Monday, July 9, 2012

सगळे शेतकरी मरायची आपण वाट बघतो आहोत का?

आजच दै. सकाळ मध्ये अपंग शेतकर्‍याच्या आत्महत्येची ही एक बातमी वाचली. कान्हेरी गवळी या छोट्याश्या गावातील अपंग शेतकऱ्याची आत्महत्या

फक्त अठरा हजार पाचशे रुपयांच्या कर्जासाठी लाखमोलाचा शेतकरी गेला. त्यातही हा शेतकरी अपंग होता. अपंग शेतकर्‍यांना कर्जात एवढ्या छोट्या रकमेसाठी सरकार काही करु शकत नाही का? किमान अशी काही धोरणात्मक अंमलबजावणी झाली तर अशा शेतकर्‍यांचे निरर्थक जाणारे प्राण तरी वाचतील. एकेक शेतकरी असा कमी झाला तर खायचे काय हा भीषण प्रश्न एक दिवस नक्की येईल. समाजाचे नेतृत्त्व करणार्‍यांनी या मूलभूत गोष्टींकडे काणाडोळा करु नये असे मनापासून वाटते... यासाठी प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या देणगीचा फायदा कोणत्या शेतकर्‍याला झाला आहे व त्या शेतकर्‍याचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक देणगी देणार्‍या प्रत्येकाला कळेल अशी व्यवस्था निर्माण केली गेली तर माझी खात्री आहे की देणगीदार स्वतःहून पुढे येतीलच पण सढळ हाताने मदतही करतील

अपण स्वतःला सुशिक्षित म्हणवतो. कुठे चाललो आहोत आज आपण? एकीकडे आपण डिस्को, दारु, पार्टी, दागदागिने, भरमसाठ कपडे, बुटं यांच्यावर हजारो रुपये उधळतो. आपण कमावतो व त्या नैतिक अधिकाराने चैन करण्याचा हक्क आहे की आपल्याला. चैनही केलीच पाहिजे. नाही असे नाही. पण कुठपर्यंत? आपल्या पैकी काही लोकांच्या ४-५ दिवसांच्या खर्चाएवढी रक्कम आपल्याला अन्न पुरवठा करणार्‍या एका शेतकर्‍याचा जीव जाण्यासाठी कारणीभूत होणार असेल तर नक्कीच विचार करण्याची वेळ संपलेली आहे. आता कृतीची वेळ आलेली आहे. समाजाचे नेतृत्त्व करणार्‍या सर्वच जणांनी, राजकारणी, नेते, समाजसेवी संस्था, नगरसेवक, आमदार, खासदार, तुम्ही आम्ही सर्वांनीच सखोल आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. झाडे वाचवा... प्राणी वाचवा... अशा ढीगाने उपलब्ध असणार्‍या समाजसेवी संस्थांनी अशा मूलभूत प्रश्नांवर एकत्र येण्याची गरज आहे. आधी माणूस वाचवा मग झाडे आणि इतर प्राण्यांचे बघता येईल. उद्या खायला अन्न मिळाले नाही तर ही समाजसेवा करण्यासाठी उभे तरी रहाल का तुम्ही? शेतकरी रिलिफ फंड असा एक तरी फंड आहे का? त्यातून देणग्या घ्या आणि अशा गरजूंना मदत करा. किमान त्या बिचार्‍यांचे जीव तरी वाचतील. पैसे कमावण्याच्या नित्य नव्या कल्पनांच्या शोधात असणार्‍या काही जणांना ही कल्पना म्हणजे एक सुवर्णसंधी वाटेल. पण इथे हजारो गरजूंच्या प्राणांचा प्रश्न आहे. त्यांच्यावर अवलंबून राहणार्‍या कुटुंबाचा प्रश्न आहे. इथेतरी सडकेपणा आणू नका.

मी एक चित्रपट पाहिला होता. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' - मकरंद अनासपुरेने या चित्रपटात अगदी जिवंत भूमिका केली आहे. अभिनय हा शब्द न वापरता येथे मी भूमिका हा शब्द हेतुतः वापरलाय हे लक्षात घ्यावे. कारण हा मकरंद अनासपुरे त्याच भागातून आलेला आहे. त्याला या प्रश्नाची अतिशय योग्य जाणीव होती, त्यामुळेच या चित्रपटात त्याने जे अनुभवले वा पाहिले तीच भूमिका साकारली आहे. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या ज्वलंत प्रश्नावर अगदी मनाला त्याची धग पोहोचेल अशा ताकदीचा हा चित्रपट आहे. या चित्रपटातले एकच वाक्य तुम्हाला सांगतो म्हणजे वस्तुस्थितीची कल्पना येईल. जिवंत माणसाला पेरणीसाठी काही हजार रुपये मिळत नाही आणि मेल्यावर मात्र १ लाख रुपये मिळतात. तेच पैसे सगळ्या शेतकर्‍यांना वेळच्या वेळी दिले तर कशाला शेतकरी कर्जबाजारी होईल? तुमच्या आमच्यासारख्या शहरातल्या लोकांना साधी २ तास लाईट गेली की अरे बापरे आता काय होणार हा प्रश्न पडतो. विचार करा शेती हा ज्यांचा प्राण आहे त्या शेतकर्‍यांच्या गावागावांतून १२-१२ ते १६-१६ तास लोड शेडिंग असते. पाणी मोटारने खेचायला रात्री अडीच तीन च्या पुढे वीज येते. अशा विपरित परिस्थितीत आपण एक दिवस तरी राहू शकू काय? माझे हे विचार वाचून कोणी खरा समाजहितैषी जागा झाला तर मला आनंदच आहे. पण मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांसाठी काही करता येणार असेल तर सोबत येणार्‍या प्रत्येक हातामागे शेतकर्‍यांचे लाखो आशिर्वाद असतील .

जाता जाता एकच सांगतो. महाराष्ट्र हा शेतकर्‍यांच्या सर्वात जास्त आत्महत्या होणारे राज्य आहे. मुख्य म्हणजे शेतीच्या पार्श्वभूमीतून वर आलेले मोठे मोठे नेते देखील या देशात महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणार्‍या शेतकर्‍यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन पैसा कमावण्याकडेच लक्ष देतात. प्रश्न खूप गंभीर होत चाललेला आहे. वेळीच शेतकरी आणि शेती वाचवली नाही तर अन्नासाठी दुसर्‍यांकडे हात पसरायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

दैनिक सकाळला धन्यवाद की अशा बातम्यांना त्यांच्या संकेतस्थळावर पहिल्या पानावर स्थान देत आहेत. किमान अशा घटनांच्या माहितीमुळे तरी समाज जागा करण्याचे काम सकाळ करत आहे. आज मला या बातमीने लिहायला प्रेरित केले उद्या लाखो हात शेतकर्‍यांच्या मदतीसाठी उभे राहतील

धन्यवाद,
सागर भंडारे
बंगलोर

3 comments:

  1. Atyant vichar karayala lavnara, asvasth karanara lekh. Sarvanchich man sharamene jhukayala havi...kharech....

    ReplyDelete
  2. संजय सर, आपल्यासारख्या थोर विचारवंत, संशोधक आणि लेखकाची प्रतिक्रिया मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. मनापासून धन्यवाद

    ReplyDelete