Tuesday, May 15, 2012

लावणीचा शोध - २

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

मागे मी "लावणीचा शोध - १" या लेखात मराठी लावणीचे मूळ शोधायचा प्रयत्न केला होता. माझा हा शोध अजूनही अविरत चालूच आहे, याकामी माझे अनेक मित्र मदत करत आहेत. खास करुन माझे ख्यातनाम लेखक व संशोधक मित्र श्री. संजय सोनवणी हे देखील त्यांच्या संशोधनाने मदत करत आहेत. शोध घेता घेता मला मराठी 'तमाशा' चे मूळ थेट सातवाहन काळापर्यंत असल्याचा एक दाखला मिळाला आहे. गाथासप्तशति ही हाल सातवाहनाने संपादित केली होती हे तर आता सिद्ध झालेले आहेच. त्यामुळे मराठी तमाशाचे मूळ सातवाहन कालात जात असेल तर त्याची माहिती सर्वांना होणे अगत्याचे आहे. म्हणूनच मूळ लेख मी जसाच्या तसा येथे देत आहे. याचे मुख्य कारण त्या अनुषंगाने चर्चा मला अपेक्षित आहेच, शिवाय चर्चेद्वारे माहितीत भर पडावी हा ही प्रमुख हेतू आहे. या व्यतिरिक्त वाचकांना मराठी तमाशा च्या इतिहासाची अधिक माहिती मिळावी हाही हेतू आहेच हास्य

शिवाय महान्यूजच्या संकेतस्थळावरच असे आवाहन आहे की हा लेख कुठेही प्रकाशित केला तरी चालेल, फक्त त्यांचा उल्लेख हवा. लेखाच्या शेवटी मूळ दुवा दिला आहे.

---------------------------
खडीगंमत:

'तमाशा'ला एकेकाळी खडीगंमत म्हटले जायचे. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागात तमाशा प्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात तखतरावाचा तमाशा आहे. संगीतबारीचा तमाशा आणि ढोलकीफडाचा तमाशा असे तमाशाचे दोन स्वतंत्र प्रकार असले तरी विदर्भातील खडीगंमत आणि प. महाराष्ट्रातील तमाशा हे एकाच प्रकृतीपिंडाचे प्रयोगात्मक लोककला प्रकार आहेत.

विदर्भातील बुलढाण्यापासून गोंदिया पर्यंत खडीगंमत सादर केली जाते. घरोघरी फिरणारी खडीगंमत ही दंडार नावाने ओळखली जाते. खडीगंमत आणि दंडार या विदर्भातील लोककला प्रकारांवर डॉ. हरिश्चंद्र बोरकर आणि प्रा. हिरामण लांजे यांनी संशोधन केलेले आहे. खडीगंमत सादर करणार्‍या कलावंतांना विदर्भात शाहीर म्हणूनच संबोधले जाते. खडीगंमत ही पूर्णत: पुरुषप्रधान लोककला आहे. या प्रकारात नृत्याचे काम करणारा 'नाच्या'म्हणून संबोधले जाते.

विदर्भात दर्या, पांगूळ, डहाका, झडती, मंत्रगीते, दंडीगान, भिंगी सोंग, राध, डरामा, दंडार आदी लोककला प्रकार प्रसिद्ध आहे. त्यातील खडीगंमत हा प्रकार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून खडीगंमतची मोहिनी जनमानसावर आहे.

'गाथासप्तशती' या ग्रंथात 'खडीगंमत'ला पुष्टी देणारे उल्लेख आहेत. गोपिकेची वेशभूषा करुन पुरुष लुगडी नेसून फाल्गुन मासात जनरंजन करीत असत, असा उल्लेख 'गाथासप्तशती'त आहे. 'राधानाट' किंवा 'राधानाचा'ची परंपरा बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांतही आहे. स्त्रीवेशधारी पुरुषतज्ज्ञ कलावंतांचा उल्लेख दशावतारासंबंधी संत रामदासांनी केलेल्या उक्तीतही आढळतो. समर्थांनी स्त्रीवेशधारी पुरुषांना 'अवघेचि धटिंगण' असे म्हटले आहे. हे धटिंगण 'खडीगंमत' मध्ये आढळतात. मुकुंदराज यांच्या विवेकसिंधू या ग्रंथातील उल्लेख पाहा

सोंग संपादिता तोखलेपणें
नटासि दीजेती वस्त्रे भूषणें
तो सोंग लटिका, परि ती भूषणे
नटासिची अर्पिती

दंडार, डफगाण, खडीगंमत आदी लोकनाट्ये ही एकाच परंपरेतील आहेत. मनोरंजन करणार्‍यास 'गमत्या' असे म्हटले जाते. तमाशात जसा सोंगाड्या तसा खडीगंमत या लोककला प्रकारात 'गमत्या' असतो. 'गमत्या' म्हणजे 'गमज्या' मारणारा. 'गमज्या' म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण बडबड करणारा.

