हूणांचे भारतातून समूळ उच्चाटन करुन टाकण्याचे श्रेय सम्राट हर्षवर्धनाकडे जाते. आपल्याला सम्राट हर्षवर्धन नाव किमान ऐकून तरी माहित असेन.
तर असा पराक्रमी 'हर्ष' हा 'सम्राट हर्षवर्धन' कसा झाला याची ही संक्षिप्त कहाणी आता बघूयात.
इसवी सन ६०५ च्या सुमारास ठाणेश्वराचा [यालाच स्थानेश्वर असेही म्हणतात] प्रभाकरवर्धन हा उत्तर हिंदुस्थानातील सर्वात प्रबळ राजा होता. त्याने हूण लोकांचे पारिपत्य केले. त्यास राज्यवर्धन हा ज्येष्ठ व हर्षवर्धन हा कनिष्ठ असे सर्वगुणसंपनदोन पुत्र होते. यापूर्वी हूणांचा पराभव करण्यासाठी ठाणेश्वराधिपतीला 'कनोज'च्या मौखरींचे सहाय्य मिळत असे. परंतु एकदा हूणांनी अचानक स्वारी केल्यामुळे त्यास मौखरींना कळविण्यास अवधी मिळाला नाही. तरी प्रभाकरवर्धनाने आपला ज्येष्ठ पुत्र राज्यवर्धन यास हूणांचा पराभव करण्यास पाठविले.
ठरल्याप्रमाणे राज्यवर्धन पिताश्रींची आज्ञा प्रमाण मानून हूणांचे पारिपत्य करण्यासाठी निघाला. राज्यवर्धन मोहिमेत यशस्वी झाला. हूणांचा पुरता पाडाव करुन राज्यवर्धन ठाणेश्वरास परत आला. वेशीवर येताच त्याचे स्वागत करण्यासाठी प्रभाकरवर्धन येण्याऐवजी त्याच्या निधनाची दु:खद बातमी आली.
प्रभाकरवर्धनच्या मृत्युची बातमी कळताच माळव्याच्या देवगुप्ताने कनोज वर स्वारी केली. या स्वारीत 'कनोज'चा अधिपती व राज्यवर्धनचा मेहुणा 'गृहवर्मा मौखरी' हा मारला गेला. आणि राज्यवर्धन व हर्षवर्धन या दोघा पराक्रमी भावांची एकुलती एक बहिण 'राजश्री' देवगुप्ताच्या हाती सापडली. ही बातमी कळताच पित्याच्या निधनाचा व बहिण विधवा झाल्याचा शोक न करता राज्यवर्धन देवगुप्तावर चालून गेला व त्याचा पराभव केला . परत येत असताना वाटेत बंगालच्या शशांकगुप्ताने - यालाच गौडेन्द्र हेही नाव होते - कपट करवून राज्यवर्धनचा घात केला.
हर्षवर्धन तेव्हा केवळ सोळा वर्षांचा कुमार होता. या अल्पवयात त्याच्यावर ठाणेश्वराचा अधिपती होण्याची जबाबदारी आली. येथूनच हर्षाच्या चरित्राला प्रारंभ होतो. हर्षवर्धनाने प्रतिकूल परिस्थितीत राजा होऊनही अतिशय यशस्वीपणे आलेल्या परिस्थितीला तोंड दिले. त्याने हूणांचे पूर्णपणे पारिपत्य केले. राज्यारोहणसमयी हर्ष अल्पवयीन होता तरी तो अतुल धैर्यवान, कुशाग्र बुद्धीचा व दैवशाली होता. राज्यारोहणानंतर हर्षवर्धनाने दिग्विजयासाठी प्रस्थानकेले, आपल्या सर्व शत्रूंचा त्याने सर्वप्रथम पाडाव केला. आणि त्यानंतर त्याने वाटचाल केली ती एकछत्री साम्राज्य निर्माण करण्यासाठी. आपल्या प्रचंड पराक्रमाने हर्षवर्धनाने भारतवर्षाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले आहे यात शंकाच नाही. सम्राट हर्षवर्धनाचा काळ हा इसवी सन ६०६ ते ६४८ असा मानला जातो.
