Monday, September 22, 2014

संस्कृत प्राचीन असेल तर ती पुराव्यांच्या कसोटीवर सिद्ध का होत नाही?


संस्कृतचे एवढे अवडंबर झाले की काही मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्षच झाले.
संस्कृत भाषेच्या अस्तित्त्वाचा प्रत्यक्ष पुरावा आहे तो इसवी सना नंतर चौथ्या शतकानंतरचा (तो ही ब्राह्मी लिपीतला) - तोपर्यंत संस्कृतला स्वत:ची आज आहे तशी देवनागरी लिपी अस्तित्त्वात नव्हती हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. उलटपक्षी प्राकृतचे ऐतिहासिक पुरावे इसवीसनापूर्वीच्या काळापासून मिळतात. अर्थात लिपी हा निकष भाषेला आवश्यक नाही मानता येणार. पण प्राचीन प्राचीन म्हणून ओरडणार्‍या संस्कृत प्रेमींसाठी हे माहिती करुन घेणे आवश्यक आहे की जी देवांची भाषा म्हणून समजली जायची तिला लिपी देखील उधार घ्यावी लागली होती.
संस्कृत भाषा म्हणून सुंदर आहे, अलंकारिक आहे यात वाद नसावा. पण त्याचे नसलेले प्राचीनत्त्व लादणे म्हणजे आपणच झूल स्वत:च्या डोळ्यांवर पांघरुन घेणे होय. डोळसपणे पुराव्यांच्या अभ्यासाने जे सिद्ध होते आहे ते मान्य केले जावे. संस्कृत प्राचीन आहे हे सिद्ध करणारे पुरावे आले तर मला वाटते की संशोधकही ते मान्य करतील. तेवढे चिकित्सक वृत्तीचे ते आहेत.
पण संस्कृतचे प्राचीनत्व सिद्ध करणारे मुळात पुरावेच नाहीत तर सिद्ध काय करणार? उलट सिंधु संस्कृतीचे प्राचीनत्व सिद्ध करणारी नाणी व लेख सापडलेले आहेत.
महाराष्ट्रात इसवी सनाच्या पहिल्या शतकात बृहत्कथा आणि पुढे दुसर्‍या तिसर्‍या शतकात सिंहासन बत्तीशी हे दोन अत्भुत ग्रंथ प्राकृत भाषेत निर्माण झाले (या दोन्ही ग्रंथांच्या संस्कृत पेक्षा प्राचीन असलेल्या प्राकृत प्रती सापडलेल्या आहेत) इसवी सनाच्या आठव्या शतकानंतर अचानक संस्कृत मध्ये भरपूर संपदा सापडू लागते. याचे प्रमुख कारण म्हणजे संस्कृत ही प्राकृत भाषेमधील साहित्य अनुवादीत करण्यासाठी वापरली जाणारी भाषा होती. सुदैवाने संस्कृत ग्रंथांचे जतन दक्षिण भारत , श्रीलंका , जावा, सुमात्रा बेटे अशा मार्गांनी झाले व मुसलमानी आक्रमणाच्या काळात विदेशात व दक्षिणेत खोलवर वाचलेल्या संस्कॄत प्रती सुरक्षित राहिल्या.
प्राकृत प्रभाव असलेले महाराष्ट्रासकट उत्तर भारतातले सर्व प्रदेश मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाल्यामुळे प्राकृत ग्रंथसंपदा टिकवू शकले नाहीत. तरी काही प्रती सापडल्या त्या जैन मुनी व बौद्ध श्रमणांकडे. त्यांनी त्या प्रतींचा वापर जैन व बौद्ध साहित्यांतून केला. तरी प्राकृताचे मूळ तेज लपणे शक्यच नव्हते. इसवी सनाच्या अकराव्या शतकात काश्मीरच्या सोमदेवभट्टाला जवळपास अकराशे वर्षांनी महाराष्ट्रात इसवी सनाच्या पहिल्या शतकांत निर्माण झालेल्या गुणाढ्य रचित 'बृहत्कथा' या महाकथांचा संस्कृत भाषेत रुपांतर करण्याचा मोह पडावा, यातच प्राकृतचे मोठेपण सिद्ध होते.
दुसरे असे की जी भाषा जनमानसात प्रचलित होती तीच राजभाषाही होती. महाराष्ट्रांतील सातवाहन काळातले (इसवी सन पूर्व २३० ते इसवीसन २२०) उपलब्ध शिलालेखही तत्कालीन मराठी प्राकृत भाषेतले आहेत हे लक्षात घ्यावे. संस्कृतचे प्राचीनत्व मान्य करायचे असेल तर जरुर करा. पण ते प्राचीनत्त्व वर दिलेल्या किरकोळ गोष्टींबाबत सिद्ध तरी होते का? हे ही तपासले जावे. एवढेच मला म्हणायचे आहे.

