डिसेंबर २०११.
शंभर वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी २७ डिसेंबर १९११ रोजी जन-गण-मन हे गीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथील कार्यक्रमात सर्वात पहिल्यांदा गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत रचलेले हे गीत भारताचे राष्ट्रगीत होईल असे त्यावेळी कोणाला वाटले असेल काय? टागोरांनी हे गीत कधी रचले ते माहित नाही. पण शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच ते सार्वजनिक झाले त्यामुळे या गीताच्या सार्वजनिक आयुष्याचा आज शताब्दी दिवस आहे.

जय हिंद ... जय भारत...

भारताचे राष्ट्रगीत म्हणून जन-गण-मन या गीताचे पहिले कडवेच म्हटले जाते व त्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता २४ जानेवारी १९५० रोजी मिळाली.

या गीतातील सिंध आता सध्याच्या पाकीस्तान मधे असल्यामुळे 'सिंध' हा शब्द बदलून 'सिक्कीम' टाकायचा प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन आहे. हा या संदर्भातील माहितीचा दुवा

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे...

जनमनगण हे संपूर्ण गीतः

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||

पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दु:स्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दु:ख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||

रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||

स्त्रोतः विकी

===========

माझे परमस्नेही श्री. अशोक पाटील यांनी जन-गण-मन या गीतामागचा उलगडलेला हा सत्य इतिहास

"त्या" गीताच्या इतिहासाबद्दल खूप लिहिले गेले आहेच यापूर्वीही, पण भारत सरकारच्या प्रसिद्धी संचालनालयाद्वारेच प्रकाशित झालेल्या Collected Works of Rabindranath Tagore मध्ये ज्या पत्राचा उल्लेख केला गेला आहे, त्यातील मजकूर वाचल्यानंतर त्यापुढे कसल्याही अन्य चर्चेचे प्रयोजन उरत नाही.

इंडियन नॅशनल कॉन्ग्रेसने १९११ मध्ये कलकत्ता इथे भरलेल्या वार्षिक अधिवेशनासाठी किंग जॉर्ज यांच्या स्तुतीप्रित्यर्थ एक स्वागतगीतसम गाणे टागोरांनी लिहून द्यावे अशी विनंती 'एका सर्टन हाय ऑफिशिअल" मार्फत त्यांना करण्यात आली (हा सर्टन हाय ऑफिशिअल म्हणजे पंडित नेहरू असावेत असा कयास नंतर मांडण्यात आला). या विनंतीमुळे जरी टागोर अस्वस्थ झाले तरी त्यानी हे गीत लिहिले, त्यात एम्पररची स्तुती नसून 'भारतमातेला समृद्ध करणारी जी कुणी अज्ञात दैवी शक्ती आहे' तिची आराधना केली आहे. आपले मित्र श्री.पुलिनबिहारी सेन याना लिहिलेले रविन्द्रनाथांचे खालील पत्र वाचा :

In a letter to Pulin Behari Sen, Tagore later wrote, “A certain high official in His Majesty’s service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Vidhata of India who has from age after age held steadfast the reins of India’s chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the
Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song."

पुढे १९१३ मध्ये टागोरांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांचे नाव सर्वतोमुखी होणे साहजिकच होते. विविध ठिकाणाहून इंग्रजी, बंगाली, हिंदी भाषांतून त्यांच्या अनेकविध साहित्याचे प्रकाशनही नियमित होत गेले. १९१९ मध्ये तर ब्रिटिश आधिपत्याखाली चालत असलेल्या शाळांमधून 'जन-गण-मन' चे रुपांतर Morning Song of India या शीर्षकाखाली झाले आणि सकाळच्या प्रार्थनेसाठी त्याचा उपयोग सुरू झाला.

