Friday, February 21, 2014

राजीव गांधींचे मारेकरी सोडण्यामागचे कारण




राहुल गांधी म्हणतात की ज्या देशात पंतप्रधानाला न्याय मिळू शकत नसेल तर सामान्य नागरिकाला कसा मिळणार?

राजकारणात डोके गहाण ठेवून आल्यावर असे राहुल गांधीच म्हणू शकतात.

म्हणजे यांना फक्त क्लास वन लोकांचीच चिंता आहे.

अरे राहुलबाबा किमान असे म्हणाला असतास तर तुझी पत तरी वाढली असती की,
'सामान्य माणसाला ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी पंतप्रधानांना न्याय मिळण्याची मला खात्री असेल व राजीव गांधींचे खुनी सोडण्याची वेळच येणार नाही'

कधी सुधारणार हे कार्ट देवच जाणे...

असो, मुद्दा असा की जयललिताबाईंचे काही चुकले आहे असे मला वाटत नाही.
फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली तर आपल्या देशात ती २५ वर्षे असते. मरेपर्यंत जन्मठेप ही ब्रिटिशांची कन्सेप्ट होती.
अगोदरच साडे-तेवीस वर्षे राजीव गांधींच्या खुनाच्या कटातले लोक तुरुंगात होते. आणि न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलायला ११ वर्षे लावली या चूकीचे परिमार्जन म्हणून पुढची अडीच वर्षे माफ करुन जयललिताबाईंनी खरे तर न्यायालयीन कार्यप्रणालीच्या थोबाडीतच मारली आहे. एक निर्णय करायला ११ वर्षे ? मग तमिळ अस्मितेचा आपला मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीत अधिक प्रखरपणे मतदारांच्या मनावर बिंबवायला ही बया संधी का सोडेल?

दुसरीकडे काँग्रेसचे गणित कळतच नाही.
आई गुन्हेगारांना भेटून येते आणि सौम्य भूमिकेचा पाठपुरावाही करते. दुसरीकडे मुलगा बोंब मारतो. हे भरीत मतदारांच्या पचनी तरी पडेल की नाही? याचा थोडे तरी विचार करायचा?
आम आदमी पार्टीने जसे केले तसेच लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस स्वतःच्या हाताने घाण करते आहे. देव त्यांचे भले करो.

 -----------
हा मुद्दा देशाच्या अस्मितेचा आहे का? तर नक्कीच आहे. पण त्या अस्मितेचा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाहिये.
राजीव गांधी हे चुकीच्या परराष्ट्रकारणाचे बळी ठरले

-------------

राजीव गांधींची हत्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यावरील हल्ले  या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
तमिळ इलम वा तत्कालीन तमिळ अस्मितेने भारलेले लोक राजीव गांधींच्या विरोधात उठले कारण श्रीलंकेत होणार्‍या तमिळ बांधवांवरील अत्याचारांकडे काणाडोळा करुन श्रीलंकेला भारताने मदत केली. एलटीटीई चा उदय या अन्यायाच्या उद्रेकातूनच झालेला होता हे विसरुन चालणार नाही. भारताचे परराष्ट्र धोरण काँग्रेस राजवटीत नेहमीच पुळचट किंवा पळपुटेपणाचे राहिलेले आहे. मग ते पाकीस्तानविरुद्धचे युद्ध जिंकून आपले सैन्य माघारी घेण्याची घाई असो (या चुकीमुळे आजही मोठ्या भूभागाला आपल्याच मालकीच्या भूभागाला आपण पाक-व्याप्त काश्मीर म्हणून ओळखतो)
किंवा मग चीनवर दाखवलेला आंधळा विश्वास असो (हिंदी चीनी भाई भाई ने पाठीत सुरा कसा खुपसला हा आजही जगात आपल्या दूरदृष्टीच्या अभावाचे उदाहरण ठरलेले आहे. अथवा मग चीनने बळकावलेली भूमी असो ( सियाचीन या नावाने आपण आपलाच भूभाग ओळखत आहोत.) अरुणाचल प्रदेशातही चीन तवांग प्रांताच्या आजूबाजूला भूभाग बळकावण्याचे प्रयत्न करतो आहे. नक्षलवादी चळवळ आज देशात बंगाल , ओरिसा, आंध्र प्रदेश , महाराष्ट्र , कर्नाटक ते केरळ अशी तिरपी रेष निर्माण करत आहे. या भू भागात आजही कोणी उघडपणे जाऊ शकत नाही. कित्येक हजार गावे आज नक्षलवाद्यांच्या हातात आहेत.
काश्मीरातून हजारो स्थानिकांना निर्वासित व्हावे लागले तेव्हा सरकार काँग्रेसचेच होते. पण त्यांना हा मुद्दा गंभीर वाटला नाही. शिखांचे हत्याकांड झाले तेव्हाही काँग्रेसचे सरकार होते. नक्षलवादाचा जन्म काँग्रेसच्या राजवटीतला आहे. लाखो बांगलादेशी नागरीक आज काँग्रेसच्याच कृपेने भारताचे अधिकृत नागरीक झालेले आहेत.
वाजपेयींच्या काळात किमान आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत सुधारण्याचे काम तरी केले. ते काँग्रेसला कधीच जमले नाही. देवयानी खोब्रागडे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले त्यावरुन हे लक्षात यावे.
शांततेने जगता येणे हे जरी एका स्वप्नासारखे असले व आपण त्या दिशेने प्रयत्न करतो आहोत. तरी चीन व पाकीस्तान सारखे शेजारी असताना डोळ्यांवर पट्टी बांधून घेणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात सबळ तोच टिकेल व जगेल हा निसर्गाचा नियम लागू होतो. चीन ने हिमालय फोडून भुयारी मार्ग सियाचीन व पाकव्याप्त काश्मीर मधे तयार केले. चीनचा रेल्वेमार्ग थेट इराणच्या ग्वादर बंदरापर्यंत पोहोचला जेथून चीन इराणचे तेल थेट चीन मधे विनाकष्ट नेऊ शकतोच. पण भारताचा प्रमुख तेल सप्लायर इराणचा संपर्कही तोडू शकतो. उद्या चीनशी युद्ध झाले तर भारताला ते परवडेल? चीन म्हणेल त्या अटींवर भारताला सह्या कराव्या लागतील. असो हा विषय मोठा आहे.
पण राजीव गांधीची हत्या ही देशाच्या पंतप्रधानाची हत्या होती. आणि ती याच देशाच्या लोकांनी केली (कोणा बाहेरच्या लोकांनी नव्हे.) राजीव गांधींनी तमिळांचे प्रश्न देशाची जनता या नात्याने समजून घेतले असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. चूकीच्या परराष्ट्रधोरणाचे राजीव गांधी बळी ठरले. श्रीलंकेसोबत सौम्य भूमिका घेऊन ते चुकले. राजीव गांधींच्या काही दूरगामी धोरणांची फळे आजही आपण चांगली मिळवतो आहोत. पण परराष्ट्रकारणात काँग्रेस राजवट कायमच कमकुवत पडली हा इतिहास आहे.
मला हे मान्य आहे की एका रात्रीत देशाची प्रतिमा सबळ देश अशी होणार नाही. त्यासाठी कित्येक वर्षे, प्रसंगी दशकेही काम करावे लागते. काँग्रेसने ते आजपर्यंत कार्यक्षमतेने केले नाही हे खेदाने म्हणावे लागते आहे.