Sunday, June 30, 2013

पहिले स्वातंत्र्यसमर १८५७ साली सुरु झालेच नव्हते

पहिले स्वातंत्र्यसमर १८५७ साली सुरु झालेच नव्हते. तर इंग्रजांविरुद्ध पहिल्या  स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात सिद्धू - कान्हू या दोन भावांच्या नेतृत्त्वाखाली १८५५ सालीच झाली होती.



इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळवण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात १८५७  साली झाली होती असा सर्वसाधारणपणे समज आहे. पण हा समज निखालस चुकीचा आहे. १८५७ चे स्वातंत्र्य समर सुरु होण्याच्या अगोदरच साधारणपणे दोन-अडीच वर्षे अगोदर ३० जून १८५५ रोजी एक ठिणगी (सध्याच्या)  झारखंडात पेटली होती. किंबहुना १८५७ च्या युद्धाचे लोण भारतभर पसरण्याचे मुख्य श्रेय या १८५५ च्या उठावाला जाते. (सध्याच्या) झारखंडात असलेल्या संथाल या परगण्यात सिद्धू आणि कान्हू या दोन भावांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या इंग्रजांविरुद्धच्या या लढ्यामुळे इंग्रजांना खूप मोठी हानी सोसावी लागली होती. संथाल विद्रोह म्हणून हा उठाव इंग्रजांच्या कागदपत्रांमधून नोंदवला गेला आहे. या उठावाच्या यशामुळेच १८५७ सालापर्यंत स्वातंत्र्ययुद्धाचे लोण भारतभर पसरले. त्यामुळे १८५७ पासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात झाली असा जो समज आतापर्यंत होता तो चुकीचा आहे हे या 'संथाल विद्रोहा'मुळे स्पष्ट होते.

हा १८५५ चा उठाव कसा, कोठे आणि कोणामुळे झाला हे आता पाहूयात. म्हणजे हा उठाव केवढा मोठा होता आणि याचे महत्त्व केवढे होते हे वाचकांच्या लक्षात येईन.

(सध्याच्या साहेबगंज जिल्ह्यामधील) भगनाडीह गावापासून सुरुवात झालेल्या या विद्रोहाच्या वेळी सिद्धूने घोषणा केली होती - "करो या मरो, अंग्रेजों हमारी माटी छोडो".  या घोषणेमुळे क्रांतीकारकांच्या 'करेंगे या मरेंगे' या घोषणेचा उगम कोठे होता हे लगेच लक्षात येते. नागपुरी साहित्यिक व इतिहासकार बी.पी. केशरी सांगतात की हा विद्रोह संथाल परगण्यातील समस्त गरिब आणि शोषित झालेल्यांचा अत्याचार करणार्‍या इंग्रजांच्या आणि त्यांच्या कर्मचार्‍यांच्या विरोधातील स्वातंत्र्य लढा होता.
या आंदोलनाचे स्वरुप केवढे विराट होते याची कल्पना यात सामील झालेल्या लोकांच्या संख्येमुळे येते. संथाल विद्रोह हा इंग्रजांच्या सत्तेविरुद्धचा सशस्त्र लढा होता. ३० जून १८५५ रोजी भगनाडीह येथे ४०० गावांतील लोक पारंपारीक शस्त्रे घेऊन जमा झाले आणि या आंदोलनाची सुरुवात झाली. भगनाडीह येथे झालेल्या सभेत घोषणा करण्यात आली की आता त्यांच्यापैकी कोणीही मालगुजारी इंग्रजी सरकारला देणार नाही. या घोषणेनंतर सिद्धू आणि त्याच्या तीन भावांना पकडण्याचे आदेश इंग्रज सरकारने दिले. पण ज्या विभागीय पोलिस इन्स्पेक्टरला इंग्रजांनी या चार भावांना अटक करण्यासाठी पाठाले होते त्याचे मुंडके प्रक्षुब्ध झालेल्या आंदोलकांच्या जमावाने उडवले. या क्रांतीमुळे इंग्रजांची संथाल परगण्यातील सत्ता जवळपास संपुष्टात आली.


