Tuesday, May 15, 2012

मानवंदना : वासुदेव बळवंत फडके

आज १७ फेब्रुवारी.
आजच्या पुण्यदिनी थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मरण न होणे अशक्यच. आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचे आणि प्राणांचे दिलेले अर्घ्य आजच्या धकाधकीच्या जीवनात विसरुन जात आहोत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या हा महान क्रांतिकारक १७ फेब्रुवारी १८८३ रोजी हुतात्मा झाला.

वासुदेव बळवंत फडके

२० जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदगी गावातील देवळात इंग्रज व फडके यांच्यात तुंबळ लढाई झाली. पण इंग्रजांनी पूर्ण घेराबंदी करुन वासुदेव बळवंत फडके यांना जिवंत पकडले. पुण्याच्या तुरुंगात ठेवून तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काका या नावाने प्रसिद्ध असलेले श्री.गणेश वासुदेव जोशी यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या काळात अशा क्रांतिकारकांचे निवाडे कसे होत हे सांगण्याची गरजच नाही. त्यामुळे नाममात्र खटला चालवायचा आणि क्रांतिकारकांना फासावर लटकवायचं हे इंग्रजांचं दडपशाहीचं धोरण होतं.

पण सार्वजनिक काकांनी केलेल्या युक्तीवादामुळे वासुदेव बळवंत फडके यांना फाशीची शिक्षा न होता त्याऐवजी त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. अरेबियातील एडन येथील तुरुंगात फडके यांना पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी आपल्या मातृभूमिकडे पलायन करायचा चंग बांधला. एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागर्‍यांसकट उचकटून काढून त्यांनी तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना पुन्हा पकडले व तुरुंगात टाकले.
तुरुंगात आपल्याला मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकी विरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी आमरण उपोषण केले व शेवटी त्यांना त्यातच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यू आला.

अशा या लढवय्या महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना माझी मानवंदना.

No comments:

Post a Comment