Tuesday, May 15, 2012

चीन

चीनबरोबरच्या आपल्या तंट्याचा शेवट कसा होईल? या सुधीर काळे यांच्या या ब्लॉगवरील लेखाच्या अनुषंगाने जो वैचारिक संवाद झाला त्यात मी मांडलेली मते :


हिएतनाम आपल्याबरोबर ठामपणे उभा राहील कीं बलवान शत्रूपुढे नांगी टाकून पळ काढेल?

चीन या समुद्राच्या खूपच मोठ्या भागावर सार्वभौमत्वाचा दावा करतो पण अलीकडे या समुद्रावर चीनसारखाच व्हिएतनामही दावा करू लागला आहे.

सुधीर काका वरील २ मुद्द्यांबाबत थोडेसे मत-

१.
व्हिएतनाम हा नांगी टाकून पळ काढणारा देश नाहिये हे इतिहासातून सिद्ध झालेले आहेच. प्रदीर्घ काळ चाललेल्या व्हिएतनाम युद्धात अमेरिकेची जगापुढे चांगलीच नाचक्की झालेली आहे. असे असले तरी सध्याच्या व्हिएतनामी शासनव्यवस्थेत अमेरिकेचे हितसंबंध गुंतलेले आहेच. भारत हा स्वावलंबी व समर्थ देश असला तरी आक्रमण ही त्याची संस्कृती नाहिये हे देखील जगाला माहिती आहे. एव्हाना चीनने पाकीस्तानला गुदगुल्या करायला सुरुवात केली असल्यामुळे आपल्या ऐन वेळी दगा देण्याच्या प्रवृत्तीच्या पाकीस्तानने उघड उघड अमेरिकेला झटकून टाकायला सुरुवात केली आहे. अमेरिकेवर आर्थिक मदतीवर अवलंबून असणार्‍या पाकीस्तानकरिता अमेरिकेचे महत्त्व आता संपत आले आहे. त्यामुळे अमेरिकेने मदत बंद केली तरी चीनसारखा शक्तीशाली देश उघडपणे पाकीस्तानच्या बाजूने जातो आहे. अमेरिकेला शह देण्याचा हा चीनचा प्रयत्न यशस्वी झाल्यात जमा आहे.

पाकीस्तान आणि चीन या दोघा राष्ट्रांतील कुटील संस्थांमध्ये असा करार झालेला असण्याची देखील शक्यता आहे की पाकीस्तानला काश्मीर मिळवून देण्यात चीनने मदत करावी आणि पाकीस्तानने भारताला अस्थिर करण्याची भूमिका अधिक कार्यक्षमतेने बजावावी. उद्या युद्ध सदृश परिस्थिती (जी चीन पुढे निर्माण करणारच आहे) उद्भवलीच तर चीनला थेट आखाती देशांतून पाकीस्तानमार्गे तेलाचा हवा तितका साठा मुबलक प्रमाणात मिळवता येणार आहे. अलिकडेच चीनने पाकीस्तानच्या एका बंदरापर्यंत थेट रेल्वेमार्गाने जोडणी केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून चीनने आंतरराष्ट्रीय बाजारांतून तेलाची खूप मोठ्या आणि वाढत्या प्रमाणावर खरेदी केलेली आहे. चीनने अलिकडेच पाठवलेले अवकाशस्थानक हा देखील या योजनेचा भाग आहे. अंतराळातून थेट भारतावर नुसता डोळाच ठेवण्यापेक्षा चीनच्या हद्दीत भारतीय वायुसेनेला वा सैन्यातील कोणत्याही दलाला प्रवेश करण्यापासून सहज रोखता येणार आहे. चीनने स्वतःच्या या अंतराळस्थानकांतून अण्वस्त्रे भारतावर रोखली तर भारताची काय तयारी आहे?