Sunday, June 15, 2014

जैतापूर अणु-उर्जा प्रकल्प "हवा' कि "नको'?

अणु उर्जा प्रकल्पाचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. फायदे मिळवताना आपल्या अस्तित्त्वावर घाला घालण्याची एक शक्यता जरी तोट्याच्या बाजूला येत असली तरी तिचा विचार हा व्हायला हवा.

जैतापूर प्रकल्पाच्या मूलभूत गोष्टींकडे दृष्टीक्षेप टाकल्यास काही प्रमुख बाबी लक्षात येतात. पण कोणालाही सक्षमपणे या प्रश्नांची उकल जनतेसाठी वा जनतेला करुन द्यायची नाहिये.
१. पश्चिम घाट हा जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. (त्याची जपणूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी उपलब्ध करुन दिला जातो) असे असताना जैतापूर सारख्या ठिकाणी अणुउर्जा प्रकल्प खूप मोठा धोक्याचा आहे.
२. अचानक कोणतीही दुर्घटना झाली तर संपूर्ण पश्चिम घाट धोक्यात येईल.
३. कोणताही अणुउर्जा प्रकल्प सुरु केल्यावर बंद करणे शक्य नसते.
४. दुर्घटना घडल्यास ती हाताळण्यासाठी कोणतीही प्रभावी व कार्यक्षम यंत्रणा आपल्या देशाकडे नाही.
५. जपान मध्ये फुकुशिमा मध्ये जे झाले ते जपान ने आपल्या तंत्रज्ञानाच्य बळावर रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही त्यात पूर्ण यश आलेले नाहिये. अजूनही फुकुशिमात काय होईल हे सांगणे अवघड आहे. अशा परिस्थितीला हाताळण्याची क्षमता आपल्याकडे नाहीये.
६. अणु उर्जा प्रकल्पात दुर्घटना झाली तर त्याचा आवाका खूप मोठा असेल. कोकणातील मासेमारी व्यवसाय नष्ट होईलच. पण महाराष्ट्राची राजधानी मुंबईला त्याची थेट झळ पोहोचेल. आणि अशा आपात्कालीन परिस्थितीत या घटनेची झळ पोहोचणार्‍यांची संख्या कोटींमध्ये असेल.
अशी आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आपण काय उपाययोजना करतो आहोत हे प्रभावीपणे या प्रकल्पाच्या प्रमुख अणु-वैज्ञानिकांसह कोणीही सांगितलेले नाहीये.
७.कोणताही अणु-उर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन वीज उत्पादन सुरु करण्यासाठी किमान २० वर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत सौर उर्जेचा पर्याय कमी खर्चात व कमी वेळेत उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाने हालचाल का केली नाही? 
८. दुर्घटना झाल्यास महाराष्ट्राची किनारपट्टी पुढील किमान १०० वर्षे गमवावी लागेल.

या सर्व बाबींचे समाधान करु शकण्याची कुवत व ताकद आपल्यात असेल तरच जैतापूर अणु प्रकल्पाला मूर्त रुप देण्यात यावे असे मला वाटते. अणु उर्जा अनियंत्रित झाल्यास तिला नियंत्रित करु शकण्याचे तंत्रज्ञान आज तरी आपल्याकडे नाहिये. भविष्यकाळात होईल या आशेवर हा अणुप्रकल्प सुरु करणे म्हणजे स्वतःहून विस्तवात उडी घेण्यासारखे आहे. भोपाळ मधील काळरात्र लोकांनी आठवली तर त्यांच्या लक्षात येईल की मी काय म्हणतो आहे ते.
दुर्घटना एकदाच होते. प्रश्न असा आहे की आपण त्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत का?
पारंपारिक उर्जा साधनांचा प्रभावीपणे वापर केला तर आपल्या देशाला उर्जेची टंचाई अजिबात जाणवणार नाही.
प्रश्न आहे तो नियोजनाचा आणि सक्षम नेतृत्त्वाचा.

