Thursday, October 24, 2013

"दुनियादारी" चित्रपट - एक जमा-खर्च



हो नाही करत आज शेवटी एकदाचा दुनियादारी हा चित्रपट पाहिला.

चित्रपटाची (खरे तर सुशिंच्या कादंबरीतील) मूळ कथा गरजेनुसार बदलल्याचे सुरुवातीलाच दिग्दर्शकाने जाहीर केल्यामुळे एक स्वतंत्र कथानक म्हणून या चित्रपटाकडे बघणं ओघानं आलंच. त्यामुळे दिग्दर्शकाकडे दोष जात नाही. जमेच्या बाजूने चित्रपट आवडावा अशी चित्रपटात तीन प्रमुख कारणे आहेत.
१. अंकुश चौधरीचा अप्रतिम अभिनय. - अंकुशचा मला आवडलेला हा एकमेव चित्रपट. एन्ट्री पासून डिएसपी या पात्राला शेवटपर्यंत अंकुशने प्रेक्षकांच्या मनांत जिवंत ठेवलं हे त्याच्या अभिनयाचे यश.


२. चित्रपटाचा शेवट - अफलातून आहे. डोळ्यांत प्रचंड पाणी आणणारा - मूळ कथानकातील शेवट बदलून हा शेवट एका चित्रपटासाठी एकदम क्लायमॅक्स म्हणावा तसा प्रचंड परिणामकारक.
३. सर्व कलाकारांचे अभिनय त्यातल्या त्यात अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर यांचे अफलातून अभिनय

ही झाली जमा बाजू. आता मी ठरलो सुशि प्रेमी. या चित्रपटातील तोट्याची बाजू मी तरी बघणारच.

१. चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत असंबद्ध वाटला. सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' ही कादंबरी वाचल्यामुळे मला संगती लागली. इतरांना ती लावून घ्यावी लागली असणार याची खात्री आहे.
२. उस्फूर्त तारुण्याच्या जोशात नैसर्गिक भावना उमलणे आणि अभिनय म्हणजे काय? यातला नेमका फरक हा चित्रपट पाहून कळतो. तरुणाईतला टवटवीतपणा हा दुनियादारीतला आत्मा होता. हे अनुभवी कलाकार बघताना उगाचच कृत्रिमतेचा फील येतो. सर्वच कलाकारांनी अगदी जीव तोडून मेहनत केली आहे यात वादच नाही. पण दुनियादारीचा फील नाही येत.

आता हे स्वतंत्र कथानक म्हणून सुशिंची दुनियादारी व या चित्रपटाची तुलना बाजूला ठेवली तरी काही गोष्टी कळतच नाहीत. ज्या सुशिंच्या पुस्तकातून ठळकपणे जाणवतात.
जसे
- श्रेयस आणि दिग्याची मैत्री घट्ट का होते? हा प्रसंग साफ फसलाय. मारामारीच्या प्रसंगात एवढ्या लोकांच्या वेढ्यातून सुटून दिग्या श्रेयसला वाचवायला कसा येतो हे काहीच कळाले नाही. अरे किमान एकटा दिग्या सर्वांना धुतो एवढे तरी दाखवायचे. असो हा प्रश्न दिग्दर्शकासाठी सोडून द्यायचा.  हवी तेवढी ओळख झालेली नसताना श्रेयस सरळ दिग्याला मैत्री खात्यात धक्का देताना व मारताना दाखवलाय.

- श्रेयस आणि एमके यांचे नाते आले आले गेले गेले अशा प्रकारचे जाणवले. ओढ दिसलीच नाही. उगाचच ताणून मग ती ओढ दाखवली आहे.
- त्यातल्यात्यात मिनू च्या पात्राला उर्मिला कानिटकरने चांगला न्याय दिलाय.

- सई ताम्हणकरने साकारलेला शिरिनचा रोल पावरफुल असला तरी तिच्या भूमिकेचा परिणाम ही दिग्दर्शकाची कमाल समजायला हरकत नाही. अनेक वेळा डबिंगचे संवाद आणि तिचे ओठ यांचा ताळमेळ दिसला नाही.

- श्रेयसच्या भूमिकेत स्वप्निल जोशी सहजपणे वावरला आहे. पण त्याचा प्रभाव तो लक्षात राहील असा शेवटपर्यंत जाणवला नाही. शेवटच्या प्रसंगात मात्र त्याच्या अभिनयाचा कस जास्त दिसला. अंकुशने दिग्याच्या भूमिकेत भरपूर मेहनत केली असल्यामुळे तो या चित्रपटात श्रेयस वर भारी पडला.

- साईनाथची सशक्त भूमिका जितूने विनोदी करुन ठेवली आहे. ते अजून विसंगत वाटते



एकंदर चित्रपटातले लक्षात राहण्यासारखे काय असेल तर ते अंकुश चौधरी आणि उर्मिला कानिटकर

सुहास शिरवळकरांनी दुनियादारीत प्रमुख पात्र हे प्रमुखच राहील याची काळजी घेतली होती. इथे दिग्दर्शकाने काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला हे नक्की. पण हा एक स्वतंत्र चित्रपट म्हणून पाहिला तर थोडेफार मनोरंजन नक्की होईल. पण दुनियादारीशी तुलना केली तर पटणार अजिबात नाही.  असे असूनही एकदा तरी पहावा असा हा चित्रपट आहे असे मला तरी नक्की वाटते.   सुशिंच्या दुनियादारीची पात्रे तोडक्या मोडक्या स्वरुपात का होईना पण रुपेरी पडद्यावर अवतरल्याचा आनंद सुशिंच्या चाहत्यांना नक्की होणारच. मला तो आनंद झालाय. तुम्हालाही होवो ही अपेक्षा.

धन्यवाद,
- सागर

Wednesday, July 31, 2013

स्वतंत्र तेलंगण राज्यनिर्मितीच्या निर्णयाचा निषेध



काल तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि मन विषण्ण झाले.
काही संधीसाधू नेत्यांच्या इच्छेखातर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली.
तसे पाहता सर्वसामान्य माणसांना तेलंगणा झाला काय आणि आंध्र प्रदेशातच राहिले काय याच्याशी काही सोयरसुतक नसते.
ही सगळी विकतची दुखणी आहेत. नाहीतर स्वतंत्र भारतात कुठेही जाऊ शकणार्‍या भारतीय नागरिकाला एका राज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडावे लागते यातच खर्‍या लोकशाही व्यवस्थेचे वाभाडे काढले गेलेले आहेत. इथे आपल्याला आपल्या शेजार्‍यांशी , मित्रांशी आणि नातेवाईकांशी व्यवस्थित वागता - राहता येत नाही. तिथे देशाचे जास्तीत जास्त तुकडे पाडून काय साध्य होणार आहे? आज महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र विदर्भाचा विचार करतो आहोत. उद्या कोकण होईल मग अजून ५०-१०० वर्षांनी स्वतंत्र सातारा, स्वतंत्र कोल्हापूर, स्वतंत्र पुणे, स्वतंत्र मुंबई अशी भांडणे लागतील. फाळणीला अंत नाही. करु तितके तुकडे होतील... करता येतील... पण मनांचे तुकडे पडत आहेत त्याची पर्वा कोण करतो? राजकारणात एवढ्या खालच्या पातळीवर नेत्यांनी जाणे आणि विरोध करत असलेली बहुसंख्य जनता मूग गिळून गप्प बसणे हे खरोखर जिवंत लोकशाहीचे लक्षण नाहिये.

प्रशासनिक सुविधेसाठी राज्याची निर्मिती केली गेली असे कदाचित आता बोललेही जाईल. पण ते खरे नाही. उत्तर प्रदेश सारख्या मोठे क्षेत्रफळ असलेल्या राज्यातही ही अडचण होतीच की. अनेक वर्षांच्या अडचणीतून प्रशासनिक अधिकार्‍यांनी वेळोवेळी राज्यसरकारांना त्यांच्या शिफारसी पाठवूनही प्रत्यक्ष कृती होत नव्हती. पण मायावती मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तर प्रदेशचे तुकडे करण्यासाठी नवीन राज्यांची निर्मिती केली. अर्थात पुढे त्याचे राजकारण झाले आणि प्रस्ताव मंजूर झाला नाही. पुढे मुलायम सुपुत्राच्या नव्या सरकारने त्याचा यथास्थित जांगडगुंता करुन ठेवला. असो तो विषय येथे अप्रस्तुत आहे.