'हर्षचरित' या बाणभट्टाने लिहिलेल्या सम्राट हर्षवर्धनच्या चरित्रात हा सर्व घटनाक्रम सविस्तरपणे येतो. चीनी प्रवासी ह्यूएनत्संगने याच काळात म्हणजे इसवी सन ६२८ ते ६४५ मध्ये भारतात भ्रमण केले . आणि त्याला भारताच्या प्रवासात कित्येक ठिकाणी सम्राट हर्षवर्धना बद्द्ल अनेक नोंदी मिळाल्या होत्या. त्याने त्या टिपून ठेवलेल्या आहेत. या सर्व मुख्य नोंदी बाणाच्या हर्षचरिताशी मेळ खातात. त्यामुळे सम्राट हर्षवर्धनावरच बाणभट्टाने हर्षचरित रचले होते याला एक सबळ पुरावाच मिळतो.
हर्षवर्धन आपल्या मोठ्या भावाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी बाहेर पडला होता. वाटेत त्याला प्राक् ज्योतिषपुर (आसाम) च्या राजकुमाराने प्रसन्न करुन त्याच्याशी मैत्री संपादन केली. त्यानंतर पुढे गौडेन्द्र शी कित्येक दिवस युद्ध चालले होते. अशातच हर्षवर्धनाला बातमी कळाली की त्याची बहिण राजश्री ही देवगुप्ताच्या कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी ठरली आहे व ति विंध्य पर्वतरांगांत कुठेतरी आहे. आपल्या सेनापतिंवर युद्धाची जबाबदारी सोपवून हर्षवर्धन स्वतः बहिणीला शोधायला विंध्याचलात आला. कितीतरी दिवस हर्षवर्धन आपल्या बहिणीचा शोध घेत विंध्याचलाच्या घनदाट जंगलांत फिरत होता. पण यश येत नव्हते. अशातच त्याची भेट जंगलाचा सामंत शरभकेतूचा मुलगा व्याघ्रकेतूशी झाली. व्याघ्रकेतूने त्याच्या दिमतीस असलेल्या निर्घात नावाच्या भिल्लाला हर्षवर्धनाच्या मदतीस दिले. निर्घातला जंगलातील कानेकोपरे अगदी व्यवस्थित माहिती होते. त्याच्या मदतीने हर्षाला कळाले की विंध्यवनाच्या मध्यभागी एक बौद्ध आश्रम आहे व तिथे राजश्री असण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन तेथे अगदी वेळेवर पोहोचला. कारण राजश्रीच्या पतीच्या निधनानंतर तिच्या भावाच्या - राज्यवर्धनाच्या - निधनाचेही वृत्त तिला कळाले होते व जीवनास कंटाळून ती आगीत उडी घेणार होती. नेमक्या त्याच वेळी हर्षवर्धनाने तिथे येऊन बहिणीचे प्राण वाचवले.
बहिण राजश्री सुखरुप सापडताच हर्षवर्धन आपला मोर्चा पुन्हा गौडेन्द्राचे पारिपत्य करण्याकडे वळवतो आणि येथेच हर्षचरित समाप्त होते.
हर्षचरित हे अनेक रसनिर्मिती करणारे आहे. बाणभट्टाने त्यानंतर लिहिलेली कादंबरी संस्कृत साहित्यातील एक मोठा मानदंड होऊन बसली व तिच्या छायेत बाणाची हर्षचरित ही कलाकृती झाकोळली गेली.
या लेखाचा मूळ उद्देश सम्राट हर्षवर्धनाच्या शौर्याची ओळख करुन देणे हा तर आहेच.
पण सम्राट हर्षवर्धनाच्या अगोदर त्याचे पिता प्रभाकरवर्धन आणि त्याचा मोठा भाऊ राज्यवर्धन हे देखील किती पराक्रमी होते याचीही ओळख वाचकांना करुन द्यावयाची होती.
हर्षवर्धनाचे लष्कर प्रचंड असल्याचे पुरावे आहेत. त्यावरुन जी माहिती मिळते ती अशी की १ लाख घोडदळ व ६० हजार हत्तीदळ त्यामध्ये होते. मौर्य साम्राज्य शिखरावर असतानाही एवढे लष्कर त्यांच्या पदरी नव्हते.
सम्राट हर्षवर्धनाचे साम्राज्य केवढे विशाल होते याची कल्पना पुढील नकाशावरुन नक्की येईन.
No comments:
Post a Comment