Thursday, May 15, 2014

ऐतिहासिक निकालापूर्वी एक दिवस - १५ मे २०१४

आज १५ मे २०१४.
उद्या १६ मे २०१४ एक ऐतिहासिक दिवस.
भारताच्या नव्या सरकाराचे भवितव्य उद्या मतपेट्यांमधून बाहेर पडणार आणि एक नवे सरकार अस्तित्वात येणार. हे सरकार काँग्रेसचे येणार, की भाजपाचे येणार का तिसर्‍या आघाडीचे सरकार येणार हे संभ्रम आहेच. एक्झिट पोल मधून सर्व न्यूज चॅनेल्स 'अब की बार मोदी सरकार' हेच सांगत होते. उद्या खरी स्थिती स्पष्ट होईल हे खरे असले तरी एक्झिट पोल मधे बराच अर्थ आहे हेही तितकेच खरे आहे. अशी परिस्थिती का उद्भवली?

अनेक बुद्धीवंतांनी केलेले विश्लेषण खरे व्हावे असे वाटत असले तरी तसे होणार नाही असे माझी मनोदेवता सांगत आहे. कोणीतरी म्हणून ठेवले आहे की एका ध्येयाने पछाडलेल्या मोठ्या समूहापुढे दुसरा लहान समूह कितीही बरोबर वा तर्कसंगत असला तरी त्या लहान समूहाचा नाश हा ठरलेलाच असतो. संख्याबळ हेच अनेकदा घटनेला आकार देते. तद्वतच आपल्या देशातील जनतेचे आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे दुर्दैव कोणते असेल तर ते हे की येथील बहुसंख्य मतदार भावनेच्या भरात मतदान करतात बुद्धीच्या कसोटीवर नाही. सर्वसामान्य जनतेची बुद्धिची कसोटी आजही पोटातून जाते. काँग्रेस सरकारचे प्रमुख फेल्युअर काय असेल तर ते हे की त्यांनी देशातील बहुसंख्य गरिब जनतेला फुकटात कसे मिळत जाईल याची काळजी केली. स्वाभिमानाने जगायची इच्छा प्रत्येकाला असते पण तो स्वाभिमान सरकारी धोरणांतूनच अदृष्य आहे.
काँग्रेसच्या प्रमुख चुका:
१. सामान्य जनतेला दमदार आणि विश्वास देऊ शकणारे नेतृत्त्व त्यांच्याकडे यावेळी पूर्णपणे नव्हते
   मागच्या निवडणुकांत सोनिया गांधी जेवढ्या फिरल्या त्याच्या निम्म्याने तरी राहुल गांधी फिरले की नाही माहिती नाही. पण जनतेवर प्रभाव न सोडणारे व्यक्तीमत्त्व व गुण नसतानाही राहुल गांधी जनतेवर थोपवले गेल्याचे चित्र निर्माण झाले
२. महागाई  - गरिबाचे पोट विनातक्रार भरलेले असेल तर सत्तेवर काँग्रेस की अजून कोण याच्याशी सामान्य पोटार्थी जनतेला फारसे घेणं देणं नसते. निम्म्याच्य आसपास जनता हाताचा पंजा पाहून शिक्का अजूनही मारणारी आहे. या प्रमुख मतपेटीला काँग्रेसने गॅस-पेट्रोल-अन्नधान्य इत्यादी जीवनावश्यक गोष्टी महाग करुन हादरा दिला. आता काँग्रेसला हादरा हीच मतपेटी आपला हात बाजूला काढून देणार आहे.
३. आम आदमी पार्टी प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा दिल्लीत बसलेला फटका
४. देशाच्या संपत्तीची घोटाळ्यांद्वारे मोठी लूट - कॉमनवेल्थ, नरेगा, शस्त्रास्त्रे खरेदी (इथे इटलीचीच कंपनी होती)
५. पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा या दोन्हींचा प्रशासनात पूर्ण अभाव.

मोदींच्या जमेच्या बाजू:
१. अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारण्याचे प्रकरण राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनवण्यात यश
२. भाजपा मध्ये त्यांच्याएवढ्या सक्षम नेतृत्त्वाचा अभाव
३. काँग्रेस-आम आदमी पार्टी या दोघांतील संघर्ष
४. एलबीटी, सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, इ...इ... ने त्रासलेला व्यापारी वर्ग तसेच डिझेलच्या अनियंत्रणामुळे अनियंत्रित झालेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय, जेथे तेथे टोल नाके, इ... व्यावसायिक जाचक अडचणी
५. काँग्रेसचे अतिशय कमकुवत ठरलेले परराष्ट्र धोरण आणि शेजारी राष्ट्रांशी गेल्या ६ ते ७ वर्षांत बिघडलेले संबंध.
६. मोदींचे चहा विकणे गरीब व सर्वसामान्य जनतेच्या मनात एन्कॅश करता येणे.
आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा
६. वाढलेले गृहकर्ज, महाग झालेले घरचे आणि हॉटेलचे जेवण, सिनेमाघरांतील अवाढव्य दर, पेट्रोलचे अनियंत्रित दर, महाग झालेले कपडे-लत्ते, मुलांचे हट्ट आर्थिक चणचणींमुळे पुरवता न येणे, गॅस वाढीमुळे वाढलेली गृहीणींची नाराजी, मनपसंत गोष्टींवर खर्च करण्याच्या आवडीवर लगाम, अशा सर्व बाजूंनी पिचलेला सर्वसामान्य माणूस एका सक्षम पर्यायाच्या शोधात होता.