आजच्या सुधारलेल्या(?) भारतात तेलंगणाची निर्मिती एक मोठे सामाजिक वादळ निर्माण करणार आहे. आज तेलंगणा राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे उद्या विदर्भ, गोरखालँड , बोडोलँड, इ... अनेक तुकड्यांची मागणी कधी नव्हे तितका जोर धरणार आहे. काँग्रेसच्या राजवटीत झालेली देशाची फाळणी हा देशाला जसा कधीही भरुन न येणारा काळजाचा घाव पाकीस्तान व बांगलादेशाच्या निमित्ताने देऊन गेला आहेच. त्याच प्रमाणे तेलंगणा राज्याची निर्मिती भारताला एका वेगळ्याच विनाशपर्वात आणि द्वेषाच्या जगात घेऊन जाणार आहेत.

तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यामुळे अखंड आंध्र प्रदेशचे समर्थक नेहमीच तेलंगणावासियांना पाण्यात पाहतील. तर कडवे तेलंगण राज्याचे समर्थक उरलेल्या आंध्राच्या लोकांना. फाळणी ही कायमच द्वेष निर्माण करते. त्याच प्रमाणे २०१४ च्या निवडणुकांच्या अगोदर काँग्रेसने तेलंगणाच्या निर्मितीला (खरे तर वणव्यात) हात घालून स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न केला आहे. आंध्र प्रदेशचा तुकडा पाडण्याचा पराक्रम काँग्रेसच्या अंगलट येत्या निवडणुकीत येणार हे नक्की.

स्वतंत्र तेलंगण राज्य हव्या असलेल्या नेत्यांनी जो दबाव सरकारवर निर्माण केला तो अवघ्या जनतेचा दबाव आहे असे काँग्रेसने गृहीत धरले. आणि लोकशाही मानणार्‍या स्वतंत्र भारतात ही मोठी चूक ठरली. तेथील स्थानिकांना जे हवे त्याची शहानिशा न करता दिल्लीतील एका आलिशान मिटींग रुम मधे स्वतंत्र तेलंगण राज्य जन्माला घालण्यात आले. धोरणात्मक निर्णय घेण्यात कायमच अकार्यक्षमता दाखवणार्‍या काँग्रेसने तेलंगण राज्यनिर्मिती विषय ज्या पद्धतीने हाताळला तो अतिशय खेदजनक आहे. हुकुमशहाने राबवलेले निर्णय आणि काँग्रेसने एकछत्री कारभार करुन राबवलेले असे कित्येक निर्णय लोकशाही पायदळी तुडवणारे ठरले आहेत. स्वतंत्र तेलंगणची निर्मिती जनमत तपासूनही करता आली असती. किंबहुना तोच खरा सनदशीर व लोकशाहीचा मार्ग आहे.

घटनेने एकच कायदा लागू असलेल्या भारताच्या नागरिकांमध्ये द्वेषाची रेषा आखणार्‍या कॉंग्रेसच्या स्वतंत्र तेलंगण राज्यनिर्मितीच्या निर्णयाचा मी निषेध करतो. आणि भारतात खर्‍या अर्थाने लोकशाही स्थापन होवो ही त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करतो. लोकशाहीच्या बुरख्याखाली हुकुमशाही चालवणार्‍या पक्षाच्या मनमानी कारभारापेक्षा सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणारी हुकुमशाही केव्हाही चांगली. पूर्वीच्या काळी राजे आपल्या राज्यात कोणी दु:खी , कष्टी वा उपाशी नाही ना हे पाहण्यासाठी वेष पालटून सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळत असत. आणि तातडीने लोकोपयोगी कृती करत असत. त्या युगाची उगाचच आठवण झाली

- सागर

Sunday, June 30, 2013

पहिले स्वातंत्र्यसमर १८५७ साली सुरु झालेच नव्हते

पहिले स्वातंत्र्यसमर १८५७ साली सुरु झालेच नव्हते. तर इंग्रजांविरुद्ध पहिल्या  स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात सिद्धू - कान्हू या दोन भावांच्या नेतृत्त्वाखाली १८५५ सालीच झाली होती.



इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळवण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात १८५७  साली झाली होती असा सर्वसाधारणपणे समज आहे. पण हा समज निखालस चुकीचा आहे. १८५७ चे स्वातंत्र्य समर सुरु होण्याच्या अगोदरच साधारणपणे दोन-अडीच वर्षे अगोदर ३० जून १८५५ रोजी एक ठिणगी (सध्याच्या)  झारखंडात पेटली होती. किंबहुना १८५७ च्या युद्धाचे लोण भारतभर पसरण्याचे मुख्य श्रेय या १८५५ च्या उठावाला जाते. (सध्याच्या) झारखंडात असलेल्या संथाल या परगण्यात सिद्धू आणि कान्हू या दोन भावांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या इंग्रजांविरुद्धच्या या लढ्यामुळे इंग्रजांना खूप मोठी हानी सोसावी लागली होती. संथाल विद्रोह म्हणून हा उठाव इंग्रजांच्या कागदपत्रांमधून नोंदवला गेला आहे. या उठावाच्या यशामुळेच १८५७ सालापर्यंत स्वातंत्र्ययुद्धाचे लोण भारतभर पसरले. त्यामुळे १८५७ पासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात झाली असा जो समज आतापर्यंत होता तो चुकीचा आहे हे या 'संथाल विद्रोहा'मुळे स्पष्ट होते.

हा १८५५ चा उठाव कसा, कोठे आणि कोणामुळे झाला हे आता पाहूयात. म्हणजे हा उठाव केवढा मोठा होता आणि याचे महत्त्व केवढे होते हे वाचकांच्या लक्षात येईन.

(सध्याच्या साहेबगंज जिल्ह्यामधील) भगनाडीह गावापासून सुरुवात झालेल्या या विद्रोहाच्या वेळी सिद्धूने घोषणा केली होती - "करो या मरो, अंग्रेजों हमारी माटी छोडो".  या घोषणेमुळे क्रांतीकारकांच्या 'करेंगे या मरेंगे' या घोषणेचा उगम कोठे होता हे लगेच लक्षात येते. नागपुरी साहित्यिक व इतिहासकार बी.पी. केशरी सांगतात की हा विद्रोह संथाल परगण्यातील समस्त गरिब आणि शोषित झालेल्यांचा अत्याचार करणार्‍या इंग्रजांच्या आणि त्यांच्या कर्मचार्‍यांच्या विरोधातील स्वातंत्र्य लढा होता.
या आंदोलनाचे स्वरुप केवढे विराट होते याची कल्पना यात सामील झालेल्या लोकांच्या संख्येमुळे येते. संथाल विद्रोह हा इंग्रजांच्या सत्तेविरुद्धचा सशस्त्र लढा होता. ३० जून १८५५ रोजी भगनाडीह येथे ४०० गावांतील लोक पारंपारीक शस्त्रे घेऊन जमा झाले आणि या आंदोलनाची सुरुवात झाली. भगनाडीह येथे झालेल्या सभेत घोषणा करण्यात आली की आता त्यांच्यापैकी कोणीही मालगुजारी इंग्रजी सरकारला देणार नाही. या घोषणेनंतर सिद्धू आणि त्याच्या तीन भावांना पकडण्याचे आदेश इंग्रज सरकारने दिले. पण ज्या विभागीय पोलिस इन्स्पेक्टरला इंग्रजांनी या चार भावांना अटक करण्यासाठी पाठाले होते त्याचे मुंडके प्रक्षुब्ध झालेल्या आंदोलकांच्या जमावाने उडवले. या क्रांतीमुळे इंग्रजांची संथाल परगण्यातील सत्ता जवळपास संपुष्टात आली.