'गमत्या' च्या 'गमज्या' या अर्थहीन बडबड वाटत असली तरी त्यामागे लक्ष्यार्थ आणि व्यंगार्थ असतो. 'गमत्या' सारखे पात्र लळित, दशावतार, भागवतमेळे या सारख्या भक्ती नाट्यांमधून आढळते. लळितातील 'वनमाळी' दशावतारातील संकासूर, भागवत मेळ्यातील विदूषक आदी पाने 'गमती' करीत असतात.

'खडीगंमत' मध्ये ढोलकी, डफ, चोनका (म्हणजे प.महाराष्ट्रातील चौंडक) टाळ ही वाद्ये वापरली जातात. त्यातील ढोलकी, डफ ही तालवाद्ये तर तुणतुणे, चोनका ही सूर देणारी वाद्ये होत. पूर्वरंग आणि उत्तररंग या विभागात विभागलेल्या खडीगंमत चा आकृतीबंध खालीलप्रमाणे -

पूर्वरंगात गण व गवळण यांचा समावेश होतो. उर्वरित भाग उत्तररंगात येतो.

गण : दंडार, गोंधळ आणि तमाशा या महाराष्ट्रातील अन्य लोकनाट्य प्रमाणे खडीगंमत देखील गणाने सुरु होते. शाहिर गण गातो व अन्य पात्रे स्थिर उभी राहतात. गणामध्ये श्रीगणेशाची स्तुती असली तरी शंकर पार्वतीचाही उल्लेख येतो.

गवळण : गण आटोपल्यावर गवळण गायली जाते. यात नाच्याला चांगलाच वाव असतो. त्याच्या विविध विभ्रमातून प्रेक्षकांना आकर्षित केले जाते. मथुरेला जाणार्‍या गौळणी आणि पेंद्या व आपल्या सवंगड्यासह त्यांना अडविणारा श्रीकृष्ण खडीगंमतच्या गवळणीमध्ये सादर होतो. गोंधळ तमाशा या अन्य लोकनाट्याप्रमाणे खडीगंमतही गवळण सादर करुन आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवीत असते.

सरन व रुसवा : गवळण सादर करतांना शाहिर तात्पुरता श्रीकृष्ण बनतो तर त्याचा साथीदार पेंद्या होतो. नाच्या राधेचा वेश घेतो तर गमत्या डोईवर पदर घेवून मावशीचे रुप धारण करतो. गवळणीचा शेवट सरण किंवा 'शरण' या वेगळ्या पद्य प्रकाराने होतो. रस्ता अडविणार्‍या श्रीकृष्णाला अथवा त्याच्या सवंगड्यांना गोपिकांनी केलेली विनवणी म्हणजे 'सरण'

गवळण गातांना 'रुसवा' हा एक अन्य रचनाप्रकार आढळून येतो. आपल्या नवर्‍याशी किंवा खोडी काढणार्‍या कृष्णाशी गोपिकेने धरलेला अबोला म्हणजे 'रुसवा' हे स्वतंत्र नाव देण्याचा पायंडा. केवळ खडी गंमत लोकनाट्याने पाडलेला दिसून येतो.

उत्तर रंग :
उत्तररंगात छिटा व दोहा, धमाळी व पोवाडा बैठी गंमत, बैठी दंडार व मुजरा अर्थात भरतवाक्याने खडी गंमतीचा उत्तररंग रंगतो त्यामुळे खडीगंमत पाहण्यास आलेला प्रेक्षक उत्तररंगाचीच वाट पाहत असतो.