चीनचे म्हणाल तर चीन अगदी आजही युद्धाला पूर्ण तयार आहे. भारताची ही तयारी आहे काय? तर त्याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. भारताच्या राजकारण्यांना पंचवार्षिक योजनांमध्ये काम करण्यातच धन्यता लाभते त्यामुळे अगदी मोक्याची ठिकाणे देखील आज आपण हवी तेवढी सुरक्षित नाही करु शकलेलो. वर्तमानपत्रांतून योजना २०२० , २०२५ अशी वर्षे गृहीत धरुन जाहीर झालेल्या वाचावयास मिळतात. भारताला समुद्रातील बेटांची सुंदर देणगी लाभलेली आहे. अंदमान निकोबार बेटांवर हवाई तळ असला तरी त्याचे सामर्थ्य चीनच्या बलाढ्य वायुदलाच्या तुलनेत किरकोळच आहे. इतिहासात आपण चीनला दणके दिले असले तरी इतिहासात रमून चालणार नाही. चीनचे सध्याचे धोरण पाहता अतिशय संथपणे आपल्या सावजाभोवती जाळे विणून त्याला गिळंकृत करण्याची प्रवृत्ती वाढीला लागली आहे. तिबेट हे उत्तम उदाहरण आहे. पन्नास हजार तिबेटींना भारतात आश्रय दिल्यानंतर तिबेट हा चीनचा सार्वभौम भाग आहे हे भारताने मान्य करणे यातच आजच्या राजकारण्यांचा षंढपणा दिसून येतो. ज्यांनी भ्रष्टाचाराने देशाला विकायला काढले आहे अशा सत्ताधारी नेत्यांकडून देशाच्या सुरक्षेबद्दल गंभीरपणे कार्यवाही करण्याची अपेक्षा सामान्य जनतेने करणे हेच चुकीचे आहे.
थोडे विषयांतर झाले पण हा मुद्दा कळीचा व महत्त्वाचा आहे.

२.
राहिले "चीन या समुद्राच्या खूपच मोठ्या भागावर सार्वभौमत्वाचा दावा" बद्दल तर ते चीन फक्त स्वतःच्या लष्करी व आर्थिक शक्तीच्या जोरावर करतो आहे. त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने व शेजारी राष्ट्रांनीही भीक घालण्याची गरज नाही. कारण सुधीर काकांनी दिलेला नकाशा बघूनच कळते की चीनपेक्षा अधिक हक्क कोणत्या राष्ट्रांचा आहे ते हास्य


नकाशामुळे चीनचे विनाकारण चाललेले आकांडतांडव सहजच ध्यानात येते. खूप सोप्या पद्धतीचे नकाशे तुम्ही दिले आहेत. आणि शिवाय ओएनजीसी व तत्सम भारतीय कंपन्यांनी ज्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आहे त्याचा तर चीनशी दूरान्वयानेही संबंध दिसत नाहिये.

शेर पंतप्रधानाच्या बाबतीत तुम्ही म्हणता ते खरे आहे.
दुर्दैवाने भारताकडे आज असे सक्षम नेतृत्त्व नाहिये.
नरेन्द्र मोदी यांनी चीनला भेट देण्याचे कारण वेगळेही असू शकते.
कदाचित चीनने एवढी प्रगती कशी केली?, स्वस्तात उद्योगधंदे कसे निर्माण केले? ज्या मॉडेलचा वापर मोदींना भविष्यात करता येऊ शकेल. वस्तुस्थिती माहित नसताना हे इमॅजिनेशन करण्यात अर्थ नाही. हास्य
सध्याच्या राजकारणात मोदीच भारताला बलवान नेतृत्त्व देण्यास थोडे फार सक्षम दिसत आहेत. इतर नेत्यांमध्ये तेवढा दम नाहिये. युद्धसद्दृश परिस्थिती आली की शेपूट घालतील हे सगळे नेते.

चीनशी कोणत्याही प्रकारचे संबंध चीनचा विस्तारवादी दॄष्टीकोन बदलत नाही तोपर्यंत घातकच आहे.
परवाच्याच सकाळ मध्ये बातमी होती की चीन आणि भारत एकत्र रित्या युद्ध अभ्यास करणार आहेत.