इंग्रजांच्या या मोठ्या पराभवाने संथाल परगण्यातील ४०० गावांच्या मोठ्या जमावाने जणू अवघ्या भारताला संदेशच दिला की आपण सर्व एकत्र आलो तर या इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावणे शक्य आहे. पुढे या संथाल विद्रोहाचेच पडसाद अवघ्या भारतात उमटले.

या पराभवाने चवताळलेल्या इंग्रजांनी पुढे संथाल परगण्यावर लष्करी हल्ला केला. या सैन्य कारवाईत त्यांनी कित्येक लोकांना अटक केली व विरोधासाठी जमा झालेल्या जमावावर अमानुषपणे गोळीबार करुन असंख्य लोकांची हत्या केली गेली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी इंग्रजांना संथाल परगण्यात मार्शल लॉ लावावा लागला होता. एवढेच नव्हे तर आंदोलकांमध्ये फूट पाडण्यासाठी आंदोलकांची माहिती देणार्‍यास रोख रकमेच्या पुरस्कारांची घोषणाही केली गेली होती 


 १८५५ च्या या संथाल विद्रोहामुळे इंग्रजांच्या तत्कालीन मांडलिक राजांना इंग्रजांविरोधात विजय मिळवता येऊ शकतो याचे भान आले. त्यानंतर संथाल परगण्यातील लोकांचा लढा हळू हळू भारतात सगळीकडे पसरु लागला आणि भावी काळातील हितांसाठी अनेकांनी मग १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतला. पण याची सुरुवात १८५५ सालीच संथाल परगण्यातील सिद्धू व कान्हू या भावांच्या जोडीने केलेली होती. 

भारताच्या स्वातंत्र्य युद्धास सुरुवात करुन देणार्‍या या संथाल परगण्यातील लोकांच्या शौर्याचे स्मरण पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे प्रणेते असे म्हणूनच आपण केले पाहिजे. 

धन्यवाद
- सागर

Sunday, June 23, 2013

भारताचे शत्रू कोण? : भाग १ : चीनचे वाढते संकट

भाग १ : चीनचे वाढते संकट
आधी काही बातम्या देतो. मग या विषयाचा समाचार घेऊयात.

१. गिलगीट-बाल्टिस्तानात आहेत चिनी सैनिक
२. भारत-चीन लष्करी संबंध सर्वसाधारण स्वरूपाचे
३. लष्करी अधिका-याच्या दौ-यास चीनचा नकार
४. चीनची कुरापत; भारताचे चोख प्रत्युत्तर
५. चीनच्या वाढत्या हालचाली चिंताजनक

चीन एक जगातील एक समर्थ आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या कित्येक दशकांत चीनची होत असलेली प्रगती त्यांच्याकडे एक ठोस योजना असल्याचे स्पष्टपणे दाखवते. एखादा देश स्वबळावर मोठा होत असेल तर ती नक्कीच कौतुकास्पद गोष्ट असते. भारतही हळू हळू मोठा होतो आहे. पण भारत आणि चीन या दोघांच्या मोठे होण्यात फरक आहे. भारतात लोकशाही आहे तर चीनमध्ये कम्युनिस्ट राज्य करत आहेत. कम्युनिस्ट म्हणजे थोडक्यात हुकुमशाही. का हा प्रश्न नाही विचारायचा?

भारत उद्या कितीही मोठा झाला तरी जगाला एक खात्री आहे की सत्तेचा दुरुपयोग भारताकडून होणार नाही. या खात्रीला एक निश्चितता म्हणता येईल. याचे श्रेय सरकारच्या धोरणापेक्षा प्रामाणिकपणे जगभर काम करत असलेल्या सर्व भारतीयांना दिले पाहिजे.

चीनने काय केले? चीन हा खूप महत्त्वाकांक्षी आहे. चीन ने (युद्धाच्या स्वरुपात) रक्ताचा थेंब न सांडता तिबेट घशात घातला. तिबेटच्या स्थानिकांचा विरोध असूनही चीन हे करु शकला कारण तिबेटमधील आवाज जगापर्यंत पोहोचू न देण्याची दक्षता त्यांनी घेतली होती. तिबेट बळकावण्यापूर्वी चीनने काय काय केले हेही पाहुयात.

चीन ने देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले मनुष्यबळ सक्तीने उपयोगात आणले. चीनचा आकार, भौगोलिक फायदा आणि उपलब्ध संसाधने यांच्या जोरावर चीनने आधी उद्योग जगत काबीज केले.
चीनने आधी व्यवस्थित अभ्यास केला की जगात कोणत्याही वस्तूचे उत्पादन करणे हे प्रत्येक कंपनीला खर्चाचे पडते आणि त्यामुळे त्या कंपन्यांना नफा हा मर्यादित मिळतो. वाचकहो नीट लक्ष देऊन हा मुद्दा समजून घ्या. जगातील कोणतीही कंपनी धंदा करते त्याचे उद्दीष्ट केवळ एकच असते - जास्तीत जास्त नफा मिळवणे. नेमकी हीच नस पकडून चीनने काय केले? या सर्व मोठ्या कंपन्यांना लक्ष्य केले. आमच्या देशात तुम्ही उत्पादन सुरु करा तुमचा खर्च कमी होईल व नफा देखील वाढेल. सरळ सरळ धंद्याचा विचार करणारा कोणीही हेच करेन. मुख्यकरुन त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत असलेल्या संधी बरोबर हेरल्या. हळू हळू चीनमध्ये उत्पादनांचा धूर निघू लागला. स्वस्त उत्पादनामुळे कंपन्यांचा पैसा वाचू लागला व उत्पादनही जास्त संख्येने होऊ लागले. हा पैसा जाहिरात व तत्सम मार्केटींग वर खर्च केला गेला. त्यामुळे कंपन्यांचे विक्रीचे आकडे वाढू लागले. सर्व प्रकारचे उत्पादन चीन ने केले. अमेरिकेतील संगणकांतील चिप्स, मोबाईल हँड्सेट्स, मुख्यत्वेकरुन खेळणी या सर्वांपासून टॉयलेटमध्ये वापरले जाणारे टॉयलेट पेपर, पेपर नॅपकिन्स हे देखील चीन मध्ये तयार होतात.

चीनने जगाला अशी सवय लावली होती की स्वस्त उत्पादनाचे दुसरे नाव चीन झाले. त्यामुळे चीनकडे पैसा वाहू लागला. चीनने काय केले? या पैशांतून मोठ्मोठी धरणे, मोठमोठी बांधकामे, रस्ते, रेल्वेमार्ग अशा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठ्या प्रमाणावर जाळे उभे केले.

स्वस्तात उपलब्ध असलेला माल व स्वस्तातले मनुष्यबळ ह्या जोरावर चीन आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करत गेला. हळुहळू चीनला या इन्फ्रास्ट्रक्चर क्षमतेचे सामरिक महत्त्व कळून आले. आता ड्रॅगनच्या पंज्यात बळ आले होते. तिबेटचा घास जगाच्या (किरकोळ) विरोधाला न जुमानता गिळला होता. आता चीनची नजर आहे ती अरुणाचल प्रदेश, सियाचीन, गिलगीट-बाल्टिस्तान या भागांवर. तुम्हाला कदाचित आश्चर्यदेखील वाटू शकेल पण नेपाळही या यादीवर आहे. त्यादृष्टीने नेपाळमधील (आणि भारतातीलही) माओवाद्यांना शस्त्रपुरवठा छुप्या मार्गाने सुरु आहेच, पण नेपाळमधील राजकारणात पडद्याआड मोठी खेळायच्या प्रयत्नात आहे चीन. भारताच्या लेह मधील सीमेलगतचे रस्त्याचे बांधकाम चीनने बंद पाडले होते. त्यावेळी आपण फक्त निषेध व्यक्त करुन स्वस्थ बसलो. तो रस्ता पूर्ण झाला की नाही? का काम सोडून दिले काही पत्ता नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही असे म्हणून आपले परराष्ट्र खाते कायमच झुकत आले आहे. आपले लोकनियुक्त सरकार फक्त लक्ष ठेवून आहे. आजची बातमी ही आहे की चीनचा इंटरेस्ट हिंदी महासागरातही वाढायला लागला आहे. त्यावर आपले परराष्ट्रमंत्री यांचे स्टेटमेंट वाचले - " ही बाब चिंताजनक आहे, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत" म्हणजे काय? बोलायची गरज आहे का यावर?
वुई कन्डेम्नड् सच अ‍ॅक्टीव्हिटीज असे म्हणून शत्रू काय घुसखोरी थांबवणार आहे काय?
असो.

