Monday, September 22, 2014

संस्कृत प्राचीन असेल तर ती पुराव्यांच्या कसोटीवर सिद्ध का होत नाही?


संस्कृतचे एवढे अवडंबर झाले की काही मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्षच झाले.
संस्कृत भाषेच्या अस्तित्त्वाचा प्रत्यक्ष पुरावा आहे तो इसवी सना नंतर चौथ्या शतकानंतरचा (तो ही ब्राह्मी लिपीतला) - तोपर्यंत संस्कृतला स्वत:ची आज आहे तशी देवनागरी लिपी अस्तित्त्वात नव्हती हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. उलटपक्षी प्राकृतचे ऐतिहासिक पुरावे इसवीसनापूर्वीच्या काळापासून मिळतात. अर्थात लिपी हा निकष भाषेला आवश्यक नाही मानता येणार. पण प्राचीन प्राचीन म्हणून ओरडणार्‍या संस्कृत प्रेमींसाठी हे माहिती करुन घेणे आवश्यक आहे की जी देवांची भाषा म्हणून समजली जायची तिला लिपी देखील उधार घ्यावी लागली होती.
संस्कृत भाषा म्हणून सुंदर आहे, अलंकारिक आहे यात वाद नसावा. पण त्याचे नसलेले प्राचीनत्त्व लादणे म्हणजे आपणच झूल स्वत:च्या डोळ्यांवर पांघरुन घेणे होय. डोळसपणे पुराव्यांच्या अभ्यासाने जे सिद्ध होते आहे ते मान्य केले जावे. संस्कृत प्राचीन आहे हे सिद्ध करणारे पुरावे आले तर मला वाटते की संशोधकही ते मान्य करतील. तेवढे चिकित्सक वृत्तीचे ते आहेत.
पण संस्कृतचे प्राचीनत्व सिद्ध करणारे मुळात पुरावेच नाहीत तर सिद्ध काय करणार? उलट सिंधु संस्कृतीचे प्राचीनत्व सिद्ध करणारी नाणी व लेख सापडलेले आहेत.
महाराष्ट्रात इसवी सनाच्या पहिल्या शतकात बृहत्कथा आणि पुढे दुसर्‍या तिसर्‍या शतकात सिंहासन बत्तीशी हे दोन अत्भुत ग्रंथ प्राकृत भाषेत निर्माण झाले (या दोन्ही ग्रंथांच्या संस्कृत पेक्षा प्राचीन असलेल्या प्राकृत प्रती सापडलेल्या आहेत) इसवी सनाच्या आठव्या शतकानंतर अचानक संस्कृत मध्ये भरपूर संपदा सापडू लागते. याचे प्रमुख कारण म्हणजे संस्कृत ही प्राकृत भाषेमधील साहित्य अनुवादीत करण्यासाठी वापरली जाणारी भाषा होती. सुदैवाने संस्कृत ग्रंथांचे जतन दक्षिण भारत , श्रीलंका , जावा, सुमात्रा बेटे अशा मार्गांनी झाले व मुसलमानी आक्रमणाच्या काळात विदेशात व दक्षिणेत खोलवर वाचलेल्या संस्कॄत प्रती सुरक्षित राहिल्या.
प्राकृत प्रभाव असलेले महाराष्ट्रासकट उत्तर भारतातले सर्व प्रदेश मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाल्यामुळे प्राकृत ग्रंथसंपदा टिकवू शकले नाहीत. तरी काही प्रती सापडल्या त्या जैन मुनी व बौद्ध श्रमणांकडे. त्यांनी त्या प्रतींचा वापर जैन व बौद्ध साहित्यांतून केला. तरी प्राकृताचे मूळ तेज लपणे शक्यच नव्हते. इसवी सनाच्या अकराव्या शतकात काश्मीरच्या सोमदेवभट्टाला जवळपास अकराशे वर्षांनी महाराष्ट्रात इसवी सनाच्या पहिल्या शतकांत निर्माण झालेल्या गुणाढ्य रचित 'बृहत्कथा' या महाकथांचा संस्कृत भाषेत रुपांतर करण्याचा मोह पडावा, यातच प्राकृतचे मोठेपण सिद्ध होते.
दुसरे असे की जी भाषा जनमानसात प्रचलित होती तीच राजभाषाही होती. महाराष्ट्रांतील सातवाहन काळातले (इसवी सन पूर्व २३० ते इसवीसन २२०) उपलब्ध शिलालेखही तत्कालीन मराठी प्राकृत भाषेतले आहेत हे लक्षात घ्यावे. संस्कृतचे प्राचीनत्व मान्य करायचे असेल तर जरुर करा. पण ते प्राचीनत्त्व वर दिलेल्या किरकोळ गोष्टींबाबत सिद्ध तरी होते का? हे ही तपासले जावे. एवढेच मला म्हणायचे आहे.

2 comments:

  1. छान झालाय लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विजय जी,

      लवकरच अजून सविस्तर लिहीन या विषयावर

      Delete