पुढे १९४२ च्या म.गांधींच्या 'चले जाव' चळवळीला मिळालेले यश पाहून भारतवासियांची खात्री झाली होती की आज ना उद्या (दुसरे महायुद्ध समाप्तीनंतर) देश स्वतंत्र होणारच असल्याने त्याला पूरक असे राष्ट्रगीत तयार करणे गरजेचे आहे. अशावेळी पं.नेहरू यानीच पुढाकार घेऊन गुरुदेवांच्या या प्रदीर्घ गीतातील पहिल्या कडव्याचा त्या कारणासाठी विचार करायला आपल्या पक्षाला सांगितले, जे पुढे सर्वानुमते मान्य करण्यात आले. तेव्हा जरी ते गीत पंचम जॉर्ज यांच्या भेटीच्या निमित्ताने रचले गेले असले तरी ते त्यांची स्तुतीदर्शक होते असे मानू नये, कारण खुद्द टागोरांनीच त्या समजाचे लेखी स्वरूपात खंडन केले असल्याने तो विषय संपला. आपण घटना पवित्र मानतो आणि त्यानुसारच एक सुजाण नागरिक म्हणून आपले वर्तन ठेवतो. मग त्याच घटनेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेले "जन-गण-मन" सर्वांसाठी पवित्रच आहे, आणि म्हणून त्याचा सदैव आदर राखणे नितांत गरजेचे आहे.

भारतच नव्हे तर बांगला देशानेही १९७१ च्या स्वातंत्र्यानंतर आपले म्हणून जे राष्ट्रगीत निवडले ते "आमार शोनार बांगलादेश" ज्याची रचना तसेच चालही गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर यांचीच आहे आणि बांगलादेशी नागरिक ते गीत अभिमानाने आणि आदराने म्हणतात.

-अशोक पाटील

==========

वाचल्याबरोबर नष्ट होणारा ई-मेल संदेश

वाचल्याबरोबर नष्ट होणारा ई-मेल संदेश याबद्दल किती जणांना माहिती आहे हे मला माहित नाही, त्यामुळे मीमराठीच्या मित्र-मैत्रिणींसाठी हा दुवा व थोडी माहिती देतो आहे.

दुवा : http://www.privnote.com/

ही सुविधा कशी वापरायची?:

आपला खाजगी संदेश त्या व्यक्तीशिवाय कोणालाही माहिती होऊ नये अथवा त्याचा चुकूनसुद्धा गैरवापर होऊ नये असे वाटत असेल तर ही साईट तुम्हाला मदत करु शकेल.

प्रक्रिया अगदी सोपी आहे.

या साईट वर तुमचा मजकूर टाईप करा व लगेच त्याची लिंक मिळवा. तुम्ही तुमच्या ई-मेल आयडी वरुन हव्या असलेल्या व्यक्तीला ती लिंक पाठवा.

तुमचा हा गुप्त संदेश तुम्ही ज्याला पाठवला त्या व्यक्तीने फक्त त्या लिंक वर क्लिक करायचे म्हणजे त्याला हा संदेश वाचता येईल. हे फक्त एकदाच करता येईल. एकदा का संदेश त्या व्यक्तीने वाचला की पुन्हा दुसर्‍यांदा त्याच व्यक्तीला तीच लिंक वापरुन देखील वाचता वा वापर करता येणार नाही. शिवाय त्या व्यक्तीने तुमचा संदेश वाचल्याची पोचपावती मात्र तुमच्या ई-मेल वर तुम्हाला अवश्य मिळेल..

आहे की नाही खरा गुप्त संदेश हास्य

तेव्हा ही सुविधा वापरा आणि गुप्त संदेश खर्‍या अर्थाने गुप्त ठेवा

!!! सावधान !!! ... आकाश घोटाळा येत आहे...

नुकतीच सकाळ मधील ही बातमी वाचली.

आपले सरकार म्हणे जगातील सर्वात स्वस्त असलेले आकाश टॅब्लेट् पीसी विद्यार्थ्यांना अकराशे रुपये या सवलत दरात देणार आहेत.
वाटले वा खूप स्तुत्य उपक्रम आहे.
नंतर म्हटले गणित करुन बघूया किती रक्कम यासाठी खर्च होते आहे ते?

ते गणित असे आहे:

१ टॅब्लेट् १,१००/- रुपयांना (फक्त विद्यार्थ्यांना) (विद्यार्थी नसलेल्यांना २,२०० का २,४०० रु. दर आहे)

याप्रमाणे
२२ हजार टॅब्लेट्स २ कोटी ४२ हजार रुपयांना
२२ लाख टॅब्लेट्स २४२ कोटी रुपयांना
२२ कोटी टॅब्लेट्स २४ हजार २०० कोटी रुपयांना

यापेक्षा पैशाची उधळपट्टी दुसरी ती कोणती?
चालू वर्षातील एक लाख युनिट्स ( ते ही त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रुटी असतानाही) ही संख्या वाढवून मागणी एकदम २२ कोटी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर नेऊन ठेवण्याची खरोखर गरज आहे काय?
या टॅब्लेट्सचा खप होण्याची हमी सरकार कोणत्या बळावर घेते आहे? भारताची लोकसंख्या मटावरील या बातमीप्रमाणे एक अब्ज २१ कोटी आहे.