पाकीस्तानच्या रुपाने चीनला एक मोठी संधी दिसत आहे. पाकीस्तानला भारताविरुद्ध सर्व प्रकारची मदत चीन करत आहे. गिलगीट-बाल्टिस्तानात मोठमोठे बोगदे खणणे, मोठे रस्ते बांधणे, रेल्वेमार्ग उभारणे या सर्व साधनांद्वारे चीन आखाताच्या दोन दिवसांच्या अंतरावर आला आहे. हे कशासाठी? व्यापारासाठी? अजिबात नाही. चीन हळूहळू युद्धाच्या दिशेने पावले टाकतो आहे. युद्धात सर्वात जास्त काय वापरले जाते? दारुगोळा चालवण्यासाठी जी मशिनरी लागते त्यांसाठी लागणारे इंधन. आखात जवळ आले की तेलाचा खूप मोठा पुरवठा आणि तो ही ताबडतोब चीनला होणार आहे. पाकीस्तानची मैत्री चीन फक्त भारताविरोधातच नव्हे तर आखाती देशांतील इस्लामी राष्ट्रांचे हितसंबंध जपण्यासाठीही वापरत आहे. तेलाची खरेदी गेल्या काही वर्षांत चीनने जेवढी केली तेवढी कोणीच केलेली नाहिये. चीनकडे याक्षणी प्रचंड तेलसाठा आहे. भारतीय सीमेलगत कित्येक ठिकाणी हे तेलसाठे चीन साठवत आला आहे. युद्धाच्या वेळी काश्मीर च्या मोबदल्यात पाकीस्तानकडून चीनला काय अपेक्षा आहे? भारताविरुद्ध अतिरेकी कारवायांचे प्रमाण वाढवणे आणि सियाचीन व अरुणाचल प्रदेशातील जेवढा टापूं चीन व्यापेल त्याला समर्थन देणे.

चीनच्या या तयारीच्या तुलनेत भारताची काय तयारी आहे?
मेनन म्हणाले, की चीन सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक महासत्तेचा दर्जा मिळविण्यात अधिक व्यस्त  आहे. युद्ध करून चीन ते स्थैर्य धोक्‍यात आणण्याची शक्‍यता नाही. असे बेजबाबदार वक्तव्य करुन मेननसाहेब (हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत) स्वप्नात जगत आहेत असे मला तरी वाटते. जो सामर्थ्याकडे वाटचाल करतो आहे आणि ज्याला जमीनीची तहान आहे तो चीन भारताशी युद्ध करणार नाही या भ्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने रहावे? भारताकडे किती पाणबुड्या आहेत? किती लष्करी जहाजांचे उत्पादन दरवर्षी भारतात होते? किती विमाने खरेदी केली जातात? किती तोफा अद्ययावत आहेत? लष्करी शस्त्रे व अस्त्रे यांबाबतीत एक क्षेपणास्त्र सोडले तर आपला देश सगळ्या महत्त्वाच्या संसाधनांसाठी दुसर्‍या देशावर अवलंबून आहे. आकड्यांच्या तुलनेत भारत चीनपुढे कुठेही टिकत नाही. युद्ध हे कोणत्याही राष्ट्राला परवडत नाही. पण असे होणारच नाही असे गृहीत धरणे म्हणजे मेंदूला ज्वर आल्याचे लक्षण नाही का?

भारतीय परराष्ट्र मंत्रालय चीनबरोबर सामरिक देवाणघेवाणीचे करार करत आहे. त्या अनुषंगाने भारताचे काही लष्करी अधिकारी चीनला भेट देणार आणि चीनचे लष्करी अधिकारी भारताला भेट देणार. लेफ्टनंट जनरल बी. एस. जसवाल यांच्या दौर्‍यावर चीनने आक्षेप घेतला नसता तर लोकांना ही गोष्ट कळाली असती की नाही हे माहिती नाही. पण यापेक्षा भयानक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की जसवाल प्रकरणी प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ज्या चीनी अधिकार्‍यांचा दौरा रद्द केला त्याबद्दल कोणी काही माहिती घेतली आहे का? या दौर्‍याच्या वेळी चीनचे हे अधिकारी पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी (एनडीए) येथे भेट देणार होते. हे सत्र कधीपासून चालू आहे हे सरकारलाच माहिती. जसवाल यांची नियुक्ती जम्मू व काश्‍मीरसारख्या संवेदनशील भागात आहे. तेथील लोक वेगळे पारपत्र (व्हिसा) घेऊन येतात. जसवाल काश्‍मीरमधून येत असल्याने त्यांना चीनच्या दौर्‍याची परवानगी देता येणार नाही,' असे चीनतर्फे भारताला कळविण्यात आले. असे असताना एनडीए ही देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणारी संस्था आहे. शेजारचे राष्ट्र सामरिकदृष्ट्या बलवान होत असताना देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणार्‍या संस्थेची गुपितं उघड करणे याला कोणत्या बुद्धीचे परराष्ट्र धोरण म्हणता येईल? ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणू शकते एवढी साधी गोष्ट सरकारच्या ध्यानात येऊ नये?

चीनचा ड्रॅगन आपले पंजे आधी बळकट करतो आहे आणि मगच हळूहळू पाय पसरतो आहे. चीनची ही नीती लक्षात येत नसेल तर आपले पराष्ट्र धोरण आखणारे सरकारच विफल ठरते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. तिबेटच्या स्वायत्ततेसाठी आवाज उठवणार्‍या दलाई लामा यांना भारतात आश्रय घ्यावा लागला, केवळ दोन दिवसांच्या अंतरावर आखाताशी संपर्क चीनने निर्माण केला, तेलाचा प्रचंड साठा केला गेला आहे. लष्कराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला आहे. काही लोकांना चीनशी चांगले संबंध ही एक सुवर्णसंधी वाटते आहे. अशा लोकांनी या घडणार्‍या घटनांकडे डोळसपणे पहावे व जागे व्हावे एवढेच सांगून थांबतो.

धन्यवाद,
-सागर

एकी नसल्यामुळे सरकारचे फावते आहे


लोकांमध्ये सरकारच्या मनमानी कारभाराबद्दल प्रचंड प्रक्षोभ आहे.
पण सर्व जनआंदोलकांमध्ये एकी नसल्यामुळे सरकारचे फावते आहे.

फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती काँग्रेस आजपर्यंत वापरत आले आहे.
म्हणूनच सामान्य जनता अण्णा हजारे, रामदेवबाबा व तत्सम इतर लोकनेत्यांमागे जरी जात असली तरी त्यात चार दिवसांची जत्रा होते एवढेच
सरकार मात्र मूग गिळून हा तमाशा बघत बसले आहे.
एकाच व्यासपीठावर अण्णा हजारे, रामदेव बाबा , श्री श्री रविशंकरजी, सर्व धर्मीय संत-इमाम-फादर एकत्र आले तर सरकारची काय हिम्मत आहे की विरोधाने अशी आंदोलने चिरडून टाकण्याची?

सामान्य जनता आज गांधीजींची ३ माकडे झाली आहेत.

एकी हेच बळ हा पुस्तकी सुविचार सर्वसामान्य जनता आचरणात आणेन तो दिवस भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा आहे.

आजपर्यंत जनतेने नुसत्या पुढच्या अफरातफरीवर नजर टाकली असती तरी हे सरकार पडावे यासाठी ठोस भूमिका घेऊन आंदोलने केली असती.
मतदान करुन ५ वर्षांसाठी सरकार निवडण्याचा हक्क जसा सामान्य जनतेला आहे
तसाच हक्क जर ते सरकार कार्यक्षमतेने काम करत नसेन तर  ५ वर्षे पूर्ण होण्याअगोदर खाली खेचण्याचा हक्कही सामान्य जनतेला आहेच.
या हक्काची अंमलबजावणी कोण करते आज?