हा पर्याय होण्याची संधी आम आदमी पार्टीला चालून आलेली होती. पण राजकारणातील अपरिपक्वतेमुळे दिल्लीत त्यांनी स्वतःची नाचक्की करुन घेतली आणि सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यांत उगवत असलेली आशा एकदम निराशेत परावर्तित झाली. अशा अवस्थेत सर्वसामान्य माणूस दरी आणि डोंगर यांच्या मधील अरुंद जागेत सापडलेला होता. अशा वेळी सामान्य माणसाला दोनच पर्याय होते
एक - गेल्या २ निवडणुकांसारखे पुन्हा दरीत खजिना लाभेल या आशेने सूर मारायचा 
दोन - अज्ञात असलेल्या डोंगराच्या टोकावर जायचे , कदाचित एक वेगळे सुंदर विश्व बघायला मिळेल.

पहिला पर्याय दोन वेळा जनतेने वापरुन पाहिला आणि पदरी निराशा तर पडलीच पण व्यक्तीगत ताणतणावही वाढत गेले. अशा वेळी निवडून देण्याची अत्भुत क्षमता असलेल्या जनतेने या आधी न निवडलेल्या पर्याय क्रमांक २ ला संधी देण्याचा निर्णय केला तर त्यात त्यांची काही चूक आहे असे मला वाटत नाही.

शेवटी फलित काय तर मोदी सरकार येणार हे जवळपास निश्चितच आहे , उद्या त्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल एवढेच. माझा अंदाज चुकला तर देशातील बहुसंख्य जनता विचारी झाली आहे असे गृहीत धरायला हरकत नाही.
एनडीए - ३०४
युपीए - १०६ (काँग्रेस ५५ ते ६५)

बाकी उद्या खरे खोटे कळेलच. तूर्तास आता रजा घेतो

Wednesday, March 5, 2014

जंगलातली लोकशाही

एकदा एका जंगलात लोकशाही अस्तित्त्वात आली.
सिंहाने त्याला विरोध केला.
पण शेवटी तडजोड होऊन लोकशाही अस्तित्त्वात आलीच.
सिंहाला जंगलाचा कारभार बघायला सांगितले गेले.
हळू हळू सर्व प्राणी जागे होऊ लागले.
लोकशाहीत सर्वांना समान संधी असते या न्यायाने त्यांनाही सत्तेची स्वप्ने पडू लागली
एका गाढवाने हिंमत केली व निवडणुकीत उभा राहिला.
सिंहाचा आक्रमक स्वभाव प्राण्यांना नको होता.
जंगलाने गाढवाला निवडून दिले.
दहा वर्षे गाढवाने सत्ता उपभोगली
त्याच्या आजूबाजूला गाढवांची संख्या लक्षणीय वाढली
आपली सत्ता व्यवस्थित चालू आहे असा गाढवाला साक्षात्कार झाला
परत निवडणुका आल्या
आता जंगलातील प्राण्यांना त्यांचे मुद्दे कळाले होते
आराम फक्त गाढवांनाच मिळत होता
बाहेरचे घुसखोर जंगलात घुसून हवे ते करत होते
अचानक जंगलातील प्राण्यांची पिल्ले नाहिशी होत होती
कोणाही प्राण्याचे शव जंगलात फेकलेले सापडत होते
एखादे हरीण काळवीटाबरोबर दिसले की हरीण समाजातले आठ-दहा जण तिला जबरदस्तीने भोगत होते
जंगला बाहेरच्या प्राण्यांनी रात्री-बेरात्री अनेक माद्या उचलून नेल्या
मादी गमावलेले नर आक्रंदत होते
घर गमावलेले स्वतःहून जीव देत होते
आई गमावलेले बछडे टाहो फोडत होते
एकूणच मूठभर प्राणी सोडले तर सगळे जंगल आक्रंदत होते
पोटाला पुरेसे अन्न मिळत नसले तरी कसेबसे जंगल तग धरुन होते
पुन्हा जंगलात निवडणुका आल्या आहेत
दगडापेक्षा वीट मऊ म्हणून पुन्हा सिंहाला सत्ता द्यायची ?
किमान बाहेरचे लांडगे लचके तरी तोडायला धजावणार नाहीत.
मुठीत धरला तरी उरलेला जीव तरी आनंदाने आयुष्य जगू शकेल
का
अपमानाने जगत राहणे या जंगलातील प्राण्यांना जमायला लागले आहे?
उघड्या डोळ्यांनी सगळे बघून विसरायला लागले आहेत?
बघूयात काय होते ते
जंगल तेच आहे
निवडणुका त्याच आहेत
जंगलात बहुसंख्य असणार्‍यांनी यावेळी काय ठरवलं आहे?
पुन्हा गाढव की सिंह?
येत्या काही दिवसांत कळेलच.
तोपर्यंत बेटींग वाल्यांचा धंदा तरी तेजीत असेल.
तेव्हा मी चाल्लो डाव पणाला लावायला.
मी सिंहावर लावतोय... तुम्ही?