छिटा व दोहा :
खडीगंमत अधिक आकर्षक होत असतांना कलगी व तुरा या दोन घटाण्याच्या द्वंद्वात्मक कार्यक्रमांमुळे मास दुय्यम असा झाडी शब्द खडीगंमत वापरते. यात सवाल-जवाब प्रामुख्याने असतात. शिवाय छिटा हा स्वतंत्र प्रकार वापरला जातो. चार ओळीचा 'दोहा' यास फार महत्त्व असते. 'जवाबी दोहा' हा त्याचाच एक प्रकार असतो. झगडा हा अन्य रचना प्रकार ऐकायला मिळतो. जवाबी झगडा 'जोड झगडा' हे त्याचे अन्य प्रकार असतात. खडी गंमत गद्याला अत्यल्प स्थान देते. कडव्याच्या एका लावणीत प्रश्न असतो दुसरी उत्तराची लावणी तेवढ्याच विस्ताराने गायली जाते. तर कधी एकत्र उत्तर सादर केले जाते.

धुमाळी व पोवाडे :
'धुमाळी व पोवाडा' हे दोन अन्य रचनाप्रकार खडीगंमत वापरत असते. धुमाळी हा शब्द परंपरागत संगीतातील असला तरी झोपेची डुलकी घेत असलेल्या प्रेक्षकाला खडबडून जागे करण्याचे कार्य ही खडीगंमतची धुमाळी करीत असते. कोणतीही महत्त्वाची लावणी प्रारंभ करण्यापूर्वी शाहीर आपल्या अत्युच्च स्वरात या धुमाळीचा सूर लावतो.

पोवाडा:
खडी गंमत गात असलेला पोवाडा हे दिर्घकाव्य असते. तब्बल एक-दोन तास चालणारे हे प्रदीर्घ गीत असते. यामध्ये एखादे कथानक निवडून त्या संदर्भातील चरित्र आख्यान गायले जाते. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे 'सत्यवान सावित्री, चिलिया बाळ' भक्त ध्रुव, अभिमन्यू वध अशा पौराणिक कथाशिवाय ऐतिहासिक व सामाजिक घटनावरही प्रतिभावंत ग्रामिण लोककलावंतांनी प्रदीर्घ पोवाडे रचले आहेत. उदा. टिळकांचा पोवाडा, गांधीवधाचा पोवाडा, नर्मदेच्या पूराचा पोवाडा, खाण्याचा पोवाडा... इत्यादी

बैठी गंमत -बैठी दंडार :
पोवाडा हा रचना प्रकार उभ्याने गाण्यापेक्षा बसून गाण्यात खरी मजा असते. म्हणूनच खडी गंमत ही अनेकदा बैठी गंमत रुपातही सादर केली जाते.

विशिष्ट सणाच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने कोणाच्या वाड्याच्या ओसरीवर निवडक श्रोत्यांच्या उपस्थित ही बैठी गंमत रात्रभर सादर केली जाते. नागपंचमी, जन्माष्टमी, पोळा, होळी, गौर, शिवरात्री ही त्याकरिता निमित्ये असतात.

संपादणूक अर्थात बतावणी :
लावणीचे गायन आपल्या खड्या आवाजात शाहीर करीत असतो. त्या लावणीतील वर्णनानुसार अन्य पात्रे संवाद व अभिनय यांच्या सहाय्याने संपादणूक करीता असतात, तीला बतावणी म्हणतात.

बतावणी हा खास झाडीबोलीतील शब्द असून तो कृत्रिम आचरण अथवा सोंग यास पर्याय म्हणून व्यवहारात वापरला असतो. बताव इतकाच बतावणी हा शब्द जुना आहे.

मुजरा :
रात्र संपायला येते. प्रभातरंग दिसायला लागतो. तरी खडी गंमत आपला पसारा आवरता घेते. शेवटला निरोप द्यायची तयारी करु लागते. भरतवाक्य गायला प्रारंभ करते. अर्थात तेव्हा आपल्या देवदेवतांचे आणि गुरुचे स्मरण करायला ती विसरत नाही. या भरतवाक्याला खडी गंमत मध्ये 'मुजरा' हे स्वतंत्र नाव आहे.

खडीगंमत या विदर्भातील लोकप्रिय रंजनप्रकाराचा समारोप सूर्याच्या प्रार्थनेने होतो असे उमरी येथील डोमाजी कापगते खडीगंमत सादर करणारा तत्कालीन शाहीराने सांगीतले आहे.

लेखकः डॉ.प्रकाश खांडगे
लेखाचा मूळ दुवा

1 comment:

  1. लावणी लोकप्रिय करणार्‍या पवळा हिवरगांवकर ची दुर्लक्षित माहिती

    http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-on-pawala-hiwargaonkar-by-sagar-bhalerao-divya-marathi-4544787-NOR.html

    ReplyDelete