विकास होत नसेन तर आपल्या कार्यक्षेत्रातील आमदार - खासदाराला जाब विचारण्याचा अधिकार घटनेने सर्वसामान्य जनतेला दिला आहे.
तो हक्क कार्यक्षमतेने वापरण्याऐवजी आपण या नेत्यांच्या दहशतीखाली दबून जातो.

नाहीतर
बोफोर्स कांड
विमान खरेदी कांड
कॉमनवेल्थ घोटाला
हवाला घोटाळा
२जी स्पेक्ट्रम घोटाळा
राडिया कांड
आयपीएल कांड

इत्यादी ... इत्यादी ...

अशी भ्रष्टाचाराची वाढती कमान असलेल्या नेत्यांना आपण पुन्हा पुन्हा निवडून देता?

विरोधी पार्टी पण तशीच आहे असे म्हणून आपण भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा निवडून देतो. त्यामुळे स्वतःचाच पैसा लुटला जातोय ही जाणीवच जनतेला नाहिये.
५०० रुपयाच्या बिलापैकी
३९० रुपये जेवणाचे असतात आणि ११० रुपये आपण सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट पोटी देतो हे कोणीतरी बघते का?

२०-२५ रुपये किलोने मिळणारा तांदूळ (जे गरिबांचे प्रमुख अन्न आहे) तो आज ६० - ७० रुपये किलोने मिळतो आहे.  ( चांगला बासमती १०० च्या पुढे मिळतो)

पेट्रोलचे भाव कित्येक वेळा वाढवले.  ३८- ४० रुपयांनी मिळणारे पेट्रोल आज  ७० रुपयांच्या च्या पुढे गेले आहे

एकत्र व्हा. तरच लोकशाहीचा फायदा सामान्य जनतेला मिळेन. नाहीतर नेतेपणाचा बुरखा पांघरलेले लुटारु तुमच्या कष्टाचा पैसा लुटल्याशिवाय राहणार नाहीत.


Wednesday, June 12, 2013

महान इजिप्शियन संस्कृती

-महान इजिप्शियन संस्कृती-

सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते। ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती. 


ह्या महान इजिप्शियन संस्कृतीचे तीन मुख्य काळ होते,’सुरुवातीचा काळ’, 'मध्य काळ' आणि 'अस्तकाळ'। सुरुवातीच्या काळात इजिप्शियन संस्कृती प्रगतीसाठी प्रयत्नशील होती। त्यानंतरचा मध्यकाळ हा इजिप्शियन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ मानला जातो. याच मध्यकाळात इजिप्शियनांनी प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते. त्यांच्या हातून अनेक अविस्मरणीय कलाकृतींची निर्मिती झाली. इजिप्शियन संस्कृतीने प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते तो काळ सुमारे ४०० वर्षांचा मानला जातो. अशी ही महान इजिप्शियन संस्कृती सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी उदयास आली.


इजिप्तचे 'अपर इजिप्त' म्हणजे 'दक्षिण इजिप्त' आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' असे दोन भाग पडतात। इजिप्शियन संस्कृती मुख्यत: ह्या 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' मध्ये भरभराटीस आली. पुढील नकाशा ही गोष्ट स्पष्ट करेन.


इजिप्तच्या सुवर्णमध्याच्या काळात तुतनखामुन (तुत-आँख-अमुन)(Tutankhamun) ' हा राजा इजिप्तच्या राजगादीवर आला. हा 'तुतनखामुन' राजा इजिप्तमध्ये अतिशय लोकप्रिय होता.'तुतनखामुन' हा 'फॅरोह' (pharaoh) वंशाचा राजा होता.ह्या 'तुतनखामुन'च्या कबरीचा पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. ते म्हणतात की, जगात जेवढे म्हणून पिरॅमिडस् असतील त्यात 'तुतनखामुन' चा पिरॅमिड सर्वोत्कृष्ट ठरेल. 



या 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडचा शोध १९२२ मध्ये 'सर हॉवर्ड कार्टर' या इतिहास संशोधकाने लावला. 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडमध्ये प्रवेश केल्यावर त्याच्या कबरीमध्ये त्याची 'ममी' पहायला मिळते.'तुतनखामुन' च्या ममीच्या चेहर्‍यावर जो मुखवटा आहे, तो पूर्णपणे शुद्ध सोन्याचा आहे. या मुखवट्यावरील कलाकुसर बघण्यासारखी आहे. या मुखवट्यावर नाग आणि गरुड ही दक्षिण इजिप्शियनांची चिन्हे आढळतात.



तुतनखामुनच्या नावात येणारी (तुत-आँख-अमुन) अमुन ही इजिप्शियन देवता होती. 


ही महान इजिप्शियन संस्कृती इजिप्तमधील पिरॅमिडस् साठी प्रसिद्ध आहे. कारण हे पिरॅमिडस् म्हणजे जगातील एक आश्चर्यच आहे. ह्या पिरॅमिडसची बांधणी विशिष्ट प्रकारची आहे. पिरॅमिडला चार बाजू असतात. सर्व बाजू ज्या टोकापाशी मिळतात, त्या ठिकाणी ९० अंशांचा कोन होतो. आज आपण असा पिरॅमिड बांधायला गेलो तर आपण असा पिरॅमिड बांधू शकत नाही. कारण पिरॅमिड बांधायचे इजिप्शियनांचे एक विशिष्ट तंत्र होते. ते तंत्र आपल्याला अजून तरी अवगत नाही. पिरॅमिडस् बांधण्यासाठी इजिप्शियनांनी मोठ-मोठे अवजड दगड वापरले आहेत. इतके अवजड दगड इजिप्शियनांनी वाहून कसे नेले हे एक न सुटलेले कोडे आहे. हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.
एकदा दक्षिण इजिप्तच्या राजाने स्वत:च्या कबरीसाठी खास इमारत बांधायचे ठरवले। त्याप्रमाणे त्याने त्याच्या वजिराला ते काम सांगितले। त्या राजाचा "इमहॉटेप" नावाचा हुशार वजिर होता। त्याने आधी पिरॅमिडची आखणी केली। मग पक्के दगड वापरुन जगातील पहिला पिरॅमिड बांधला. हा पहिला पिरॅमिड उभारायला बराच वेळ लागला. हा पिरॅमिड बांधण्यासाठी 'इमहॉटेप' वजिराने खूप मजूर कामास लावले होते। ह्या पिरॅमिडनंतर असे अनेक पिरॅमिडस् बांधले गेले. हे पिरॅमिडस् बांधणे खूप अवघड होते. पण कारागिरांना एकदा हे तंत्र कळाल्यावर हे पिरॅमिडस् वेगात बांधले गेले. पण हे पिरॅमिडस् बांधणे अतिशय खर्चाचे काम असल्यामुळे ते केवळ राजे व श्रीमंत लोक यांनाच शक्य होते. 

इजिप्शियन लोकांच्या अद्भुत पिरॅमिडस् प्रमाणेच इजिप्शियनांच्या 'ममीज्' देखील प्रसिद्ध आहेत। राजे किंवा श्रीमंत लोक स्वत:च्या मृत्यूनंतर स्वत:च्या पिरॅमिडमध्ये स्वत:ची 'ममी' तयार करुन ठेवायचे. शेकडो वर्षे उलटली तरी या 'ममीज्'जशाच्या तशाच आहेत.'ममी' म्हणजे शरीरावर काही विशिष्ट प्रक्रिया करुन ते शरीर सुकवणे. अशा अनेक 'ममीज्' इजिप्तमधल्या अनेक पिरॅमिडमध्ये सापडल्या आहेत. सध्या पिरॅमिडस् ची बरीच पडझड झाली आहे. तरीही आज अनेक पिरॅमिडस् सुस्थितीत आहेत.पाच हजार वर्षांपूर्वीच्या 'ममीज्' जशाच्या तशा आढळतात हे ही एक आश्चर्यच आहे.ह्या 'ममीज्' कशा तयार करायच्या ह्याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. पण हे इजिप्शियन 'ममीज्' सहज बनवायचे.अर्थातच स्वत:ची ममी तयार करणे हेही खर्चाचेच काम होते, त्यामुळे हे ही फक्त राजे आणि श्रीमंत लोक यांनाच परवडत असे.



