हो नाही करत आज शेवटी एकदाचा दुनियादारी हा चित्रपट पाहिला.
चित्रपटाची (खरे तर सुशिंच्या कादंबरीतील) मूळ कथा गरजेनुसार बदलल्याचे सुरुवातीलाच दिग्दर्शकाने जाहीर केल्यामुळे एक स्वतंत्र कथानक म्हणून या चित्रपटाकडे बघणं ओघानं आलंच. त्यामुळे दिग्दर्शकाकडे दोष जात नाही. जमेच्या बाजूने चित्रपट आवडावा अशी चित्रपटात तीन प्रमुख कारणे आहेत.
१. अंकुश चौधरीचा अप्रतिम अभिनय. - अंकुशचा मला आवडलेला हा एकमेव चित्रपट. एन्ट्री पासून डिएसपी या पात्राला शेवटपर्यंत अंकुशने प्रेक्षकांच्या मनांत जिवंत ठेवलं हे त्याच्या अभिनयाचे यश.
२. चित्रपटाचा शेवट - अफलातून आहे. डोळ्यांत प्रचंड पाणी आणणारा - मूळ कथानकातील शेवट बदलून हा शेवट एका चित्रपटासाठी एकदम क्लायमॅक्स म्हणावा तसा प्रचंड परिणामकारक.
३. सर्व कलाकारांचे अभिनय त्यातल्या त्यात अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर यांचे अफलातून अभिनय
ही झाली जमा बाजू. आता मी ठरलो सुशि प्रेमी. या चित्रपटातील तोट्याची बाजू मी तरी बघणारच.
१. चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत असंबद्ध वाटला. सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' ही कादंबरी वाचल्यामुळे मला संगती लागली. इतरांना ती लावून घ्यावी लागली असणार याची खात्री आहे.
२. उस्फूर्त तारुण्याच्या जोशात नैसर्गिक भावना उमलणे आणि अभिनय म्हणजे काय? यातला नेमका फरक हा चित्रपट पाहून कळतो. तरुणाईतला टवटवीतपणा हा दुनियादारीतला आत्मा होता. हे अनुभवी कलाकार बघताना उगाचच कृत्रिमतेचा फील येतो. सर्वच कलाकारांनी अगदी जीव तोडून मेहनत केली आहे यात वादच नाही. पण दुनियादारीचा फील नाही येत.
आता हे स्वतंत्र कथानक म्हणून सुशिंची दुनियादारी व या चित्रपटाची तुलना बाजूला ठेवली तरी काही गोष्टी कळतच नाहीत. ज्या सुशिंच्या पुस्तकातून ठळकपणे जाणवतात.
जसे
- श्रेयस आणि दिग्याची मैत्री घट्ट का होते? हा प्रसंग साफ फसलाय. मारामारीच्या प्रसंगात एवढ्या लोकांच्या वेढ्यातून सुटून दिग्या श्रेयसला वाचवायला कसा येतो हे काहीच कळाले नाही. अरे किमान एकटा दिग्या सर्वांना धुतो एवढे तरी दाखवायचे. असो हा प्रश्न दिग्दर्शकासाठी सोडून द्यायचा. हवी तेवढी ओळख झालेली नसताना श्रेयस सरळ दिग्याला मैत्री खात्यात धक्का देताना व मारताना दाखवलाय.
- श्रेयस आणि एमके यांचे नाते आले आले गेले गेले अशा प्रकारचे जाणवले. ओढ दिसलीच नाही. उगाचच ताणून मग ती ओढ दाखवली आहे.
- त्यातल्यात्यात मिनू च्या पात्राला उर्मिला कानिटकरने चांगला न्याय दिलाय.
- सई ताम्हणकरने साकारलेला शिरिनचा रोल पावरफुल असला तरी तिच्या भूमिकेचा परिणाम ही दिग्दर्शकाची कमाल समजायला हरकत नाही. अनेक वेळा डबिंगचे संवाद आणि तिचे ओठ यांचा ताळमेळ दिसला नाही.
- श्रेयसच्या भूमिकेत स्वप्निल जोशी सहजपणे वावरला आहे. पण त्याचा प्रभाव तो लक्षात राहील असा शेवटपर्यंत जाणवला नाही. शेवटच्या प्रसंगात मात्र त्याच्या अभिनयाचा कस जास्त दिसला. अंकुशने दिग्याच्या भूमिकेत भरपूर मेहनत केली असल्यामुळे तो या चित्रपटात श्रेयस वर भारी पडला.
- साईनाथची सशक्त भूमिका जितूने विनोदी करुन ठेवली आहे. ते अजून विसंगत वाटते
एकंदर चित्रपटातले लक्षात राहण्यासारखे काय असेल तर ते अंकुश चौधरी आणि उर्मिला कानिटकर
सुहास शिरवळकरांनी दुनियादारीत प्रमुख पात्र हे प्रमुखच राहील याची काळजी घेतली होती. इथे दिग्दर्शकाने काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला हे नक्की. पण हा एक स्वतंत्र चित्रपट म्हणून पाहिला तर थोडेफार मनोरंजन नक्की होईल. पण दुनियादारीशी तुलना केली तर पटणार अजिबात नाही. असे असूनही एकदा तरी पहावा असा हा चित्रपट आहे असे मला तरी नक्की वाटते. सुशिंच्या दुनियादारीची पात्रे तोडक्या मोडक्या स्वरुपात का होईना पण रुपेरी पडद्यावर अवतरल्याचा आनंद सुशिंच्या चाहत्यांना नक्की होणारच. मला तो आनंद झालाय. तुम्हालाही होवो ही अपेक्षा.
धन्यवाद,
- सागर