१०० कोटी म्हणजे १ अब्ज यानुसार भारताची लोकसंख्या झाली १२१ कोटी
म्हणजे जवळपास सर्व लोकसंख्येच्या एक पंचमांश संख्येने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आकाश टॅब्लेट्वर खर्च करणे गरजेचे आणि आवश्यक आहे काय?
याचा अर्थ अगदी स्पष्ट आणि उघड आहे. २०१४ साली निवडणुका आहेत. त्याआधीच मोठी कमाई करुन घ्यायचा हा डाव आहे. समाजातील विचारवंत, विरोधी पक्षनेते आणि सर्वच थरातील लोकांनी या निर्णयाला विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आकाश टॅब्लेट ही काही गरज नाहिये, ही चैन आहे (ते ही त्यातील त्रुटी अजूनही दूर झालेल्या नसताना). त्यापेक्षा तेच पैसे शेती व इन्फ्रास्ट्रक्चर यांकडे वळवले तर त्याचा देशाच्या प्रगतीसाठी फायदा तरी आहे.
मी असे म्हणत नाही की आकाशची निर्मिती करुच नये. पण १ लाख टॅब्लेट्स वरुन हा आकडा आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या एक पंचमांश एवढा मोठ्या प्रमाणावर नेण्याची खरोखर गरज आहे काय?

त्यातही अजून भ्रष्टाचार होणार आहे. आकाश च्या निर्मितीची कंत्राटे कंपन्यांना देण्यासाठी कोट्यावधी रुपयांची लाच घेतली जाणार आहे.

महानरेगा, कॉमनवेल्थ, टेलिकॉम, हवाला, आणि भविष्यात आता आकाश घोटाळा समोर दिसतो आहे. मी मात्र सामान्य माणूस. गप्प बघत बसणार आहे. Sad

विचार पटले तर पसरवा अन्यथा ठळकवलेले वाक्य वाचा आणि मूग गिळून स्वस्थ बसा.

मानवंदना : वासुदेव बळवंत फडके

आज १७ फेब्रुवारी.
आजच्या पुण्यदिनी थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मरण न होणे अशक्यच. आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचे आणि प्राणांचे दिलेले अर्घ्य आजच्या धकाधकीच्या जीवनात विसरुन जात आहोत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या हा महान क्रांतिकारक १७ फेब्रुवारी १८८३ रोजी हुतात्मा झाला.

वासुदेव बळवंत फडके

२० जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदगी गावातील देवळात इंग्रज व फडके यांच्यात तुंबळ लढाई झाली. पण इंग्रजांनी पूर्ण घेराबंदी करुन वासुदेव बळवंत फडके यांना जिवंत पकडले. पुण्याच्या तुरुंगात ठेवून तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काका या नावाने प्रसिद्ध असलेले श्री.गणेश वासुदेव जोशी यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या काळात अशा क्रांतिकारकांचे निवाडे कसे होत हे सांगण्याची गरजच नाही. त्यामुळे नाममात्र खटला चालवायचा आणि क्रांतिकारकांना फासावर लटकवायचं हे इंग्रजांचं दडपशाहीचं धोरण होतं.

पण सार्वजनिक काकांनी केलेल्या युक्तीवादामुळे वासुदेव बळवंत फडके यांना फाशीची शिक्षा न होता त्याऐवजी त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. अरेबियातील एडन येथील तुरुंगात फडके यांना पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी आपल्या मातृभूमिकडे पलायन करायचा चंग बांधला. एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागर्‍यांसकट उचकटून काढून त्यांनी तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना पुन्हा पकडले व तुरुंगात टाकले.
तुरुंगात आपल्याला मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकी विरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी आमरण उपोषण केले व शेवटी त्यांना त्यातच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यू आला.

अशा या लढवय्या महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना माझी मानवंदना.

गुढीपाडव्याचे संवत्सरचक्र कसे चालते?

वाचकांनो,

आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नंदननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.
गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

यानिमित्ताने वाचकांना प्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते हे सांगायचा हा अल्पसा प्रयत्न

शके १९३४ या वर्षाचे नाव आहे नंदन. तर दरवर्षी शक संवत्सराचे नेमके नाव कसे ठरवले जाते? हे पाहण्यापूर्वी हिंदू पंचांगपद्धतीत कालगणना नेमकी कशी मोजली जाते ते उलट्या क्रमाने पाहूयात, म्हणजे हा ६० नावांचा गुंता सुटायला सोपा पडेल.

१ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.
१ शिवनिमिष म्हणजे विष्णूच्या १००० घटिका
१ विष्णूची घटका म्हणजे १००० ब्रह्माची आयुष्ये
१ ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य म्हणजे ३६००० कल्पे
१ कल्प अर्थात ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे १४ मनु
१ मनु म्हणजे ७१ महायुगे
१ महायुग म्हणजे ४ युगे
१ कृत युग म्हणजे ४८०० दिव्य वर्षे
१ त्रेता युग म्हणजे ३६०० दिव्य वर्षे
१ द्वापर युग म्हणजे २४०० दिव्यवर्षे
१ कलि युग म्हणजे १२०० दिव्य वर्षे
१ दिव्य वर्ष म्हणजे ३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे
१ संवत्सर चक्र म्हणजे ६० वर्षे (संवत्सरे)
(ही माहिती पुराणांतून दिलेली आहे)

हे गणित लक्षात आले म्हणजे एका संवत्सर चक्रात येणार्‍या ६० वर्षांच्या ६० नावे का ठरवली गेलीत याचे उत्तर मिळते. नेमकी हीच ६० नावे का? याचे उत्तर मात्र माझ्याजवळ सध्या नाहिये. त्यावर कधीतरी सवडीने अभ्यास करुन लिहिन.

शके १९३४ चे संवत्सरनाम नंदन आहे. जे मी पुढील यादीत ठळक केले आहेच. एकदा ही ६० नावे माहिती झाली की पुढील वर्षाचे म्हणजे शके १९३५ साठी कोणते संवत्सरनाम असेल हे तुम्ही स्वतःच ओळखू शकाल :)

६० वर्षांचे चक्र.

१. प्रभव
२. विभव
३. शुवल
४. प्रमोद
५. प्रजापति
६. अंगिरा
७. श्रीमुख
८. भाव
९. युवा
१०. धाता
११. ईश्वर
१२. बहुधान्य
१३. प्रमाथी
१४. विक्रम
१५. विश्व
१६. चित्रभानु
१७. सुभानु
१८. तारण
१९. पार्थिव
२०. व्यय
२१. सर्वजित्
२२. सर्वधारी
२३. विरोधी
२४. विकृत
२५. खर
२६. नन्दन
२७. विजय
२८. जय
२९. मन्मथ
३०. दुर्मुख
३१. हेमलम्ब
३२. विलम्ब
३३. विकारी
३४. शर्वरी
३५. प्लव
३६. शुभकृत्
३७. शोभन
३८. क्रोधी
३९. विश्वावसु
४०. पराभव
४१. प्लवंग
४२. कीलक
४३. सौम्य
४४. साधारण
४५. विरोधकृत्
४६. परिधावी
४७. प्रमादी
४८. आनन्द
४९. राक्षस
५०. नल
५१. पिंगल
५२. कालयुक्त
५३. सिद्धार्थ
५४. रौद्र
५५. दुर्मति
५६. दुन्दुभि
५७. रुधिरोद्गारी
५८. रक्ताक्ष
५९. क्रोधन
६०. क्षय


धन्यवाद,
- सागर भंडारे

पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?

तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.

तर आपल्या आवडत्या बालभारतीने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरुपात आणि तेही सर्व माध्यमांतील (मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, इत्यादी) उपलब्ध करुन दिलेली आहेत. आहे की नाही मज्जा? हास्य

येथे टिचकवा आणि हवी ती शाळेतील पुस्तके उतरवून घ्या

या पानावर टेक्स्ट बुक लायब्ररी हा पर्याय आहे त्यावर टिचकवा आणि पीडीएफ फुकट उतरवून घ्या

मी सध्या आठवीचे बालभारती वाचतो आहे wink

तुम्ही???

बालभारती

मराठी शब्दांचा खजिना वेबसाइटवर

दुवा : http://www.marathibhasha.com/

-------------------
मराठी शब्दांचा खजिना वेबसाइटवर
-------------------
परिभाषा कोशातील दोन लाख ७८ हजार शब्दांचा संग्रह खुला.
MarathiBhasha

वाढत्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे मराठीतील अनेक चपखल शब्द मागे पडू नयेत, यासाठी येथील 'समर्थ मराठी संस्थे'ने www.marathibhasha.com ही वेबसाइट तयार केली असून विविध क्षेत्रांत वापरल्या जाणार्‍या तब्बल दोन लाख ७८ हजार मराठी शब्दांचा संग्रह या निमित्ताने वेबसाइटवर उपलब्ध केला आहे.

महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील प्रचलित शब्दांवर आधारित ४२ परिभाषा कोष तयार केले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात मराठी विषयातील चारशेहून अधिक तज्ज्ञांचा सहभाग होता. मात्र, आता यातील अनेक पुस्तके उपलब्ध नाहीत, तसेच नागरिकांमध्येही याबाबत जागृती नाही. त्यामुळे या सर्व शब्दांचा संग्रह समाजासमोर पुन्हा एकदा खुला करावा, या उद्देशाने आम्ही या परिभाषा कोशातील २ लाख ७८ हजार शब्द वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहेत, अशी माहिती 'समर्थ मराठी संस्थे'चे अनिल गोरे यांनी दिली. मराठी भाषाप्रेमी संजय भगत यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले आहे.

' परिभाषेबरोबरच लवकरच वेबसाइटवर म्हणींचा शब्दकोशही प्रसिद्ध होणार आहे. याशिवाय बँका, विमा कंपन्या, कागदपत्र, अर्जांचे नमुने, दुकानदारांसाठी मराठीतील पावत्याही उपलब्ध करण्यात येणार आहेत,' असेही गोरे यांनी सांगितले. सदाशिव पेठेतील कुसुमाग्रज यांच्या जन्मस्थळी या वेबसाइटचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले

माहिती सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स - २७ फेब्रु. २०१२

सम्राट हर्षवर्धन

हूणांचे भारतातून समूळ उच्चाटन करुन टाकण्याचे श्रेय सम्राट हर्षवर्धनाकडे जाते. आपल्याला सम्राट हर्षवर्धन नाव किमान ऐकून तरी माहित असेन.
तर असा पराक्रमी 'हर्ष' हा 'सम्राट हर्षवर्धन' कसा झाला याची ही संक्षिप्त कहाणी आता बघूयात.

इसवी सन ६०५ च्या सुमारास ठाणेश्वराचा [यालाच स्थानेश्वर असेही म्हणतात] प्रभाकरवर्धन हा उत्तर हिंदुस्थानातील सर्वात प्रबळ राजा होता. त्याने हूण लोकांचे पारिपत्य केले. त्यास राज्यवर्धन हा ज्येष्ठ व हर्षवर्धन हा कनिष्ठ असे सर्वगुणसंपनदोन पुत्र होते. यापूर्वी हूणांचा पराभव करण्यासाठी ठाणेश्वराधिपतीला 'कनोज'च्या मौखरींचे सहाय्य मिळत असे. परंतु एकदा हूणांनी अचानक स्वारी केल्यामुळे त्यास मौखरींना कळविण्यास अवधी मिळाला नाही. तरी प्रभाकरवर्धनाने आपला ज्येष्ठ पुत्र राज्यवर्धन यास हूणांचा पराभव करण्यास पाठविले.

ठरल्याप्रमाणे राज्यवर्धन पिताश्रींची आज्ञा प्रमाण मानून हूणांचे पारिपत्य करण्यासाठी निघाला. राज्यवर्धन मोहिमेत यशस्वी झाला. हूणांचा पुरता पाडाव करुन राज्यवर्धन ठाणेश्वरास परत आला. वेशीवर येताच त्याचे स्वागत करण्यासाठी प्रभाकरवर्धन येण्याऐवजी त्याच्या निधनाची दु:खद बातमी आली.

प्रभाकरवर्धनच्या मृत्युची बातमी कळताच माळव्याच्या देवगुप्ताने कनोज वर स्वारी केली. या स्वारीत 'कनोज'चा अधिपती व राज्यवर्धनचा मेहुणा 'गृहवर्मा मौखरी' हा मारला गेला. आणि राज्यवर्धन व हर्षवर्धन या दोघा पराक्रमी भावांची एकुलती एक बहिण 'राजश्री' देवगुप्ताच्या हाती सापडली. ही बातमी कळताच पित्याच्या निधनाचा व बहिण विधवा झाल्याचा शोक न करता राज्यवर्धन देवगुप्तावर चालून गेला व त्याचा पराभव केला . परत येत असताना वाटेत बंगालच्या शशांकगुप्ताने - यालाच गौडेन्द्र हेही नाव होते - कपट करवून राज्यवर्धनचा घात केला.