ह्या इजिप्शियनांची एक श्रद्धा होती की, राजा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होतो। आपल्या प्रिय राजाला पुढे उपयोगी पडाव्यात म्हणून त्या राजाच्या पिरॅमिडमध्ये इजिप्शियन लोकांनी भाकरीचे तुकडे, घोडे वगैरे प्राणी इ. अनेक वस्तूंच्या 'ममीज्' बनवून राजाच्या कबरीजवळ ठेवल्या आहेत. तसेच मातीची भांडीदेखील राजाच्या कबरीजवळ ठेवलेली आढळतात. एकदा तर इजिप्शियनांनी आपला राजा जिवंत झाल्यावर समुद्रपर्यटनासाठी त्याला उपयोगी पडावी म्हणून नावेचे तुकडे त्याच्या पिरॅमिडमध्ये पुरुन ठेवले होते. पुरातत्त्व संशोधकांनी हे तुकडे जोडल्यावर १३० फूट लांबीची भलीमोठी नाव तयार झाली. ह्या नावेची डोलकाठी २९ फूट उंच होती.


इजिप्शियन लोकांची लेखनाची जी लिपी होती, ती लिपी 'हायरोग्लिफ' या नावाने ओळखली जाते। आपली जशी अक्षरलिपी आहे तशी इजिप्शियनांची 'हायरोग्लिफ' ही चित्रलिपी होती. इजिप्शियनांना अक्षरलिपी ज्ञात नव्हती, पण त्यांना ही चित्रलिपी चांगली अवगत होती.इसवी सन ३१०० वर्षी 'हायरोग्लिफ' लिपी अप्पर आणि लोअर इजिप्त मध्ये प्रचलित झाली. 


हे इजिप्शियन लिहिण्यासाठी कागदासारखी एक वस्तू वापरायचे। 'पेपिरस' नावाच्या झाडाचा पांढरा रंग असलेला पापुद्रा, विशिष्ट प्रक्रिया करुन तो वाळवून, त्यापासून कागदासारखी एक वस्तू तयार करायचे. आपल्या कागदापेक्षा त्यांचा कागद हा वेगळ्या प्रकारचा होता. इजिप्शियनांनी तयार केलेला कागद वजनाने हलका आणि लवचिक असल्याने त्या कागदाच्या घड्याही पडायच्या.

नाइल नदी ही इजिप्तची देणगीच होय. एका विशिष्ट दिवशी नाइलला प्रचंड असा महापूर यायचा. पण वर्षातून फक्त एकदाच. ह्या नाईलला एवढा महापूर यायचा की, कित्येक गावे, कित्येक जमीन पाण्याखाली जायची. ह्या नाइल नदीमुळेच इजिप्शियनांनी पंचांग वा कॅलेंडर बनवले. 'ग्रहण' एकाच ठिकाणी दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते. (आजचे सौरचक्र २२ वर्षांचे मानले जाते. कदाचित त्या काळचा पृथ्वी आणि सूर्यसापेक्ष वेग आणि आजचा वेग यात तफावत असू शकेल)
एवढेच नव्हे तर कोणता तारा, कोणत्या महिन्यात कुठे दिसेल, हेही इजिप्शियन्स सांगू शकत होते। यावरुनच कळून येते की इजिप्शियनांची खगोलशास्त्रातदेखील चांगली गती होती. खरोखर हे इजिप्शियन्स् म्हणजे जगातील आश्चर्याचा नमुनाच होते. 



सर्वात शेवटी येतो तो ह्या इजिप्शियन संस्कृतीचा अस्त काळ। ह्या संस्कृतीचा अस्त साधारणपणे इ.स्.पूर्व ४,०००-इ.स्.पूर्व ३,९०० वर्षांपूर्वी झाला. एवढी प्रगत, थोर संस्कृती नष्ट झाली. पण ही संस्कृती कशी नष्ट झाली हे मात्र कोणालाच माहित नाही. आजचे संशोधक, पुराणशास्त्रज्ञ ह्या विषयावर केवळ तर्क लढवित आहेत, पुरावे गोळा करत आहेत.पण अजून तरी त्यांच्या हाती या संस्कृतीच्या अस्ताविषयी काहीच लागलेले नाही.

अशी होती ही इजिप्शियन संस्कृती ... महान इजिप्शियन संस्कृती ...
- सागर

Tuesday, June 11, 2013

मिनोअन आणि मायसिनिअन संस्कृती

मिनोअन आणि मायसिनिअन संस्कृती

पुरातन संस्कृती म्हटले की आपसूकच इजिप्शियन, ग्रीक, माया, इंका, सुमेरियन अशा सर्व संस्कृतींचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर येतो.
मिनोअन आणि मायसिनिअन या दोन संस्कृती तशा दुर्लक्षित पण महत्त्वाच्या होत्या. त्यांची थोडक्यात ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न

मिनोअन संस्कृतीचे सर्वात महत्वाचे शहर म्हणजे 'नोसेस'. आज फ्रान्समध्ये पॅरिसला जे महत्त्व आहे ते महत्त्व त्या काळी 'नोसेस' या शहराला प्राप्त झालेले होते. नोसेस शहराच्या बाबतीत दोन वेळा चमत्कारिक घटना घडल्या. एका मोठ्या भूकंपात नोसेस हे शहर जमिनीत गाडले गेले. लोकांनी मेहनत घेऊन पुन्हा हे नोसेस शहर उभारले. त्यानंतर पुन्हा भूकंप झाला व हे शहर दुसर्‍यांदा गाडले गेले. त्याहीवेळी तेथील लोकांनी हे शहर पुन्हा उभे केले. नोसेस या शहराला काही जण नोसिस या ही नावाने ओळखतात.
मिनोअन राजाने हे नोसेस किंवा नोसिस शहर वसविले. 'मिनोसस' हे त्या राजाचे खरे नाव होते. एजियन समुद्राच्या दक्षिण टोकास ग्रीस जवळ एका खडकाळ बेटांत हे नोसेस शहर होते. येथेच ही मिनोअन संस्कृती सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी उदयास आली.


या संस्कृतीचा शोध अगदी अलिकडे म्हणजे साधारण शंभर वर्षांपूर्वी लागला. १९३९ साली 'सर आर्थर वॉल' या ब्रिटीशाने या मिनोअन संस्कृतीचा शोध लावला. 'मायरिया पटोस' या ठिकाणीदेखील या संस्कृतीचे अवशेष सापडले. जगात सर्वप्रथम 'ड्रेनेज सिस्टीम'चा वापर कोणी केला असेल तर तो या मिनोअन संस्कृतीच्या लोकांनी.

हे मिनोअन लोक शांत व कलाप्रेमी म्हणून ओळखले जात. त्यांच्यात वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला, धातुकला, इत्यादी अनेक कलांमध्ये हे मिनोअन लोक पारंगत होते.

त्यातही त्यांची धातुकलेमधील प्रगती अगदी वाखाणण्याजोगी होती असे सापडलेल्या अवशेषांवरुन दिसून येते. मिनोअन लोक धातूची भांडी तयार करायचे व त्यावर कोरीवकाम, नक्षीकाम करायचे.


व्यापारातही या लोकांनी चांगलीच प्रगती केली होती. आज आपण कागदोपत्री व्यवहार करतो, पैसे देतो. पण हे मिनोअन लोक कोणताही व्यवहार कागदोपत्री , नाणी वा पैसे वापरुन न करता 'वस्तूच्या बदली वस्तू घेणे' म्हणजेच व्यापार मानत. 'बार्टर एक्स्चेंज' पद्धतीची सुरुवात मिनोअन संस्कृतीपासून झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. इजिप्तकडून हे मिनोअन लोक धातू घ्यायचे व त्याबदल्यात धातूची भांडी इजिप्शियनांना द्यायचे.