इंग्रजांच्या या मोठ्या पराभवाने संथाल परगण्यातील ४०० गावांच्या मोठ्या जमावाने जणू अवघ्या भारताला संदेशच दिला की आपण सर्व एकत्र आलो तर या इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावणे शक्य आहे. पुढे या संथाल विद्रोहाचेच पडसाद अवघ्या भारतात उमटले.

या पराभवाने चवताळलेल्या इंग्रजांनी पुढे संथाल परगण्यावर लष्करी हल्ला केला. या सैन्य कारवाईत त्यांनी कित्येक लोकांना अटक केली व विरोधासाठी जमा झालेल्या जमावावर अमानुषपणे गोळीबार करुन असंख्य लोकांची हत्या केली गेली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी इंग्रजांना संथाल परगण्यात मार्शल लॉ लावावा लागला होता. एवढेच नव्हे तर आंदोलकांमध्ये फूट पाडण्यासाठी आंदोलकांची माहिती देणार्‍यास रोख रकमेच्या पुरस्कारांची घोषणाही केली गेली होती 


 १८५५ च्या या संथाल विद्रोहामुळे इंग्रजांच्या तत्कालीन मांडलिक राजांना इंग्रजांविरोधात विजय मिळवता येऊ शकतो याचे भान आले. त्यानंतर संथाल परगण्यातील लोकांचा लढा हळू हळू भारतात सगळीकडे पसरु लागला आणि भावी काळातील हितांसाठी अनेकांनी मग १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतला. पण याची सुरुवात १८५५ सालीच संथाल परगण्यातील सिद्धू व कान्हू या भावांच्या जोडीने केलेली होती. 

भारताच्या स्वातंत्र्य युद्धास सुरुवात करुन देणार्‍या या संथाल परगण्यातील लोकांच्या शौर्याचे स्मरण पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे प्रणेते असे म्हणूनच आपण केले पाहिजे. 

धन्यवाद
- सागर

Sunday, June 23, 2013

भारताचे शत्रू कोण? : भाग १ : चीनचे वाढते संकट

भाग १ : चीनचे वाढते संकट
आधी काही बातम्या देतो. मग या विषयाचा समाचार घेऊयात.

१. गिलगीट-बाल्टिस्तानात आहेत चिनी सैनिक
२. भारत-चीन लष्करी संबंध सर्वसाधारण स्वरूपाचे
३. लष्करी अधिका-याच्या दौ-यास चीनचा नकार
४. चीनची कुरापत; भारताचे चोख प्रत्युत्तर
५. चीनच्या वाढत्या हालचाली चिंताजनक

चीन एक जगातील एक समर्थ आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या कित्येक दशकांत चीनची होत असलेली प्रगती त्यांच्याकडे एक ठोस योजना असल्याचे स्पष्टपणे दाखवते. एखादा देश स्वबळावर मोठा होत असेल तर ती नक्कीच कौतुकास्पद गोष्ट असते. भारतही हळू हळू मोठा होतो आहे. पण भारत आणि चीन या दोघांच्या मोठे होण्यात फरक आहे. भारतात लोकशाही आहे तर चीनमध्ये कम्युनिस्ट राज्य करत आहेत. कम्युनिस्ट म्हणजे थोडक्यात हुकुमशाही. का हा प्रश्न नाही विचारायचा?

भारत उद्या कितीही मोठा झाला तरी जगाला एक खात्री आहे की सत्तेचा दुरुपयोग भारताकडून होणार नाही. या खात्रीला एक निश्चितता म्हणता येईल. याचे श्रेय सरकारच्या धोरणापेक्षा प्रामाणिकपणे जगभर काम करत असलेल्या सर्व भारतीयांना दिले पाहिजे.

चीनने काय केले? चीन हा खूप महत्त्वाकांक्षी आहे. चीन ने (युद्धाच्या स्वरुपात) रक्ताचा थेंब न सांडता तिबेट घशात घातला. तिबेटच्या स्थानिकांचा विरोध असूनही चीन हे करु शकला कारण तिबेटमधील आवाज जगापर्यंत पोहोचू न देण्याची दक्षता त्यांनी घेतली होती. तिबेट बळकावण्यापूर्वी चीनने काय काय केले हेही पाहुयात.