आता याला कोणता करंटेपणा म्हणायचा? एकत्र युद्धाभ्यास करुन आपल्या क्षमतेची, युद्धकौशल्याची आणि युद्धमर्यादांची प्रत्यक्ष शत्रूला माहिती पुरवायची. बर हा युद्ध अभ्यास चीनमध्ये झाला असता तर आपण थोडे तरी म्हणू शकतो की भविष्यकालीन युद्धात त्याचा उपयोग होईल. पण भारतातच हा युद्धाभ्यास करण्याचे औचित्य काय? याचे कारण हा कार्यक्रम ठरवणारे कूटनितीतज्ज्ञ देऊ शकतील काय?


या भांडवलशाहीवाद्यांना चीन कधी भीक घालणार नाही. पण थोडा इथे धोका आहे. चीन स्वावलंबी होईल ते आपल्याच फायद्याचे होईल असे मात्र मला वाटत नाही. का त्याचे कारणही सांगतो. चीनचे वैचारिक धोरण पाहिले तर आस्ते आस्ते तो आपली शक्ती वाढवत होता. शक्ती वाढल्यावर चीनने त्याचे पंख पसरवायला सुरुवात केली आहे. हाँगकाँग ताब्यात घेताना केलेल्या दर्पोक्ती आठवत असतीलच. त्यानंतरचे ताजे उदाहरण तिबेट गिळंकॄत केला. आपल्या करंट्या राजकारण्यांनी तिबेटच्या खुनाला जाहीर मान्यता दिली. अगदी १०० % नसले तरी ९५% तिबेटवासी तरी चीनच्या विरोधातच होते. आजही त्यांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरु दलाई लामा स्वतःच्या देशात पाय ठेवू शकत नाही.

पुढचा मुद्दा चीनने घेतला आहे तो तैवानचा तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे आणि त्याने चीनमध्ये सामील व्हावे यासाठी चीनने प्रचंड दबाव टाकला होता. पण तैवान अजूनही चीनच्या विरोधातच उभा आहे. अलिकडेच अमेरिकेने तैवानला प्रचंड मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विकली त्यावर चीनने प्रचंड विरोध केला होता. कारण अमेरिकेच्या या कूटधोरणामुळे तैवान गिळण्याचे चीनचे मनसुबे लांबणीवर पडले.

तैवान मोहीम थंड पडल्यावर चीनने व्हिएतनाम मोर्चा उघडला आहे.

भारत अजूनही अक्साई चीन मुक्त करु शकला नाही.

जास्तीत जास्त जमीन बळकावणे हा ज्या देशाचा प्राथमिक हेतू आहे त्या देशाकडून भारताला धोका नाही , ते ही भारत हे शेजारी राष्ट्र असल्यामुळे, हे अजिबात शक्य वाटत नाही.

तवांग, अरुणाचल प्रदेश हे आमचेच आहेत हे चीनने आधीही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
आता तर अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांचेच चीन ब्रेनवॉशिंग करतो आहे. ही बातमी वाचली की डोक्यात संताप आल्याशिवाय रहात नाही. तुम्ही मंगोलियन वंशाचे आहात त्यामुळे तुम्ही चीनीच आहात असे त्यांच्या मनावर बिंबवले जाते आहे. ही पावले शांततेच्या दॄष्टीने नक्कीच जात नाहियेत.

अर्थात चीनला भारताबरोबर युद्ध अजिबात परवडणारे नाहिये हे ही तितकेच खरे आहे. युद्धामुळे चीन कित्येक दशके पुन्हा मागे जाईन. भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध चीनपेक्षा जास्त विश्वासार्ह आहेत. तुम्ही म्हणता तसे मानवशक्तीची क्रयशक्ती ओळखून तिचा व्यवहारात उपयोग करणे' ही गोष्ट अजूनही भारताने युद्धपातळीवर अंमलात आणली तर येत्या ५-१० वर्षांत चीनला दहशत बसेल अशी वाटचाल आपण करु शकू. पण हे धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणार्‍या थिंक टँकला कळायला हवे.
तसेच चीनचे इतरही आघाड्यांवर त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. झिन्जिआंग प्रांत चीनसाठी डोकेदुखी ठरतो आहे. तसेच देशांतर्गत विरोधही वाढतो आहे. पण चीन दडपशाहीच्या जोरावर हे सर्व नियंत्रित करतो आहे. जास्तीचे दुखणे चीनच्या महत्त्वाकांक्षांना पायबंध घालू शकेल.