धन्यवाद,
सागर भंडारे

Friday, February 21, 2014

राजीव गांधींचे मारेकरी सोडण्यामागचे कारण




राहुल गांधी म्हणतात की ज्या देशात पंतप्रधानाला न्याय मिळू शकत नसेल तर सामान्य नागरिकाला कसा मिळणार?

राजकारणात डोके गहाण ठेवून आल्यावर असे राहुल गांधीच म्हणू शकतात.

म्हणजे यांना फक्त क्लास वन लोकांचीच चिंता आहे.

अरे राहुलबाबा किमान असे म्हणाला असतास तर तुझी पत तरी वाढली असती की,
'सामान्य माणसाला ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी पंतप्रधानांना न्याय मिळण्याची मला खात्री असेल व राजीव गांधींचे खुनी सोडण्याची वेळच येणार नाही'

कधी सुधारणार हे कार्ट देवच जाणे...

असो, मुद्दा असा की जयललिताबाईंचे काही चुकले आहे असे मला वाटत नाही.
फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली तर आपल्या देशात ती २५ वर्षे असते. मरेपर्यंत जन्मठेप ही ब्रिटिशांची कन्सेप्ट होती.
अगोदरच साडे-तेवीस वर्षे राजीव गांधींच्या खुनाच्या कटातले लोक तुरुंगात होते. आणि न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलायला ११ वर्षे लावली या चूकीचे परिमार्जन म्हणून पुढची अडीच वर्षे माफ करुन जयललिताबाईंनी खरे तर न्यायालयीन कार्यप्रणालीच्या थोबाडीतच मारली आहे. एक निर्णय करायला ११ वर्षे ? मग तमिळ अस्मितेचा आपला मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीत अधिक प्रखरपणे मतदारांच्या मनावर बिंबवायला ही बया संधी का सोडेल?

दुसरीकडे काँग्रेसचे गणित कळतच नाही.
आई गुन्हेगारांना भेटून येते आणि सौम्य भूमिकेचा पाठपुरावाही करते. दुसरीकडे मुलगा बोंब मारतो. हे भरीत मतदारांच्या पचनी तरी पडेल की नाही? याचा थोडे तरी विचार करायचा?
आम आदमी पार्टीने जसे केले तसेच लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस स्वतःच्या हाताने घाण करते आहे. देव त्यांचे भले करो.

 -----------
हा मुद्दा देशाच्या अस्मितेचा आहे का? तर नक्कीच आहे. पण त्या अस्मितेचा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाहिये.
राजीव गांधी हे चुकीच्या परराष्ट्रकारणाचे बळी ठरले

