Wednesday, July 31, 2013

स्वतंत्र तेलंगण राज्यनिर्मितीच्या निर्णयाचा निषेध



काल तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि मन विषण्ण झाले.
काही संधीसाधू नेत्यांच्या इच्छेखातर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली.
तसे पाहता सर्वसामान्य माणसांना तेलंगणा झाला काय आणि आंध्र प्रदेशातच राहिले काय याच्याशी काही सोयरसुतक नसते.
ही सगळी विकतची दुखणी आहेत. नाहीतर स्वतंत्र भारतात कुठेही जाऊ शकणार्‍या भारतीय नागरिकाला एका राज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडावे लागते यातच खर्‍या लोकशाही व्यवस्थेचे वाभाडे काढले गेलेले आहेत. इथे आपल्याला आपल्या शेजार्‍यांशी , मित्रांशी आणि नातेवाईकांशी व्यवस्थित वागता - राहता येत नाही. तिथे देशाचे जास्तीत जास्त तुकडे पाडून काय साध्य होणार आहे? आज महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र विदर्भाचा विचार करतो आहोत. उद्या कोकण होईल मग अजून ५०-१०० वर्षांनी स्वतंत्र सातारा, स्वतंत्र कोल्हापूर, स्वतंत्र पुणे, स्वतंत्र मुंबई अशी भांडणे लागतील. फाळणीला अंत नाही. करु तितके तुकडे होतील... करता येतील... पण मनांचे तुकडे पडत आहेत त्याची पर्वा कोण करतो? राजकारणात एवढ्या खालच्या पातळीवर नेत्यांनी जाणे आणि विरोध करत असलेली बहुसंख्य जनता मूग गिळून गप्प बसणे हे खरोखर जिवंत लोकशाहीचे लक्षण नाहिये.

प्रशासनिक सुविधेसाठी राज्याची निर्मिती केली गेली असे कदाचित आता बोललेही जाईल. पण ते खरे नाही. उत्तर प्रदेश सारख्या मोठे क्षेत्रफळ असलेल्या राज्यातही ही अडचण होतीच की. अनेक वर्षांच्या अडचणीतून प्रशासनिक अधिकार्‍यांनी वेळोवेळी राज्यसरकारांना त्यांच्या शिफारसी पाठवूनही प्रत्यक्ष कृती होत नव्हती. पण मायावती मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तर प्रदेशचे तुकडे करण्यासाठी नवीन राज्यांची निर्मिती केली. अर्थात पुढे त्याचे राजकारण झाले आणि प्रस्ताव मंजूर झाला नाही. पुढे मुलायम सुपुत्राच्या नव्या सरकारने त्याचा यथास्थित जांगडगुंता करुन ठेवला. असो तो विषय येथे अप्रस्तुत आहे.

आजच्या सुधारलेल्या(?) भारतात तेलंगणाची निर्मिती एक मोठे सामाजिक वादळ निर्माण करणार आहे. आज तेलंगणा राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे उद्या विदर्भ, गोरखालँड , बोडोलँड, इ... अनेक तुकड्यांची मागणी कधी नव्हे तितका जोर धरणार आहे. काँग्रेसच्या राजवटीत झालेली देशाची फाळणी हा देशाला जसा कधीही भरुन न येणारा काळजाचा घाव पाकीस्तान व बांगलादेशाच्या निमित्ताने देऊन गेला आहेच. त्याच प्रमाणे तेलंगणा राज्याची निर्मिती भारताला एका वेगळ्याच विनाशपर्वात आणि द्वेषाच्या जगात घेऊन जाणार आहेत.

तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यामुळे अखंड आंध्र प्रदेशचे समर्थक नेहमीच तेलंगणावासियांना पाण्यात पाहतील. तर कडवे तेलंगण राज्याचे समर्थक उरलेल्या आंध्राच्या लोकांना. फाळणी ही कायमच द्वेष निर्माण करते. त्याच प्रमाणे २०१४ च्या निवडणुकांच्या अगोदर काँग्रेसने तेलंगणाच्या निर्मितीला (खरे तर वणव्यात) हात घालून स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न केला आहे. आंध्र प्रदेशचा तुकडा पाडण्याचा पराक्रम काँग्रेसच्या अंगलट येत्या निवडणुकीत येणार हे नक्की.