चीन ने देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले मनुष्यबळ सक्तीने उपयोगात आणले. चीनचा आकार, भौगोलिक फायदा आणि उपलब्ध संसाधने यांच्या जोरावर चीनने आधी उद्योग जगत काबीज केले.
चीनने आधी व्यवस्थित अभ्यास केला की जगात कोणत्याही वस्तूचे उत्पादन करणे हे प्रत्येक कंपनीला खर्चाचे पडते आणि त्यामुळे त्या कंपन्यांना नफा हा मर्यादित मिळतो. वाचकहो नीट लक्ष देऊन हा मुद्दा समजून घ्या. जगातील कोणतीही कंपनी धंदा करते त्याचे उद्दीष्ट केवळ एकच असते - जास्तीत जास्त नफा मिळवणे. नेमकी हीच नस पकडून चीनने काय केले? या सर्व मोठ्या कंपन्यांना लक्ष्य केले. आमच्या देशात तुम्ही उत्पादन सुरु करा तुमचा खर्च कमी होईल व नफा देखील वाढेल. सरळ सरळ धंद्याचा विचार करणारा कोणीही हेच करेन. मुख्यकरुन त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत असलेल्या संधी बरोबर हेरल्या. हळू हळू चीनमध्ये उत्पादनांचा धूर निघू लागला. स्वस्त उत्पादनामुळे कंपन्यांचा पैसा वाचू लागला व उत्पादनही जास्त संख्येने होऊ लागले. हा पैसा जाहिरात व तत्सम मार्केटींग वर खर्च केला गेला. त्यामुळे कंपन्यांचे विक्रीचे आकडे वाढू लागले. सर्व प्रकारचे उत्पादन चीन ने केले. अमेरिकेतील संगणकांतील चिप्स, मोबाईल हँड्सेट्स, मुख्यत्वेकरुन खेळणी या सर्वांपासून टॉयलेटमध्ये वापरले जाणारे टॉयलेट पेपर, पेपर नॅपकिन्स हे देखील चीन मध्ये तयार होतात.

चीनने जगाला अशी सवय लावली होती की स्वस्त उत्पादनाचे दुसरे नाव चीन झाले. त्यामुळे चीनकडे पैसा वाहू लागला. चीनने काय केले? या पैशांतून मोठ्मोठी धरणे, मोठमोठी बांधकामे, रस्ते, रेल्वेमार्ग अशा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठ्या प्रमाणावर जाळे उभे केले.

स्वस्तात उपलब्ध असलेला माल व स्वस्तातले मनुष्यबळ ह्या जोरावर चीन आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करत गेला. हळुहळू चीनला या इन्फ्रास्ट्रक्चर क्षमतेचे सामरिक महत्त्व कळून आले. आता ड्रॅगनच्या पंज्यात बळ आले होते. तिबेटचा घास जगाच्या (किरकोळ) विरोधाला न जुमानता गिळला होता. आता चीनची नजर आहे ती अरुणाचल प्रदेश, सियाचीन, गिलगीट-बाल्टिस्तान या भागांवर. तुम्हाला कदाचित आश्चर्यदेखील वाटू शकेल पण नेपाळही या यादीवर आहे. त्यादृष्टीने नेपाळमधील (आणि भारतातीलही) माओवाद्यांना शस्त्रपुरवठा छुप्या मार्गाने सुरु आहेच, पण नेपाळमधील राजकारणात पडद्याआड मोठी खेळायच्या प्रयत्नात आहे चीन. भारताच्या लेह मधील सीमेलगतचे रस्त्याचे बांधकाम चीनने बंद पाडले होते. त्यावेळी आपण फक्त निषेध व्यक्त करुन स्वस्थ बसलो. तो रस्ता पूर्ण झाला की नाही? का काम सोडून दिले काही पत्ता नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही असे म्हणून आपले परराष्ट्र खाते कायमच झुकत आले आहे. आपले लोकनियुक्त सरकार फक्त लक्ष ठेवून आहे. आजची बातमी ही आहे की चीनचा इंटरेस्ट हिंदी महासागरातही वाढायला लागला आहे. त्यावर आपले परराष्ट्रमंत्री यांचे स्टेटमेंट वाचले - " ही बाब चिंताजनक आहे, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत" म्हणजे काय? बोलायची गरज आहे का यावर?
वुई कन्डेम्नड् सच अ‍ॅक्टीव्हिटीज असे म्हणून शत्रू काय घुसखोरी थांबवणार आहे काय?
असो.

