मराठी मिडियाला अशा बातम्यांचं काहीच सोयर-सुतक नसतं. कारण मराठी मिडिया आजही जातीय राजकारण आणि पक्षीय राजकारण याच्यातच अडकला आहे. खर्या बातम्या यांना लोकांपर्यंत येऊच द्यायच्या नसतात का त्यांच्यातली खरी पत्रकारिता संपत चालली आहे ? हे वादाचे मुद्दे आहेत. पण आपल्या मिडियातील लोकांनी जुन्या काळातली पत्रकारिता कशी चालत होती आणि आता आपण काय करत आहोत हे खरोखर तपासून बघायची गरज निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थः मुंबईच्या मिडियाला मुंबई सोडून इतर महाराष्ट्राविषयी दखल घेण्याएवढी ठळक (म्हणजे बलात्कार, स्टींग, इत्यादी सनसनाटी विषय) बातमी नसेल तर फारसा रस नसतो. तर पुण्याच्या मिडियात मुंबईच्या बातम्या नसतात. उरलेला अवघा महाराष्ट्र कोणी मोजतच नाही. कोणतेही चॅनेल बघा, मुंबई - पुणे, एवढेच. बाकी महाराष्ट्र फक्त या गावात शेतकर्याने आत्महत्या केली. या तालुक्यात उसाच्या भावावरुन जाळपोळ झाली, कोल्हापूरात टोलनाक्यावर जाळपोळ झाली, अमक्या गावात चिमुकलीवर बलात्कार झाला. तर कोठे विवाहितेला हुंड्यावरुन जाळलेले असते.
महाराष्ट्रातील कोणत्या गावांतून लोक उपाशी राहतात?
सरकारी योजना कोणत्या गावात आल्याच नाहीत?
सरकारी कर्मचारी लोकांना कशा वाटाण्याच्या अक्षता लावतात?
गरीबांना शिक्षणाच्या योजना असूनही त्यातील पैसे नेते आणि नोकरशहा संगनमताने कसे वाटून खातात?
कितीतरी लाखांवर विहिरी कागदोपत्री खणून त्याचे पैसे दिले गेले पण त्या विहिरींचा लाभ गावांना का मिळाला नाही?
जनप्रतिनिधी पदांचा दुरुपयोग करुन कसे सरकारी नियम पायदळी तुडवून लोकांची कामे पैसे घेऊन करुन देतात?
लहान मुलांना शिक्षण किती निकृष्ट दर्जाचे मिळते?
चॅरिटेबल ट्रस्ट खोर्याने पैसे गोळा करतात त्यातील किती पैसे योग्य कामासाठी वापरले जातात?
असे हजारो संवेदनशील मुद्दे आहेत. पण मराठी सन्मान स्वतःतच नसलेल्या (अगदीच अपवादात्मक स्वरुपात असलेल्या) मराठी मिडियाला जर वरील मूलभूत मुद्द्यांची दखल घेता येत नसेल तर भविष्यकाळ आपल्या सर्वांसाठीच अंधारमय आहे. मिडियाने सर्वात आधी क्रिकेट खेळाडू, राजकारणी नेते, गुन्हेगार, चित्रतारका यांना देण्यात येणारी वारेमाप प्रसिद्धी आधी बंद केली पाहिजे. पण हे टीआरपीचे ग्लॅमर कोणताही मिडिया सोडत नाही, म्हणून मूळ प्रश्न कायमच लटकलेले राहतात. मिडियाला त्यांच्या जबाबदारीची जाणीवच आता उरलेली नाहिये. मिडियाला चौथा स्तंभ का म्हणतात हे खरोखर ज्याला कळाले तो खरा हाडाचा पत्रकार.
No comments:
Post a Comment