तसेच दक्षिण आफ्रिकेकडून मिनोअन लोक हस्तीदंत मोठ्या प्रमाणावर घ्यायचे व त्याऐवजी हस्तीदंतावर कोरीव काम केलेल्या वस्तू त्यांना द्यायचे. (अर्थातच जास्त हस्तीदंताच्याबदल्यात कमी कोरीव काम केलेल्या वस्तू हा हिशोब असायचा)
तर असा चालायचा मिनोअन लोकांचा व्यापार.
या मिनोअन लोकांची चित्रकला बरीच चांगल्या दर्जाची होती. हे लोक निसर्गप्रेमी होते असे त्यांनी काढलेल्या चित्रांच्या अवशेषांवरुन स्पष्ट होते. त्यांनी काढलेली बव्हंशी चित्रे ही निसर्गाचीच आहेत.


एजियन समुद्रात 'सॅटोनिमी' नावाचे एक बेट होते. या बेटाला हे मिनोअन लोक 'थेरा' म्हणायचे. हे 'थेरा' बेट त्यांच्या 'नोसेस' शहरापासून केवळ पंच्याहत्तर मैल अंतरावर होते. या थेरा बेटावर प्रचंड असा ज्वालामुखीचा स्फोट झाला. या ज्वालामुखीतून झालेल्या लाव्हारस, राख, धूळ व विषारी वायू यांच्या उद्रेकामुळे शंभर मैल परिसरातील सर्व गोष्टी नष्ट झाल्या. यातच ही मिनोअन संस्कृती नष्ट झाली असे मानले जाते.

मायसिनिअन संस्कृतीचा उदय:
इ.स.पूर्व (म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी सुमारे ) १९५० ते १९०० वर्षे या काळात मिनोअन संस्कृतीचा उदय झाला. ही संस्कृती सुमारे सहाशे वर्षे सुवर्णकाळात होती. याच वेळी युनान प्रदेशात 'मायसिनिअन' संस्कृतीचा उदय झाला. या मायसिनिअन लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा दैवावर वा नशिबावर अजिबात विश्वास नव्हता. त्या लोकांचा विश्वास केवळ स्वत:च्या पराक्रमावर होता. या लोकांकडे संपत्तीही भरपूर होती. साधारणत: इसवी सन पूर्व १९०० ते २००० हा या संस्कृतीचा उदयकाळ मानला जातो. युनान प्रदेशात काही हल्लेखोर टोळ्या होत्या. त्यापैकी 'डोनिअयन' लोकांच्या टोळ्यांनी वारंवार या मायसिनिअन लोकांवर हल्ले केले. साधारणपणे इसवीसन पूर्व १२०० मध्ये केवळ साडेचारशे वर्षांत या संस्कृतीचा नाश झाला. मिनोअन संस्कृतीच्या तुलनेत मायसिनिअन संस्कृतीची माहिती बरीच कमी उपलब्ध आहे.

- सागर 

(टीपः या लेखात वापरलेली चित्रे जालावरुन घेतलेली आहेत व त्यांचे सर्वाधिकार त्या त्या व्यक्ती वा संस्थांकडे सुरक्षित आहेत.)

Tuesday, May 28, 2013

होय "मराठी" अभिजात भाषा आहेच



अलिकडेच मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याचा मार्ग प्रशस्त झाला अशी चर्चा ऐकायला मिळते आहे. वर्तमानपत्रांतून लेख येत आहेत. मुळात मराठी भाषा अभिजात आहे की नाही? अभिजात भाषा म्हणजे काय? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय काय साध्य होणार आहे? यावर मी मागच्या वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी विस्कळीत लेखन केले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दृष्टीपथात असल्याकारणाने माझे विस्कळीत लेखन या लेखाच्या रुपाने एकत्रित करतो आहे. म्हणजे वाचकांना वर उल्लेख केलेल्या प्रश्नांची उत्तरे तर मिळतीलच. शिवाय अधिकची माहितीही मिळेल. मी जे लिहिले आहे तेच सत्य असा माझा दावा अजिबात नाहिये. आजचे संशोधन उद्या कालबाह्य होते हा इतिहास आहे. पण पुराव्यांनिशी जे सिद्ध होत गेले त्या अनुषंगाने माझे लेखन झालेले आहे. संशोधन ही सातत्याची प्रक्रिया असते. त्यात वेळोवेळी भर पडली पाहिजे. मी माझ्यापरीने लिहिले आहे.

अभिजात भाषा म्हणजे काय?


अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय काय साध्य होणार आहे?

मराठी भाषा अभिजात आहे की नाही?



माझा लेख वाचल्यानंतर एबीपी माझा या वाहिनीवर झालेली अलिकडची नवीन चर्चा पहा. त्यातून अनेक बाबींचा वेध घेतला गेला पाहिजे हे कळेल.

http://www.youtube.com/watch?v=dFeUAR1IwTc


Saturday, February 16, 2013

भातुकलीच्या खेळामधली


फेसबुकवर एका ग्रुपवर एका सदस्याने 'भातुकलीच्या खेळामधली' या गाण्याचा अर्थ काय असा प्रश्न विचारला होता.
हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळचे गाणे आहे. त्यामुळे या गाण्याचा अर्थ स्पष्ट करण्याचा मी केलेला प्रयत्न ही एक उस्फूर्त प्रतिक्रिया होती. तोच हा प्रयत्न माझ्या ब्लॉगवर पण देतो आहे.

"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" हे एक विरह गीत आहे.
ज्या प्रेयसीची प्रियकराने अपेक्षा केली होती ती काही कारणाने त्याची होऊ शकली नाही
प्रेम तर दोघांचेही एकमेकांवर होते. पण लग्नात त्याची परिणती झाली नाही.
त्या उद्विग्नतेतून जन्माला आलेले विरह गीत आहे.

मराठी भावगीतांमधील हे माझे सर्वात आवडते गाणे आहे. संपूर्ण गाण्यातील शब्दांचे सौंदर्य सहज ध्यानात यावे यासाठी हे संपूर्ण गाणे देत आहे. व त्याबरोबर या गाण्याचा अर्थ स्पष्ट करण्याचा थोडाफार प्रयत्न करतो. कारण या गाण्यातील शब्दसामर्थ्य हे भावनिक जास्त आहे जे शब्दांत संपूर्ण विशद करणे केवळ अशक्य आहे. या गाण्याच्या ऐकण्यात अनुभूतिचा भाग जास्त आहे हे कृपया येथे लक्षात घ्यावे.

(राजा आणि राणी ही अतिशय समर्पक रुपके आहेत. प्रेमवीरांचे विश्व हे त्यांच्यासाठी एक प्रेमराज्य असते व त्या राज्याचे ते अनभिषिक्त राजा आणि राणी असतात)

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी

राजा वदला मला समजली, शब्दावाचून भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा
का राणीच्या डोळा तेव्हा दाटूनी आले पाणी 
(येथे राणी एका अनामिक भीतीपोटी नि:शब्द झालेली आहे व प्रियकराला उत्तर देऊ शकत नाहीये. म्हणून पहिल्या ओळीत प्रियकराला शब्दांवाचूनची भाषा समजली असल्याची ग्वाही देतो आहे. )

राणी वदली बघत एकटक, दूरदूरचा तारा
उद्या पहाटे, दुसरा वाहता, दुज्या गावचा वारा
पण राजाला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी
(ती अतिशय खिन्न आहे व प्रियकराबरोबरची शेवटची संध्याकाळ असल्याची जाणीव तिला आहे. हे ती प्रियकराला सांगू शकली नाही. पण प्रियकरालाही ते उशीरा कळते जेव्हा ती दुसर्‍या दिवशीच्या पहाटे गाव सोडून निघून गेलेली असते)

तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे
का दैवाने फुलण्याआधी, फुल असे तोडावे
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी
(पुढे ती व तो समोरासमोर येतात तेव्हा तिच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. किंवा तिच्यात पूर्वी हे सर्व प्रियकराला सांगण्याचे सामर्थ्य नव्हते. येथे कदाचित तिच्या आई-वडिलांनी मुलीने तिच्या मनाप्रमाणे केले तर प्राणत्याग केल्याची धमकी दिलेली असते. व पुन्हा प्रियकराशी संबंध न ठेवण्याची शपथ घातलेली असते.)