हर्षवर्धन तेव्हा केवळ सोळा वर्षांचा कुमार होता. या अल्पवयात त्याच्यावर ठाणेश्वराचा अधिपती होण्याची जबाबदारी आली. येथूनच हर्षाच्या चरित्राला प्रारंभ होतो. हर्षवर्धनाने प्रतिकूल परिस्थितीत राजा होऊनही अतिशय यशस्वीपणे आलेल्या परिस्थितीला तोंड दिले. त्याने हूणांचे पूर्णपणे पारिपत्य केले. राज्यारोहणसमयी हर्ष अल्पवयीन होता तरी तो अतुल धैर्यवान, कुशाग्र बुद्धीचा व दैवशाली होता. राज्यारोहणानंतर हर्षवर्धनाने दिग्विजयासाठी प्रस्थानकेले, आपल्या सर्व शत्रूंचा त्याने सर्वप्रथम पाडाव केला. आणि त्यानंतर त्याने वाटचाल केली ती एकछत्री साम्राज्य निर्माण करण्यासाठी. आपल्या प्रचंड पराक्रमाने हर्षवर्धनाने भारतवर्षाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले आहे यात शंकाच नाही. सम्राट हर्षवर्धनाचा काळ हा इसवी सन ६०६ ते ६४८ असा मानला जातो.

'हर्षचरित' या बाणभट्टाने लिहिलेल्या सम्राट हर्षवर्धनच्या चरित्रात हा सर्व घटनाक्रम सविस्तरपणे येतो. चीनी प्रवासी ह्यूएनत्संगने याच काळात म्हणजे इसवी सन ६२८ ते ६४५ मध्ये भारतात भ्रमण केले . आणि त्याला भारताच्या प्रवासात कित्येक ठिकाणी सम्राट हर्षवर्धना बद्द्ल अनेक नोंदी मिळाल्या होत्या. त्याने त्या टिपून ठेवलेल्या आहेत. या सर्व मुख्य नोंदी बाणाच्या हर्षचरिताशी मेळ खातात. त्यामुळे सम्राट हर्षवर्धनावरच बाणभट्टाने हर्षचरित रचले होते याला एक सबळ पुरावाच मिळतो.

हर्षवर्धन आपल्या मोठ्या भावाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी बाहेर पडला होता. वाटेत त्याला प्राक् ज्योतिषपुर (आसाम) च्या राजकुमाराने प्रसन्न करुन त्याच्याशी मैत्री संपादन केली. त्यानंतर पुढे गौडेन्द्र शी कित्येक दिवस युद्ध चालले होते. अशातच हर्षवर्धनाला बातमी कळाली की त्याची बहिण राजश्री ही देवगुप्ताच्या कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी ठरली आहे व ति विंध्य पर्वतरांगांत कुठेतरी आहे. आपल्या सेनापतिंवर युद्धाची जबाबदारी सोपवून हर्षवर्धन स्वतः बहिणीला शोधायला विंध्याचलात आला. कितीतरी दिवस हर्षवर्धन आपल्या बहिणीचा शोध घेत विंध्याचलाच्या घनदाट जंगलांत फिरत होता. पण यश येत नव्हते. अशातच त्याची भेट जंगलाचा सामंत शरभकेतूचा मुलगा व्याघ्रकेतूशी झाली. व्याघ्रकेतूने त्याच्या दिमतीस असलेल्या निर्घात नावाच्या भिल्लाला हर्षवर्धनाच्या मदतीस दिले. निर्घातला जंगलातील कानेकोपरे अगदी व्यवस्थित माहिती होते. त्याच्या मदतीने हर्षाला कळाले की विंध्यवनाच्या मध्यभागी एक बौद्ध आश्रम आहे व तिथे राजश्री असण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन तेथे अगदी वेळेवर पोहोचला. कारण राजश्रीच्या पतीच्या निधनानंतर तिच्या भावाच्या - राज्यवर्धनाच्या - निधनाचेही वृत्त तिला कळाले होते व जीवनास कंटाळून ती आगीत उडी घेणार होती. नेमक्या त्याच वेळी हर्षवर्धनाने तिथे येऊन बहिणीचे प्राण वाचवले.

