Tuesday, June 11, 2013

मिनोअन आणि मायसिनिअन संस्कृती

मिनोअन आणि मायसिनिअन संस्कृती

पुरातन संस्कृती म्हटले की आपसूकच इजिप्शियन, ग्रीक, माया, इंका, सुमेरियन अशा सर्व संस्कृतींचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर येतो.
मिनोअन आणि मायसिनिअन या दोन संस्कृती तशा दुर्लक्षित पण महत्त्वाच्या होत्या. त्यांची थोडक्यात ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न

मिनोअन संस्कृतीचे सर्वात महत्वाचे शहर म्हणजे 'नोसेस'. आज फ्रान्समध्ये पॅरिसला जे महत्त्व आहे ते महत्त्व त्या काळी 'नोसेस' या शहराला प्राप्त झालेले होते. नोसेस शहराच्या बाबतीत दोन वेळा चमत्कारिक घटना घडल्या. एका मोठ्या भूकंपात नोसेस हे शहर जमिनीत गाडले गेले. लोकांनी मेहनत घेऊन पुन्हा हे नोसेस शहर उभारले. त्यानंतर पुन्हा भूकंप झाला व हे शहर दुसर्‍यांदा गाडले गेले. त्याहीवेळी तेथील लोकांनी हे शहर पुन्हा उभे केले. नोसेस या शहराला काही जण नोसिस या ही नावाने ओळखतात.
मिनोअन राजाने हे नोसेस किंवा नोसिस शहर वसविले. 'मिनोसस' हे त्या राजाचे खरे नाव होते. एजियन समुद्राच्या दक्षिण टोकास ग्रीस जवळ एका खडकाळ बेटांत हे नोसेस शहर होते. येथेच ही मिनोअन संस्कृती सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी उदयास आली.


या संस्कृतीचा शोध अगदी अलिकडे म्हणजे साधारण शंभर वर्षांपूर्वी लागला. १९३९ साली 'सर आर्थर वॉल' या ब्रिटीशाने या मिनोअन संस्कृतीचा शोध लावला. 'मायरिया पटोस' या ठिकाणीदेखील या संस्कृतीचे अवशेष सापडले. जगात सर्वप्रथम 'ड्रेनेज सिस्टीम'चा वापर कोणी केला असेल तर तो या मिनोअन संस्कृतीच्या लोकांनी.

हे मिनोअन लोक शांत व कलाप्रेमी म्हणून ओळखले जात. त्यांच्यात वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला, धातुकला, इत्यादी अनेक कलांमध्ये हे मिनोअन लोक पारंगत होते.

त्यातही त्यांची धातुकलेमधील प्रगती अगदी वाखाणण्याजोगी होती असे सापडलेल्या अवशेषांवरुन दिसून येते. मिनोअन लोक धातूची भांडी तयार करायचे व त्यावर कोरीवकाम, नक्षीकाम करायचे.


व्यापारातही या लोकांनी चांगलीच प्रगती केली होती. आज आपण कागदोपत्री व्यवहार करतो, पैसे देतो. पण हे मिनोअन लोक कोणताही व्यवहार कागदोपत्री , नाणी वा पैसे वापरुन न करता 'वस्तूच्या बदली वस्तू घेणे' म्हणजेच व्यापार मानत. 'बार्टर एक्स्चेंज' पद्धतीची सुरुवात मिनोअन संस्कृतीपासून झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. इजिप्तकडून हे मिनोअन लोक धातू घ्यायचे व त्याबदल्यात धातूची भांडी इजिप्शियनांना द्यायचे.

तसेच दक्षिण आफ्रिकेकडून मिनोअन लोक हस्तीदंत मोठ्या प्रमाणावर घ्यायचे व त्याऐवजी हस्तीदंतावर कोरीव काम केलेल्या वस्तू त्यांना द्यायचे. (अर्थातच जास्त हस्तीदंताच्याबदल्यात कमी कोरीव काम केलेल्या वस्तू हा हिशोब असायचा)
तर असा चालायचा मिनोअन लोकांचा व्यापार.
या मिनोअन लोकांची चित्रकला बरीच चांगल्या दर्जाची होती. हे लोक निसर्गप्रेमी होते असे त्यांनी काढलेल्या चित्रांच्या अवशेषांवरुन स्पष्ट होते. त्यांनी काढलेली बव्हंशी चित्रे ही निसर्गाचीच आहेत.


एजियन समुद्रात 'सॅटोनिमी' नावाचे एक बेट होते. या बेटाला हे मिनोअन लोक 'थेरा' म्हणायचे. हे 'थेरा' बेट त्यांच्या 'नोसेस' शहरापासून केवळ पंच्याहत्तर मैल अंतरावर होते. या थेरा बेटावर प्रचंड असा ज्वालामुखीचा स्फोट झाला. या ज्वालामुखीतून झालेल्या लाव्हारस, राख, धूळ व विषारी वायू यांच्या उद्रेकामुळे शंभर मैल परिसरातील सर्व गोष्टी नष्ट झाल्या. यातच ही मिनोअन संस्कृती नष्ट झाली असे मानले जाते.

मायसिनिअन संस्कृतीचा उदय:
इ.स.पूर्व (म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी सुमारे ) १९५० ते १९०० वर्षे या काळात मिनोअन संस्कृतीचा उदय झाला. ही संस्कृती सुमारे सहाशे वर्षे सुवर्णकाळात होती. याच वेळी युनान प्रदेशात 'मायसिनिअन' संस्कृतीचा उदय झाला. या मायसिनिअन लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा दैवावर वा नशिबावर अजिबात विश्वास नव्हता. त्या लोकांचा विश्वास केवळ स्वत:च्या पराक्रमावर होता. या लोकांकडे संपत्तीही भरपूर होती. साधारणत: इसवी सन पूर्व १९०० ते २००० हा या संस्कृतीचा उदयकाळ मानला जातो. युनान प्रदेशात काही हल्लेखोर टोळ्या होत्या. त्यापैकी 'डोनिअयन' लोकांच्या टोळ्यांनी वारंवार या मायसिनिअन लोकांवर हल्ले केले. साधारणपणे इसवीसन पूर्व १२०० मध्ये केवळ साडेचारशे वर्षांत या संस्कृतीचा नाश झाला. मिनोअन संस्कृतीच्या तुलनेत मायसिनिअन संस्कृतीची माहिती बरीच कमी उपलब्ध आहे.

- सागर 

(टीपः या लेखात वापरलेली चित्रे जालावरुन घेतलेली आहेत व त्यांचे सर्वाधिकार त्या त्या व्यक्ती वा संस्थांकडे सुरक्षित आहेत.)

No comments:

Post a Comment