खरे म्हणजे ब्रेकअप कडे दुःखाचा डोंगर म्हणून बघण्यात काही अर्थ नाही. आपण आपल्या जोडीदाराबरोबर स्वप्ने रंगवतो त्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि तो झालेला सहन होत नाही.
साहजिक आहे.
Be positive factor काम करतो हेही खरे आहे.
त्यातून बाहेर पडणे किंवा त्याच कोशात राहणे या दुहेरी विवंचनेत अनेक जण अडकतात.
स्वतःच्या जगण्यावर प्रेम करावे माणसाने. मग ते कसेही असेना. आयुष्यातली आव्हाने , संकटे, आनंदाचे क्षण , दुःखाचे क्षण सारे सारे फेस करायचे ... जगण्यावर प्रेम असले की कोणतेही नैराश्य लवकर जाते असा अनुभव आहे. मग ब्रेक अप सुद्धा त्याला अपवाद असू शकत नाही. आयुष्य हे एक नदीचा प्रवाह आहे. त्या प्रवासाचा आनंद मुक्तपणे लुटायचा. सर्व वळणे सुखद यात्रा देतीलच असे नाही. काही वळणे जीवनात वादळे सुद्धा देतात. वाहात राहायचे. वादळे जशी आली तशी निघूनही जातात. उरतो तो फक्त आपल्या जीवनाचा प्रवास. त्या आयुष्यावर .. त्या जगण्यावर नितांत प्रेम करायचे ... आयुष्य जगणे सुसह्य होते. कोणा एका व्यक्तीच्या अपेक्षेने मागे लागले की लहान मुलासारखे घट्ट धरून ठेवण्याचे प्रयोग होतात. पण प्रेम हे रेतीसारखेच असते. जेवढे घट्ट धराल तेवढे हातातून निसटून जाते.
मुक्त पणा आणि सहजपणा हा प्रेमाचा खरा आविष्कार आहे. जिथे प्रेम मुक्त आणि सहज असते तिथे बंधने येत नाहीत आणि त्यामुळे धरून ठेवणारी बंधने देखील येत नाहीत. प्रेम अनुभवा... जगा... जगू द्या... निखळ आयुष्याचा आनंद घ्या.
ब्रेक अप आपल्या सुंदर आयुष्यातले आपल्यातीलच स्वत्वाला आकार देणारे स्वतःचीच स्वतःला नव्याने अधिक क्षमतांची ओळख करून देणारे फक्त एक वळण असते. ...
असेच मनात उमटले ते लिहिले
- सागर