-------------

राजीव गांधींची हत्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यावरील हल्ले  या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
तमिळ इलम वा तत्कालीन तमिळ अस्मितेने भारलेले लोक राजीव गांधींच्या विरोधात उठले कारण श्रीलंकेत होणार्‍या तमिळ बांधवांवरील अत्याचारांकडे काणाडोळा करुन श्रीलंकेला भारताने मदत केली. एलटीटीई चा उदय या अन्यायाच्या उद्रेकातूनच झालेला होता हे विसरुन चालणार नाही. भारताचे परराष्ट्र धोरण काँग्रेस राजवटीत नेहमीच पुळचट किंवा पळपुटेपणाचे राहिलेले आहे. मग ते पाकीस्तानविरुद्धचे युद्ध जिंकून आपले सैन्य माघारी घेण्याची घाई असो (या चुकीमुळे आजही मोठ्या भूभागाला आपल्याच मालकीच्या भूभागाला आपण पाक-व्याप्त काश्मीर म्हणून ओळखतो)
किंवा मग चीनवर दाखवलेला आंधळा विश्वास असो (हिंदी चीनी भाई भाई ने पाठीत सुरा कसा खुपसला हा आजही जगात आपल्या दूरदृष्टीच्या अभावाचे उदाहरण ठरलेले आहे. अथवा मग चीनने बळकावलेली भूमी असो ( सियाचीन या नावाने आपण आपलाच भूभाग ओळखत आहोत.) अरुणाचल प्रदेशातही चीन तवांग प्रांताच्या आजूबाजूला भूभाग बळकावण्याचे प्रयत्न करतो आहे. नक्षलवादी चळवळ आज देशात बंगाल , ओरिसा, आंध्र प्रदेश , महाराष्ट्र , कर्नाटक ते केरळ अशी तिरपी रेष निर्माण करत आहे. या भू भागात आजही कोणी उघडपणे जाऊ शकत नाही. कित्येक हजार गावे आज नक्षलवाद्यांच्या हातात आहेत.
काश्मीरातून हजारो स्थानिकांना निर्वासित व्हावे लागले तेव्हा सरकार काँग्रेसचेच होते. पण त्यांना हा मुद्दा गंभीर वाटला नाही. शिखांचे हत्याकांड झाले तेव्हाही काँग्रेसचे सरकार होते. नक्षलवादाचा जन्म काँग्रेसच्या राजवटीतला आहे. लाखो बांगलादेशी नागरीक आज काँग्रेसच्याच कृपेने भारताचे अधिकृत नागरीक झालेले आहेत.
वाजपेयींच्या काळात किमान आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत सुधारण्याचे काम तरी केले. ते काँग्रेसला कधीच जमले नाही. देवयानी खोब्रागडे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले त्यावरुन हे लक्षात यावे.
शांततेने जगता येणे हे जरी एका स्वप्नासारखे असले व आपण त्या दिशेने प्रयत्न करतो आहोत. तरी चीन व पाकीस्तान सारखे शेजारी असताना डोळ्यांवर पट्टी बांधून घेणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात सबळ तोच टिकेल व जगेल हा निसर्गाचा नियम लागू होतो. चीन ने हिमालय फोडून भुयारी मार्ग सियाचीन व पाकव्याप्त काश्मीर मधे तयार केले. चीनचा रेल्वेमार्ग थेट इराणच्या ग्वादर बंदरापर्यंत पोहोचला जेथून चीन इराणचे तेल थेट चीन मधे विनाकष्ट नेऊ शकतोच. पण भारताचा प्रमुख तेल सप्लायर इराणचा संपर्कही तोडू शकतो. उद्या चीनशी युद्ध झाले तर भारताला ते परवडेल? चीन म्हणेल त्या अटींवर भारताला सह्या कराव्या लागतील. असो हा विषय मोठा आहे.
पण राजीव गांधीची हत्या ही देशाच्या पंतप्रधानाची हत्या होती. आणि ती याच देशाच्या लोकांनी केली (कोणा बाहेरच्या लोकांनी नव्हे.) राजीव गांधींनी तमिळांचे प्रश्न देशाची जनता या नात्याने समजून घेतले असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. चूकीच्या परराष्ट्रधोरणाचे राजीव गांधी बळी ठरले. श्रीलंकेसोबत सौम्य भूमिका घेऊन ते चुकले. राजीव गांधींच्या काही दूरगामी धोरणांची फळे आजही आपण चांगली मिळवतो आहोत. पण परराष्ट्रकारणात काँग्रेस राजवट कायमच कमकुवत पडली हा इतिहास आहे.
मला हे मान्य आहे की एका रात्रीत देशाची प्रतिमा सबळ देश अशी होणार नाही. त्यासाठी कित्येक वर्षे, प्रसंगी दशकेही काम करावे लागते. काँग्रेसने ते आजपर्यंत कार्यक्षमतेने केले नाही हे खेदाने म्हणावे लागते आहे.

Friday, January 24, 2014

"मास्टर प्लॅन" ही कथा "लोकप्रभा"त प्रकाशित



माझी "मास्टर प्लॅन" ही कथा साप्ताहिक "लोकप्रभा" च्या २४ जानेवारी २०१४ आणि ३१ जानेवारी २०१४ या अंकांतून दोन भागांत प्रकाशित झाली आहे.


