Sunday, June 15, 2014

जैतापूर अणु-उर्जा प्रकल्प "हवा' कि "नको'?

अणु उर्जा प्रकल्पाचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. फायदे मिळवताना आपल्या अस्तित्त्वावर घाला घालण्याची एक शक्यता जरी तोट्याच्या बाजूला येत असली तरी तिचा विचार हा व्हायला हवा.

जैतापूर प्रकल्पाच्या मूलभूत गोष्टींकडे दृष्टीक्षेप टाकल्यास काही प्रमुख बाबी लक्षात येतात. पण कोणालाही सक्षमपणे या प्रश्नांची उकल जनतेसाठी वा जनतेला करुन द्यायची नाहिये.
१. पश्चिम घाट हा जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. (त्याची जपणूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी उपलब्ध करुन दिला जातो) असे असताना जैतापूर सारख्या ठिकाणी अणुउर्जा प्रकल्प खूप मोठा धोक्याचा आहे.
२. अचानक कोणतीही दुर्घटना झाली तर संपूर्ण पश्चिम घाट धोक्यात येईल.
३. कोणताही अणुउर्जा प्रकल्प सुरु केल्यावर बंद करणे शक्य नसते.
४. दुर्घटना घडल्यास ती हाताळण्यासाठी कोणतीही प्रभावी व कार्यक्षम यंत्रणा आपल्या देशाकडे नाही.
५. जपान मध्ये फुकुशिमा मध्ये जे झाले ते जपान ने आपल्या तंत्रज्ञानाच्य बळावर रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही त्यात पूर्ण यश आलेले नाहिये. अजूनही फुकुशिमात काय होईल हे सांगणे अवघड आहे. अशा परिस्थितीला हाताळण्याची क्षमता आपल्याकडे नाहीये.
६. अणु उर्जा प्रकल्पात दुर्घटना झाली तर त्याचा आवाका खूप मोठा असेल. कोकणातील मासेमारी व्यवसाय नष्ट होईलच. पण महाराष्ट्राची राजधानी मुंबईला त्याची थेट झळ पोहोचेल. आणि अशा आपात्कालीन परिस्थितीत या घटनेची झळ पोहोचणार्‍यांची संख्या कोटींमध्ये असेल.
अशी आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आपण काय उपाययोजना करतो आहोत हे प्रभावीपणे या प्रकल्पाच्या प्रमुख अणु-वैज्ञानिकांसह कोणीही सांगितलेले नाहीये.
७.कोणताही अणु-उर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन वीज उत्पादन सुरु करण्यासाठी किमान २० वर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत सौर उर्जेचा पर्याय कमी खर्चात व कमी वेळेत उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाने हालचाल का केली नाही? 
८. दुर्घटना झाल्यास महाराष्ट्राची किनारपट्टी पुढील किमान १०० वर्षे गमवावी लागेल.

या सर्व बाबींचे समाधान करु शकण्याची कुवत व ताकद आपल्यात असेल तरच जैतापूर अणु प्रकल्पाला मूर्त रुप देण्यात यावे असे मला वाटते. अणु उर्जा अनियंत्रित झाल्यास तिला नियंत्रित करु शकण्याचे तंत्रज्ञान आज तरी आपल्याकडे नाहिये. भविष्यकाळात होईल या आशेवर हा अणुप्रकल्प सुरु करणे म्हणजे स्वतःहून विस्तवात उडी घेण्यासारखे आहे. भोपाळ मधील काळरात्र लोकांनी आठवली तर त्यांच्या लक्षात येईल की मी काय म्हणतो आहे ते.
दुर्घटना एकदाच होते. प्रश्न असा आहे की आपण त्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत का?
पारंपारिक उर्जा साधनांचा प्रभावीपणे वापर केला तर आपल्या देशाला उर्जेची टंचाई अजिबात जाणवणार नाही.
प्रश्न आहे तो नियोजनाचा आणि सक्षम नेतृत्त्वाचा.

No comments:

Post a Comment