Tuesday, May 15, 2012

जन-गण-मन राष्ट्रगीताची शताब्दी

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

आज २७ डिसेंबर २०११.
शंभर वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी २७ डिसेंबर १९११ रोजी जन-गण-मन हे गीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथील कार्यक्रमात सर्वात पहिल्यांदा गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत रचलेले हे गीत भारताचे राष्ट्रगीत होईल असे त्यावेळी कोणाला वाटले असेल काय? टागोरांनी हे गीत कधी रचले ते माहित नाही. पण शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच ते सार्वजनिक झाले त्यामुळे या गीताच्या सार्वजनिक आयुष्याचा आज शताब्दी दिवस आहे.

जय हिंद ... जय भारत...

भारताचे राष्ट्रगीत म्हणून जन-गण-मन या गीताचे पहिले कडवेच म्हटले जाते व त्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता २४ जानेवारी १९५० रोजी मिळाली.

या गीतातील सिंध आता सध्याच्या पाकीस्तान मधे असल्यामुळे 'सिंध' हा शब्द बदलून 'सिक्कीम' टाकायचा प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन आहे. हा या संदर्भातील माहितीचा दुवा

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे...

जनमनगण हे संपूर्ण गीतः

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||

पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दु:स्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दु:ख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||

रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||

स्त्रोतः विकी

===========

माझे परमस्नेही श्री. अशोक पाटील यांनी जन-गण-मन या गीतामागचा उलगडलेला हा सत्य इतिहास

"त्या" गीताच्या इतिहासाबद्दल खूप लिहिले गेले आहेच यापूर्वीही, पण भारत सरकारच्या प्रसिद्धी संचालनालयाद्वारेच प्रकाशित झालेल्या Collected Works of Rabindranath Tagore मध्ये ज्या पत्राचा उल्लेख केला गेला आहे, त्यातील मजकूर वाचल्यानंतर त्यापुढे कसल्याही अन्य चर्चेचे प्रयोजन उरत नाही.

इंडियन नॅशनल कॉन्ग्रेसने १९११ मध्ये कलकत्ता इथे भरलेल्या वार्षिक अधिवेशनासाठी किंग जॉर्ज यांच्या स्तुतीप्रित्यर्थ एक स्वागतगीतसम गाणे टागोरांनी लिहून द्यावे अशी विनंती 'एका सर्टन हाय ऑफिशिअल" मार्फत त्यांना करण्यात आली (हा सर्टन हाय ऑफिशिअल म्हणजे पंडित नेहरू असावेत असा कयास नंतर मांडण्यात आला). या विनंतीमुळे जरी टागोर अस्वस्थ झाले तरी त्यानी हे गीत लिहिले, त्यात एम्पररची स्तुती नसून 'भारतमातेला समृद्ध करणारी जी कुणी अज्ञात दैवी शक्ती आहे' तिची आराधना केली आहे. आपले मित्र श्री.पुलिनबिहारी सेन याना लिहिलेले रविन्द्रनाथांचे खालील पत्र वाचा :

In a letter to Pulin Behari Sen, Tagore later wrote, “A certain high official in His Majesty’s service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Vidhata of India who has from age after age held steadfast the reins of India’s chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the
Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song."

पुढे १९१३ मध्ये टागोरांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांचे नाव सर्वतोमुखी होणे साहजिकच होते. विविध ठिकाणाहून इंग्रजी, बंगाली, हिंदी भाषांतून त्यांच्या अनेकविध साहित्याचे प्रकाशनही नियमित होत गेले. १९१९ मध्ये तर ब्रिटिश आधिपत्याखाली चालत असलेल्या शाळांमधून 'जन-गण-मन' चे रुपांतर Morning Song of India या शीर्षकाखाली झाले आणि सकाळच्या प्रार्थनेसाठी त्याचा उपयोग सुरू झाला.

पुढे १९४२ च्या म.गांधींच्या 'चले जाव' चळवळीला मिळालेले यश पाहून भारतवासियांची खात्री झाली होती की आज ना उद्या (दुसरे महायुद्ध समाप्तीनंतर) देश स्वतंत्र होणारच असल्याने त्याला पूरक असे राष्ट्रगीत तयार करणे गरजेचे आहे. अशावेळी पं.नेहरू यानीच पुढाकार घेऊन गुरुदेवांच्या या प्रदीर्घ गीतातील पहिल्या कडव्याचा त्या कारणासाठी विचार करायला आपल्या पक्षाला सांगितले, जे पुढे सर्वानुमते मान्य करण्यात आले. तेव्हा जरी ते गीत पंचम जॉर्ज यांच्या भेटीच्या निमित्ताने रचले गेले असले तरी ते त्यांची स्तुतीदर्शक होते असे मानू नये, कारण खुद्द टागोरांनीच त्या समजाचे लेखी स्वरूपात खंडन केले असल्याने तो विषय संपला. आपण घटना पवित्र मानतो आणि त्यानुसारच एक सुजाण नागरिक म्हणून आपले वर्तन ठेवतो. मग त्याच घटनेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेले "जन-गण-मन" सर्वांसाठी पवित्रच आहे, आणि म्हणून त्याचा सदैव आदर राखणे नितांत गरजेचे आहे.

भारतच नव्हे तर बांगला देशानेही १९७१ च्या स्वातंत्र्यानंतर आपले म्हणून जे राष्ट्रगीत निवडले ते "आमार शोनार बांगलादेश" ज्याची रचना तसेच चालही गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर यांचीच आहे आणि बांगलादेशी नागरिक ते गीत अभिमानाने आणि आदराने म्हणतात.

-अशोक पाटील

==========

No comments:

Post a Comment