स्वतंत्र तेलंगण राज्य हव्या असलेल्या नेत्यांनी जो दबाव सरकारवर निर्माण केला तो अवघ्या जनतेचा दबाव आहे असे काँग्रेसने गृहीत धरले. आणि लोकशाही मानणार्‍या स्वतंत्र भारतात ही मोठी चूक ठरली. तेथील स्थानिकांना जे हवे त्याची शहानिशा न करता दिल्लीतील एका आलिशान मिटींग रुम मधे स्वतंत्र तेलंगण राज्य जन्माला घालण्यात आले. धोरणात्मक निर्णय घेण्यात कायमच अकार्यक्षमता दाखवणार्‍या काँग्रेसने तेलंगण राज्यनिर्मिती विषय ज्या पद्धतीने हाताळला तो अतिशय खेदजनक आहे. हुकुमशहाने राबवलेले निर्णय आणि काँग्रेसने एकछत्री कारभार करुन राबवलेले असे कित्येक निर्णय लोकशाही पायदळी तुडवणारे ठरले आहेत. स्वतंत्र तेलंगणची निर्मिती जनमत तपासूनही करता आली असती. किंबहुना तोच खरा सनदशीर व लोकशाहीचा मार्ग आहे.

घटनेने एकच कायदा लागू असलेल्या भारताच्या नागरिकांमध्ये द्वेषाची रेषा आखणार्‍या कॉंग्रेसच्या स्वतंत्र तेलंगण राज्यनिर्मितीच्या निर्णयाचा मी निषेध करतो. आणि भारतात खर्‍या अर्थाने लोकशाही स्थापन होवो ही त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करतो. लोकशाहीच्या बुरख्याखाली हुकुमशाही चालवणार्‍या पक्षाच्या मनमानी कारभारापेक्षा सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणारी हुकुमशाही केव्हाही चांगली. पूर्वीच्या काळी राजे आपल्या राज्यात कोणी दु:खी , कष्टी वा उपाशी नाही ना हे पाहण्यासाठी वेष पालटून सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळत असत. आणि तातडीने लोकोपयोगी कृती करत असत. त्या युगाची उगाचच आठवण झाली

- सागर

3 comments:

  1. तेलंगण वेगळे राज्य असावे कि नाही हा स्थानिक प्रश्न आहे असे मला वाटते. पण सत्तेचे विकेंद्रीकरण याला मात्र माझा पूर्ण पाठींबा आहे. तसेच खेड्यांना - गावांना स्वायत्तता दिली पाहिजे किंवा "त्यांनी ती घेतली पाहिजे" याचा मी पुरस्कर्ता आहे. गांधीजींचे 'पंचायती राज्य' या संकल्पनेचा राजकारणी लोकांनी व पक्षांनी बोजवारा उडवलेला आहे. मग तेलंगणाचे मोठेसे काय?

    ReplyDelete
  2. खरंय रेमी... तेलंगण हा नक्कीच स्थानिक प्रश्न आहे. पण तेलंगणची निर्मिती ही स्थानिक पातळीपेक्षा राजकीय पातळीवर जास्त झालेली आहे. म्हणूनच माझा या गोष्टीला विरोध आहे. आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाला माझेही समर्थन आहे. पण ते प्रशासकीय स्वरुपावर असावे. देशाच्या आतल्या नकाशावर नुसत्या रेघोट्या ओढण्याच्या पद्धतीवर माझा आक्षेप आणि विरोध आहे. कोणा राजकीय नेत्याच्या लहरीपणावर अशा राज्यांच्या निर्मितीमुळे देशाची वाटचाल प्रगतीपेक्षा आत्मघाताकडे जास्त वेगाने होईल. बेळगाव प्रश्न चिघळत ठेवण्याचे प्रमुख कारण राजकीयच आहे. आणि त्याची फळे लाखो मराठी कुटुंबे भोगत आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. मी या मताशी सहमत आहे. मग विकेंद्री करणाची सुरवात कोठे व कशी करायची हा प्रश्न उरतोच. याला एकाच पर्याय आहे : ही सुरवात स्वत:पासून करायची - व्यक्तिगत पातळीवर, असं मला मनापासून वाटते. हे समष्टीच्या थरावर कसे जाईल? इथे भावूकपणाला आणि व्याक्तीनिष्ठेला वाव नाही. राजकारणी लोक याला कधीच मान्य करणार नाहीत. कारण त्यांचे हितसंबंध सत्तेशी जोडलेले असतात. पण आम्हाला वस्तुनिष्ठा सहसा पचत नाही.

      Delete