युद्ध पेटल्यावर इतर देश आपल्या बाजूने लगेच उभे राहतील ही अपेक्षा करणेच मुळी चूक आहे.

कारण जगातल्या शक्तीशाली म्हणवल्या जाणार्‍या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या चीनच्या हातात आहेत.
उदा: एकट्या चीन ने स्वतः कडील सगळे अमेरिकेचे चलन विक्रीस काढले तर अमेरिकेच्या डॉलरची पत आंतरराष्ट्रीय बाजारात निम्म्याहून कमी होईल. याचा दुसरा अर्थ असा की अमेरिकन अर्थव्यवस्था पार कोसळून जाईल.
दुसरे असे की अमेरिका हा उत्पादन निर्माण करणारा देश कधीच नव्हता. तेव्हा अमेरिकेला रोज लागणार्‍या बहुसंख्य वस्तू चीनवरुनच तयार होऊन येतात. मालाचा हा पुरवठा चीन एकदम अडवू शकतो, तेव्हा अमेरिकेला केवळ लष्करी रुबाबवर भारताच्या बरोबर लगेच येता येणार नाही. हे चीन आणि अमेरिका दोघेही ओळखून आहेत. भारताचे खरे मित्र कोण? तर याचे उत्तर खूप अवघड आहे. ब्रिटन अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर आहे. तेव्हा तीही अपेक्षा करणे चुकीचे आहे. युरोपियन देश सध्या प्रचंड आर्थिक तंगीच्या तणावातून जात आहेत. तेव्हा युद्ध कोणत्याही देशाला उपयोगी पडणार नाहियेत.

याउलट चीनची गोष्ट आहे. पाकीस्तानला स्वतःचे दूध पाजून चीन ने मिंधे करुन ठेवले आहे. आणि आखाती देशांकडून पाकीस्तानमार्गे मदत मिळवण्याचा मार्गदेखील चीनने तयार ठेवला आहे. चीनला कोणा मित्र राष्ट्रांची गरजच नाहिये एवढा तो स्वयंपूर्ण आणि शक्तीशाली आहे.

त्यामुळे मानवतेच्या दॄष्टीकोनातून देखील कोणतेही राष्ट्र भारताच्या मदतीला लगेच येईल ही शक्यता मला तरी धूसर वाटते आहे. स्वतःचे घर उघडे करुन दुसर्‍याचे घर कोणी झाकायला जात नाही हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला न्यायच आहे. तेव्हा युद्ध झालेच तर ते स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवरच आपल्याला लढायला लागणार आहे.
चीनने भारताविरुद्ध युद्ध जाहीर केले की पाकीस्तानने आपले सैन्य लगेच काश्मीरमध्ये घुसवलेच समजा.

शेजारी राष्ट्रांशी शत्रूत्व भारताला केवळ आणि केवळ स्वतःच्या क्षमतेवरच लढून जिंकावे लागणार आहे. नाहीतर भारताच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण होऊ शकेल.

अर्थात युद्ध झालेच तर ते चीन दीर्घ काळ चालवेल असे मलाही नाही वाटत. अरुणाचल प्रदेश व जेवढ्या भूभागाची तहान चीनला आहे तेवढा भाग बळकावला की चीन (पुढील योजना निर्माण होईपर्यंत) थांबेल. कारण इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारताने जगाला आपल्या बौद्धीक संपदेने दिपवून टाकले आहेच. त्यामुळे भारताशी मोठे युद्ध कोणी करु लागले तर मात्र अमेरिका व युरोपियन देश मधे पडून समेट घडवतील. कारण भारताच्या मोठ्या युद्धामुळे या देशांना तंत्रज्ञान क्षेत्रात कित्येक दशके मागे जावे लागेल. ते कोणालाही परवडण्यासारखे नाहिये.


No comments:

Post a Comment