मास्टर प्लॅन - पूर्वार्ध : http://issuu.com/lokprabha/docs/24_january_2014_issue_for_website

पान क्रमांक ४२,४३ आणि ५३

मास्टर प्लॅन - उत्तरार्ध :  http://issuu.com/lokprabha/docs/31_january_2014_issue_for_website

पान क्रमांक ४६, ४७ आणि ४८

Tuesday, January 14, 2014

मिडियाची घसरलेली पातळी



मराठी मिडियाला अशा बातम्यांचं काहीच सोयर-सुतक नसतं. कारण मराठी मिडिया आजही जातीय राजकारण आणि पक्षीय राजकारण याच्यातच अडकला आहे. खर्‍या बातम्या यांना लोकांपर्यंत येऊच द्यायच्या नसतात का त्यांच्यातली खरी पत्रकारिता संपत चालली आहे ? हे वादाचे मुद्दे आहेत. पण आपल्या मिडियातील लोकांनी जुन्या काळातली पत्रकारिता कशी चालत होती आणि आता आपण काय करत आहोत हे खरोखर तपासून बघायची गरज निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थः मुंबईच्या मिडियाला मुंबई सोडून इतर महाराष्ट्राविषयी दखल घेण्याएवढी ठळक (म्हणजे बलात्कार, स्टींग, इत्यादी सनसनाटी विषय) बातमी नसेल तर फारसा रस नसतो. तर पुण्याच्या मिडियात मुंबईच्या बातम्या नसतात. उरलेला अवघा महाराष्ट्र कोणी मोजतच नाही. कोणतेही चॅनेल बघा, मुंबई - पुणे, एवढेच. बाकी महाराष्ट्र फक्त या गावात शेतकर्‍याने आत्महत्या केली. या तालुक्यात उसाच्या भावावरुन जाळपोळ झाली, कोल्हापूरात टोलनाक्यावर जाळपोळ झाली, अमक्या गावात चिमुकलीवर बलात्कार झाला. तर कोठे विवाहितेला हुंड्यावरुन जाळलेले असते.

महाराष्ट्रातील कोणत्या गावांतून लोक उपाशी राहतात?
सरकारी योजना कोणत्या गावात आल्याच नाहीत?
सरकारी कर्मचारी लोकांना कशा वाटाण्याच्या अक्षता लावतात?
गरीबांना शिक्षणाच्या योजना असूनही त्यातील पैसे नेते आणि नोकरशहा संगनमताने कसे वाटून खातात?
कितीतरी लाखांवर विहिरी कागदोपत्री खणून त्याचे पैसे दिले गेले पण त्या विहिरींचा लाभ गावांना का मिळाला नाही?
जनप्रतिनिधी पदांचा दुरुपयोग करुन कसे सरकारी नियम पायदळी तुडवून लोकांची कामे पैसे घेऊन करुन देतात?
लहान मुलांना शिक्षण किती निकृष्ट दर्जाचे मिळते?
चॅरिटेबल ट्रस्ट खोर्‍याने पैसे गोळा करतात त्यातील किती पैसे योग्य कामासाठी वापरले जातात?

असे हजारो संवेदनशील मुद्दे आहेत. पण मराठी सन्मान स्वतःतच नसलेल्या (अगदीच अपवादात्मक स्वरुपात असलेल्या) मराठी मिडियाला जर वरील मूलभूत मुद्द्यांची दखल घेता येत नसेल तर भविष्यकाळ आपल्या सर्वांसाठीच अंधारमय आहे. मिडियाने सर्वात आधी क्रिकेट खेळाडू, राजकारणी नेते, गुन्हेगार, चित्रतारका यांना देण्यात येणारी वारेमाप प्रसिद्धी आधी बंद केली पाहिजे. पण हे टीआरपीचे ग्लॅमर कोणताही मिडिया सोडत नाही, म्हणून मूळ प्रश्न कायमच लटकलेले राहतात. मिडियाला त्यांच्या जबाबदारीची जाणीवच आता उरलेली नाहिये. मिडियाला चौथा स्तंभ का म्हणतात हे खरोखर ज्याला कळाले तो खरा हाडाचा पत्रकार.

Sunday, January 5, 2014

पुढील ५० वर्षांनी मराठी नामशेष होणार?

