पहिले स्वातंत्र्यसमर
१८५७ साली सुरु झालेच नव्हते. तर इंग्रजांविरुद्ध पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात सिद्धू - कान्हू
या दोन भावांच्या नेतृत्त्वाखाली १८५५ सालीच झाली
होती.
इंग्रजांच्या
जुलमी राजवटीपासून सुटका
मिळवण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात
१८५७ साली
झाली होती असा
सर्वसाधारणपणे समज आहे.
पण हा समज निखालस चुकीचा आहे. १८५७ चे स्वातंत्र्य समर सुरु होण्याच्या अगोदरच साधारणपणे
दोन-अडीच वर्षे अगोदर ३० जून १८५५ रोजी एक ठिणगी (सध्याच्या) झारखंडात पेटली होती. किंबहुना १८५७ च्या युद्धाचे
लोण भारतभर पसरण्याचे मुख्य श्रेय या १८५५ च्या उठावाला जाते. (सध्याच्या) झारखंडात
असलेल्या संथाल या परगण्यात सिद्धू आणि कान्हू या दोन भावांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या
इंग्रजांविरुद्धच्या या लढ्यामुळे इंग्रजांना खूप मोठी हानी सोसावी लागली होती. संथाल
विद्रोह म्हणून हा उठाव इंग्रजांच्या कागदपत्रांमधून नोंदवला गेला आहे. या उठावाच्या
यशामुळेच १८५७ सालापर्यंत स्वातंत्र्ययुद्धाचे लोण भारतभर पसरले. त्यामुळे १८५७ पासून
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात झाली असा जो समज आतापर्यंत होता तो चुकीचा आहे
हे या 'संथाल विद्रोहा'मुळे स्पष्ट होते.
हा १८५५ चा उठाव कसा,
कोठे आणि कोणामुळे झाला हे आता पाहूयात. म्हणजे हा उठाव केवढा मोठा होता आणि याचे महत्त्व
केवढे होते हे वाचकांच्या लक्षात येईन.
(सध्याच्या साहेबगंज
जिल्ह्यामधील) भगनाडीह गावापासून सुरुवात झालेल्या या विद्रोहाच्या वेळी सिद्धूने घोषणा
केली होती - "करो या मरो, अंग्रेजों हमारी माटी छोडो". या घोषणेमुळे क्रांतीकारकांच्या 'करेंगे या मरेंगे'
या घोषणेचा उगम कोठे होता हे लगेच लक्षात येते. नागपुरी साहित्यिक व इतिहासकार बी.पी.
केशरी सांगतात की हा विद्रोह संथाल परगण्यातील समस्त गरिब आणि शोषित झालेल्यांचा अत्याचार
करणार्या इंग्रजांच्या आणि त्यांच्या कर्मचार्यांच्या विरोधातील स्वातंत्र्य लढा
होता.
या आंदोलनाचे स्वरुप
केवढे विराट होते याची कल्पना यात सामील झालेल्या लोकांच्या संख्येमुळे येते. संथाल
विद्रोह हा इंग्रजांच्या सत्तेविरुद्धचा सशस्त्र लढा होता. ३० जून १८५५ रोजी भगनाडीह
येथे ४०० गावांतील लोक पारंपारीक शस्त्रे घेऊन जमा झाले आणि या आंदोलनाची सुरुवात झाली.
भगनाडीह येथे झालेल्या सभेत घोषणा करण्यात आली की आता त्यांच्यापैकी कोणीही मालगुजारी
इंग्रजी सरकारला देणार नाही. या घोषणेनंतर सिद्धू आणि त्याच्या तीन भावांना पकडण्याचे
आदेश इंग्रज सरकारने दिले. पण ज्या विभागीय पोलिस इन्स्पेक्टरला इंग्रजांनी या चार
भावांना अटक करण्यासाठी पाठाले होते त्याचे मुंडके प्रक्षुब्ध झालेल्या आंदोलकांच्या
जमावाने उडवले. या क्रांतीमुळे इंग्रजांची संथाल परगण्यातील सत्ता जवळपास संपुष्टात
आली.
इंग्रजांच्या या मोठ्या
पराभवाने संथाल परगण्यातील ४०० गावांच्या मोठ्या जमावाने जणू अवघ्या भारताला संदेशच
दिला की आपण सर्व एकत्र आलो तर या इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावणे शक्य आहे.
पुढे या संथाल विद्रोहाचेच पडसाद अवघ्या भारतात उमटले.
या पराभवाने चवताळलेल्या
इंग्रजांनी पुढे संथाल परगण्यावर लष्करी हल्ला केला. या सैन्य कारवाईत त्यांनी कित्येक
लोकांना अटक केली व विरोधासाठी जमा झालेल्या जमावावर अमानुषपणे गोळीबार करुन असंख्य
लोकांची हत्या केली गेली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी इंग्रजांना संथाल परगण्यात
मार्शल लॉ लावावा लागला होता. एवढेच नव्हे तर आंदोलकांमध्ये फूट पाडण्यासाठी आंदोलकांची
माहिती देणार्यास रोख रकमेच्या पुरस्कारांची घोषणाही केली गेली होती
भारताच्या स्वातंत्र्य युद्धास सुरुवात करुन देणार्या या संथाल परगण्यातील लोकांच्या शौर्याचे स्मरण पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे प्रणेते असे म्हणूनच आपण केले पाहिजे.
धन्यवाद
- सागर
No comments:
Post a Comment