बहिण राजश्री सुखरुप सापडताच हर्षवर्धन आपला मोर्चा पुन्हा गौडेन्द्राचे पारिपत्य करण्याकडे वळवतो आणि येथेच हर्षचरित समाप्त होते.

हर्षचरित हे अनेक रसनिर्मिती करणारे आहे. बाणभट्टाने त्यानंतर लिहिलेली कादंबरी संस्कृत साहित्यातील एक मोठा मानदंड होऊन बसली व तिच्या छायेत बाणाची हर्षचरित ही कलाकृती झाकोळली गेली.

या लेखाचा मूळ उद्देश सम्राट हर्षवर्धनाच्या शौर्याची ओळख करुन देणे हा तर आहेच.
पण सम्राट हर्षवर्धनाच्या अगोदर त्याचे पिता प्रभाकरवर्धन आणि त्याचा मोठा भाऊ राज्यवर्धन हे देखील किती पराक्रमी होते याचीही ओळख वाचकांना करुन द्यावयाची होती.

हर्षवर्धनाचे लष्कर प्रचंड असल्याचे पुरावे आहेत. त्यावरुन जी माहिती मिळते ती अशी की १ लाख घोडदळ व ६० हजार हत्तीदळ त्यामध्ये होते. मौर्य साम्राज्य शिखरावर असतानाही एवढे लष्कर त्यांच्या पदरी नव्हते.
सम्राट हर्षवर्धनाचे साम्राज्य केवढे विशाल होते याची कल्पना पुढील नकाशावरुन नक्की येईन.

Monday, May 14, 2012

ब्लॉगचे प्रयोजन

नमस्कार वाचकहो,

या ब्लॉगद्वारे वैचारिक लेखन करणार आहे. माझ्या इतर ब्लॉग्सप्रमाणे याचे स्वरुप थोडे वेगळे असेल. परराष्ट्रकारण, धर्म, पुरातन मतमतांतरे ते सामाजिक प्रश्नांचा परामर्श यात घेतला जाईल.

- धन्यवाद,
सागर भंडारे

Friday, March 23, 2012

दिनविशेष : २७ फेब्रुवारी - 'जागतिक मराठी भाषा दिवस'

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान

असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणार्‍या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करायचे घोषित केले. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला आणि हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.

तेव्हा समस्त मराठी जनांना 'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा

जागतिक मराठी भाषा दिवस

कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना कुसुमाग्रजांना कधीही मानवली नाही. अनेकांनी त्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रयत्न केले. पण वाढदिवसाच्या आधी २ दिवस ते अज्ञातवासात निघून जात. परंतु त्यांच्या ८५ व्या वाढदिवशी मात्र त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेमाची भेट दिलीच.

कुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणे, तारे, तारकांचे वेड होते त्यामुळे अवकाशातील एका तार्‍यालाच त्यांनी कुसुमाग्रजांचे नाव दिले. स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत दि.२७ फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा (स्टार इन द गेट वे ऑफ हेवन्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. एवढयावरच त्यांचे चाहते थांबले नाहीत तर त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. आणि तो सिद्धीसही नेला.

Kusumagraj

नाशिक ही कवी आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. अनंत कान्हेरे, वीर सावरकर अशा क्रांतिवीरांचे धगधगते कुंड अशी एके काळी नाशिकची ओळख होती. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेने या क्रांतीचा ज्वाळांना शब्दांचा अंगार चढवून कवितेला स्वातंत्र्यलढय़ाच्या समरांगणात उतरवले. त्यांची ‘क्रांतीचा जयजयकार’ ही कविता तर स्वातंत्र्य- लढय़ातील सैनिकांचे स्तोत्र बनली होती. अशा या मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न करणार्‍या वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 'जागतिक मराठी भाषा दिवस' साजरा होतो आहे ही एक भाग्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे.

तेव्हा आजच्या या पुण्यदिनी ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे "अमृताशीही पैजा जिंकणार्‍या" आपल्या माय मराठीचे कौतुक करुयात आणि तिला दिवसेंदिवस वाढीस लावण्याची मनोमन प्रतिज्ञा घेऊयात.

कुसुमाग्रजांनादेखील मराठी भाषेतील त्यांच्या अनमोल योगदानाबद्दल आदरपूर्वक श्रद्धांजली

संदर्भ : विकी, महान्यूज, काही जालीय वृत्तपत्रे आणि कुसुमाग्रज.कॉम