आजच साहित्य संमेलनाची सांगता झाली आणि या संमेलनाचे कौतुकसोहळे पुढील कित्येक दिवस गायिले जातील. साहित्य चपराकचे संपादक श्री. घनःश्याम पाटील यांनी जानेवारी २०१४ च्या अंकात संपादकीय मधे पुढील विचार मांडले आहेत,



त्या अनुषंगाने मी मांडलेले विचार

घनश्यामजी हा खरोखर जटील मुद्दा आहे. तुमचे आभार की या महत्त्वाच्या संपादकीयावर मी विचार व्यक्त करावेत अशी आपण इच्छा व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाणांनी तेव्हाच्या राजकारण्यांना एक आदर्श निर्माण करुन दिला होता पण इतिहासातील चुकांमधून शिकणे हे आपल्या मातीतच नाहिये हे वारंवार सिद्ध झालेले आहे. त्याच प्रमाणे यशवंतराव चव्हाणांनंतरच्या राजकारण्यांनी एकही क्षेत्र सोडले नाही जे समाजमनाशी वा समाजभावनेशी जवळून निगडीत आहे. मग ते क्रिकेट असो, साहित्य असो, चित्रपट माध्यम असो, शिक्षण असो, जात-पात असो वा अन्य इतर. समाजाच्या मनावर परिणाम करणारे घटक आपल्या ताब्यात ठेवले की समाजमन आपल्याला हवे तसे वळवता येते असा त्यांचा एक गैरसमज आहे. राजकारण्यांच्या या अजाणतेपणामुळे काय नुकसान होते आहे हे त्यांच्या लक्षात येणे अवघडच आहे.

- भाषेचा र्‍हास
- सृजनशीलतेचा र्‍हास
- बुद्धीमत्तेचा र्‍हास
- परंपरेचा र्‍हास
- समानतेच्या भावनेचा र्‍हास
- दुसर्‍याच्या कष्टांचा सन्मान करणार्‍या भावनेचा र्‍हास , इत्यादी अनेक आहेत.

समाज व्यक्त करत नाही म्हणजे ती भावना त्याच्यात नसतेच असे नाही. असंतोष हा कायम खदखदत राहतो आणि एक दिवस त्याचा भडका उडतोच उडतो.

मला व्यक्तीशः असे वाटते की - आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा राजकारण्यांना जागेवर आणण्यासाठी साहित्यिक मोठे विचार देण्याचे काम करतात. हे जर राजकारण्यांना मान्य असेल तर - राजकारण्यांनी व्यासपीठ साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसाठी मोकळे ठेवावे व स्वतः खाली इतर प्रेक्षकांबरोबर बसावे. फार तर व्हीआयपी म्हणून त्यांना पुढील जागा देण्यास हरकत नसावी. साहित्य हे तेव्हाच खर्‍या अर्थाने साहित्याच्या दर्जाचे राहते जेव्हा साहित्यिक राजकारण्यांपुढे लोटांगण घालणे बंद करतील. राजकारणी कितीही मोठा नेता झाला तरी तो साहित्य संमेलनाच्या ठिकाणी एक सामान्य वाचकच असतो. समाजमनाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या जबाबदारीने या राजकारण्यांनी आपापले साहित्य क्षेत्रातील अनुभव जरुर सांगावेत. साहित्यामुळे त्यांना काय प्रेरणा मिळाल्या? सध्याचे साहित्य किती खालच्या वा वरच्या पातळीवर गेलेले आहे याबद्दलची परखड मते (प्रामाणिकपणे) त्यांनी मांडली पाहिजेत. साहित्य क्षेत्रातील निर्मितीमधला जिवंतपणा व सृजनशीलता टिकवायची असेल तर घालीन लोटांगण वंदीन चरण ही प्रवृत्ती साहित्य क्षेत्रातील सर्वच साहित्यिकांनी सोडली पाहिजे. जे चांगले आहे त्याला (जात-पात, रंग-रुप, कोणताही कंपूबाजीपणा न करता) निर्भेळपणे चांगले सर्वजण म्हणू लागतील तो दिवस साहित्य क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. असे झाले तरच आपली मराठी खर्‍या अर्थाने माय मराठी म्हणून पुढची हजार वर्षे जगात स्वतःचे अस्तित्त्व टिकवू शकेल. अन्यथा पुढील ५० वर्षांनी मराठी वाचणारे एन्टिक पीस म्हणून सापडतील. साहित्यिकांनी स्वतः साहित्य क्षेत्रात हे भान व ही जबाबदारी टिकवणे अत्यंत गरजेचे म्हणूनच आहे. सांगावे तितके कमीच आहे. पण तूर्तास ही लेखणी इथे थांबवतो.