का राणीने मिटले डोळे, दूरदूर जाताना
का राजाचा श्वास कोंडला, गीत तिचे गाताना
वार्‍यावरती विरुन गेली, एक उदास विराणी 
(हा त्याच्या व तिच्या प्रेमकहाणीचा विदारक शेवट आहे. )

'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' या गाण्याबद्दल वर मी शब्दवैभव उलगडण्याचा थोडा प्रयत्न केला. त्यानंतर असे वाटले की एखाद्या यशस्वी गाण्याचे श्रेय हे सांघिक निर्मितीला असते. तेव्हा या सुंदर हृदयस्पर्शी गाण्याचे गीतकार - मंगेश पाडगांवकर, गायक - अरुण दाते आणि संगीतकार - यशवंत देव या सुंदर गाण्याच्या निर्मितीला प्रामुख्याने जबाबदार असलेल्या या सर्वांचे स्मरण न करणे म्हणजे तो या दिग्गजांचा उपमर्द होईल. तसेच गाण्याची सुरुवात ज्या आर्त सनईने होते त्या सनईवादकालाही विसरुन चालणार नाही. अतिशय भावपूर्ण असे हे गाणे आहे. डोळे मिटून हे गाणे ऐकत असताना नकळत आपल्या डोळ्यांतून पाणी पाझरते. मला वाटते उच्च कोटीच्या गाण्याचा अविष्कार तो हाच असावा. अशी गाणी मराठीत अनेक आहेत. अगदी सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर यांनी अशा प्रकारची अनेक हृदयस्पर्शी गाणी दिलेली आहेत. तरीही या गाण्यापेक्षा जास्त तीव्रतेने काळजाला हात घालणारे गाणे किमान माझ्या पाहण्यात तरी नाही.  तुम्हाला वाटत असेल तर असे गाणे मला जरुर सांगा

धन्यवाद,
सागर

Saturday, September 8, 2012

भारतीय अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र


सुप्रसिद्ध लेखक श्री. संजय सोनवणी यांनी फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवर येथे एक आगळ्या वेगळ्या खालून वर जाणार्‍या अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडलेली आहे. त्या अनुषंगाने मी मांडलेले काही विचार

संजय सर अतिशय उत्तम मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. खालून वर जाणार्‍या अर्थव्यवस्थेची पाळे-मुळेदेखील घट्टच असतील. मला येथे काही मुद्दे सुचवावेसे वाटतात ते असे १. किमान वेतनश्रेणी ठरलेली असावी. पण ती अशी असावी की त्यात प्रत्येक व्यक्तीला कष्टाच्या साहाय्याने पुढे प्रगती करण्याची समान संधी उपलब्ध असावी. २. करदत्यांसाठी किमान मोबदला प्रकार असावा. म्हणजे अचानक काही कारणास्तव एखाद्याची नोकरी गेली तर पैशाच्या अडचणीमुळे त्याने आत्महत्या करण्या सारखा मार्ग स्वीकारायला लागू नये विदेशांत सलग ५ वर्षे टॅक्स देणार्‍यांना अचानक बेरोजगार व्हावे लागले तर न सांगता न मागता सरकार त्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम जमा करते, ज्यातून त्या व्यक्तीचे कर्जांचे हफ्ते फेडले जाऊ शकतात व जगण्यासाठी किमान अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेपुरते) आवश्यक पैसा मिळतो. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने सर्व क्षेत्रांत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी जी भविष्यनिर्वाह निधीची व्यवस्था केली आहे ती एवढी तकलादू आहे की त्या रकमेचा रिटायरमेंटच्या वेळी काडीचाही उपयोग होत नाही. महागाई ज्या वेगाने वाढते आहे त्या वेगाने बाकीच्या गोष्टी पण बॅलन्स व्हायला हव्यात.

उदाहरणार्थः महागाई (सरकारी आकडे काहीही म्हणोत पण) आत्तापर्यंत ८०० ते १००० पटींनी वाढली आहे. पण भांडवलदारांनी श्रमिकांची पिळवणूक करत पगारातली वाढ मंदीच्या नावाखाली केवळ १ ते ५ टक्केच केलेली आहे. फार तर १०% असेल. सध्या खाजगी क्षेत्रांतून कष्ट करणारे कर्मचारी सध्या फक्त मनी-मशिनचे काम देशासाठी करत आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की देशातला सर्वात जास्त इन्कम टॅक्स हा खाजगी क्षेत्रांतून येत असूनही सरकारने याबाबत अतिशय उदासीन धोरण स्वीकारलेले आहे. म्हणजे फक्त ओरबाडायचे. त्या ओरबाडण्याने सर्व-सामान्यांच्या आतड्यावर किती ओरखडे उमटले? याचा विचारदेखील सरकार करत नाही. अशी परिस्थिती दुर्दैवाने आहे. त्यांना स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही पगारातली ८०% रक्कम कर्जाचे हफ्ते फेडण्यापायी जाते. उरलेल्या २०% रकमेत घरखर्च कसा निघेल?
कर्जाचे डोंगर सर्वसामान्याच्या डोक्यावर मणा-मणाच्या ओझ्याने वाढत आहेत, हा असंतोषाचा स्फोट जेव्हा होईल तेव्हा जागृती येण्याचा काळ आणि वेळ हातातून निघून गेलेली असेल व आपण पुन्हा गुलामीकडे वाटचाल केलेली असेल. भविष्यकाळातील येत्या ५ ते १० वर्षांत सरकारने सर्वसामान्यांच्या हातात पैशाची मुबलकता उपलब्ध करुन दिली नाही तर भारतीय अर्थव्यवस्था एवढी जोरात कोसळेल की त्यातून सावरणे मी मी म्हणवल्या जाणार्‍या अर्थतज्ज्ञांना कालत्रयीही शक्य होणार नाही. जशा भारतीय कंपन्या विदेशी कंपन्या टेक-ओव्हर करतात त्याप्रमाणे एखादा श्रीमंत देश भारताची अर्थव्यवस्था टेकओव्हर करेन. त्यानंतर आपल्यापुढे आयुष्य म्हणून जगण्याचा पर्यायच शिल्लक असणार नाही एवढे हे भीषण चित्र आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे असे धिंडवडे भविष्यकाळात निघतील की २०२० च्या उज्ज्वल भारताचे स्वप्न विकणार्‍या लोकांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आहे, जोर जबरदस्ती आहे. आपल्या देशात लोकशाही नावालाच आहे. सरकार विरोधी जाणार्‍या सर्वांची वाट लावण्यात येते हे लोकशाहीचे लक्षण आहे? प्रामाणिकपणे काम करणारे खूप जण आहेत, पण कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचणार्‍यांचेच राज्य भारतावर आहे. तूर्तास एवढे पुरे. पण जाता-जाता काही प्रश्न. मोलमजुरी करुन वर्षानुवर्षे पोट भरणार्‍यांनी मरेपर्यंत फूटपाथवरच झोपायचे का? भीक मागत उदरनिर्वाह करणार्‍यांनी बेवारस म्हणूनच मरायचे का? स्वत:चे हक्काचे घर असावे , बायकोच्या व मुलांच्या चेहर्‍यावर स्वतःच्या घरात रहात असल्याचे समाधान देणार्‍या सर्व-सामान्य व्यक्तीने त्या घराच्या कर्जाचा बोझा घेऊनच मरायचे का?
अत्यंत मानसिक तणावाखाली खाजगी क्षेत्रात काम करणारा हा नोकरपेशी वर्ग भर तारुण्यातच हृदयविकार, ब्लडप्रेशर, मधुमेह अशा दुर्धर व्याधींच्या तडाख्यात सापडतो आहे, ही सरकारला चिंतेची बाब वाटत नाही का?