Saturday, February 16, 2013

भातुकलीच्या खेळामधली


फेसबुकवर एका ग्रुपवर एका सदस्याने 'भातुकलीच्या खेळामधली' या गाण्याचा अर्थ काय असा प्रश्न विचारला होता.
हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळचे गाणे आहे. त्यामुळे या गाण्याचा अर्थ स्पष्ट करण्याचा मी केलेला प्रयत्न ही एक उस्फूर्त प्रतिक्रिया होती. तोच हा प्रयत्न माझ्या ब्लॉगवर पण देतो आहे.

"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" हे एक विरह गीत आहे.
ज्या प्रेयसीची प्रियकराने अपेक्षा केली होती ती काही कारणाने त्याची होऊ शकली नाही
प्रेम तर दोघांचेही एकमेकांवर होते. पण लग्नात त्याची परिणती झाली नाही.
त्या उद्विग्नतेतून जन्माला आलेले विरह गीत आहे.

मराठी भावगीतांमधील हे माझे सर्वात आवडते गाणे आहे. संपूर्ण गाण्यातील शब्दांचे सौंदर्य सहज ध्यानात यावे यासाठी हे संपूर्ण गाणे देत आहे. व त्याबरोबर या गाण्याचा अर्थ स्पष्ट करण्याचा थोडाफार प्रयत्न करतो. कारण या गाण्यातील शब्दसामर्थ्य हे भावनिक जास्त आहे जे शब्दांत संपूर्ण विशद करणे केवळ अशक्य आहे. या गाण्याच्या ऐकण्यात अनुभूतिचा भाग जास्त आहे हे कृपया येथे लक्षात घ्यावे.

(राजा आणि राणी ही अतिशय समर्पक रुपके आहेत. प्रेमवीरांचे विश्व हे त्यांच्यासाठी एक प्रेमराज्य असते व त्या राज्याचे ते अनभिषिक्त राजा आणि राणी असतात)

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी

राजा वदला मला समजली, शब्दावाचून भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा
का राणीच्या डोळा तेव्हा दाटूनी आले पाणी 
(येथे राणी एका अनामिक भीतीपोटी नि:शब्द झालेली आहे व प्रियकराला उत्तर देऊ शकत नाहीये. म्हणून पहिल्या ओळीत प्रियकराला शब्दांवाचूनची भाषा समजली असल्याची ग्वाही देतो आहे. )

राणी वदली बघत एकटक, दूरदूरचा तारा
उद्या पहाटे, दुसरा वाहता, दुज्या गावचा वारा
पण राजाला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी
(ती अतिशय खिन्न आहे व प्रियकराबरोबरची शेवटची संध्याकाळ असल्याची जाणीव तिला आहे. हे ती प्रियकराला सांगू शकली नाही. पण प्रियकरालाही ते उशीरा कळते जेव्हा ती दुसर्‍या दिवशीच्या पहाटे गाव सोडून निघून गेलेली असते)

तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे
का दैवाने फुलण्याआधी, फुल असे तोडावे
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी
(पुढे ती व तो समोरासमोर येतात तेव्हा तिच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. किंवा तिच्यात पूर्वी हे सर्व प्रियकराला सांगण्याचे सामर्थ्य नव्हते. येथे कदाचित तिच्या आई-वडिलांनी मुलीने तिच्या मनाप्रमाणे केले तर प्राणत्याग केल्याची धमकी दिलेली असते. व पुन्हा प्रियकराशी संबंध न ठेवण्याची शपथ घातलेली असते.)

का राणीने मिटले डोळे, दूरदूर जाताना
का राजाचा श्वास कोंडला, गीत तिचे गाताना
वार्‍यावरती विरुन गेली, एक उदास विराणी 
(हा त्याच्या व तिच्या प्रेमकहाणीचा विदारक शेवट आहे. )

'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' या गाण्याबद्दल वर मी शब्दवैभव उलगडण्याचा थोडा प्रयत्न केला. त्यानंतर असे वाटले की एखाद्या यशस्वी गाण्याचे श्रेय हे सांघिक निर्मितीला असते. तेव्हा या सुंदर हृदयस्पर्शी गाण्याचे गीतकार - मंगेश पाडगांवकर, गायक - अरुण दाते आणि संगीतकार - यशवंत देव या सुंदर गाण्याच्या निर्मितीला प्रामुख्याने जबाबदार असलेल्या या सर्वांचे स्मरण न करणे म्हणजे तो या दिग्गजांचा उपमर्द होईल. तसेच गाण्याची सुरुवात ज्या आर्त सनईने होते त्या सनईवादकालाही विसरुन चालणार नाही. अतिशय भावपूर्ण असे हे गाणे आहे. डोळे मिटून हे गाणे ऐकत असताना नकळत आपल्या डोळ्यांतून पाणी पाझरते. मला वाटते उच्च कोटीच्या गाण्याचा अविष्कार तो हाच असावा. अशी गाणी मराठीत अनेक आहेत. अगदी सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर यांनी अशा प्रकारची अनेक हृदयस्पर्शी गाणी दिलेली आहेत. तरीही या गाण्यापेक्षा जास्त तीव्रतेने काळजाला हात घालणारे गाणे किमान माझ्या पाहण्यात तरी नाही.  तुम्हाला वाटत असेल तर असे गाणे मला जरुर सांगा

धन्यवाद,
सागर