पाकीस्तानच्या रुपाने चीनला एक मोठी संधी दिसत आहे. पाकीस्तानला भारताविरुद्ध सर्व प्रकारची मदत चीन करत आहे. गिलगीट-बाल्टिस्तानात मोठमोठे बोगदे खणणे, मोठे रस्ते बांधणे, रेल्वेमार्ग उभारणे या सर्व साधनांद्वारे चीन आखाताच्या दोन दिवसांच्या अंतरावर आला आहे. हे कशासाठी? व्यापारासाठी? अजिबात नाही. चीन हळूहळू युद्धाच्या दिशेने पावले टाकतो आहे. युद्धात सर्वात जास्त काय वापरले जाते? दारुगोळा चालवण्यासाठी जी मशिनरी लागते त्यांसाठी लागणारे इंधन. आखात जवळ आले की तेलाचा खूप मोठा पुरवठा आणि तो ही ताबडतोब चीनला होणार आहे. पाकीस्तानची मैत्री चीन फक्त भारताविरोधातच नव्हे तर आखाती देशांतील इस्लामी राष्ट्रांचे हितसंबंध जपण्यासाठीही वापरत आहे. तेलाची खरेदी गेल्या काही वर्षांत चीनने जेवढी केली तेवढी कोणीच केलेली नाहिये. चीनकडे याक्षणी प्रचंड तेलसाठा आहे. भारतीय सीमेलगत कित्येक ठिकाणी हे तेलसाठे चीन साठवत आला आहे. युद्धाच्या वेळी काश्मीर च्या मोबदल्यात पाकीस्तानकडून चीनला काय अपेक्षा आहे? भारताविरुद्ध अतिरेकी कारवायांचे प्रमाण वाढवणे आणि सियाचीन व अरुणाचल प्रदेशातील जेवढा टापूं चीन व्यापेल त्याला समर्थन देणे.

चीनच्या या तयारीच्या तुलनेत भारताची काय तयारी आहे?
मेनन म्हणाले, की चीन सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक महासत्तेचा दर्जा मिळविण्यात अधिक व्यस्त  आहे. युद्ध करून चीन ते स्थैर्य धोक्‍यात आणण्याची शक्‍यता नाही. असे बेजबाबदार वक्तव्य करुन मेननसाहेब (हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत) स्वप्नात जगत आहेत असे मला तरी वाटते. जो सामर्थ्याकडे वाटचाल करतो आहे आणि ज्याला जमीनीची तहान आहे तो चीन भारताशी युद्ध करणार नाही या भ्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने रहावे? भारताकडे किती पाणबुड्या आहेत? किती लष्करी जहाजांचे उत्पादन दरवर्षी भारतात होते? किती विमाने खरेदी केली जातात? किती तोफा अद्ययावत आहेत? लष्करी शस्त्रे व अस्त्रे यांबाबतीत एक क्षेपणास्त्र सोडले तर आपला देश सगळ्या महत्त्वाच्या संसाधनांसाठी दुसर्‍या देशावर अवलंबून आहे. आकड्यांच्या तुलनेत भारत चीनपुढे कुठेही टिकत नाही. युद्ध हे कोणत्याही राष्ट्राला परवडत नाही. पण असे होणारच नाही असे गृहीत धरणे म्हणजे मेंदूला ज्वर आल्याचे लक्षण नाही का?

भारतीय परराष्ट्र मंत्रालय चीनबरोबर सामरिक देवाणघेवाणीचे करार करत आहे. त्या अनुषंगाने भारताचे काही लष्करी अधिकारी चीनला भेट देणार आणि चीनचे लष्करी अधिकारी भारताला भेट देणार. लेफ्टनंट जनरल बी. एस. जसवाल यांच्या दौर्‍यावर चीनने आक्षेप घेतला नसता तर लोकांना ही गोष्ट कळाली असती की नाही हे माहिती नाही. पण यापेक्षा भयानक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की जसवाल प्रकरणी प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ज्या चीनी अधिकार्‍यांचा दौरा रद्द केला त्याबद्दल कोणी काही माहिती घेतली आहे का? या दौर्‍याच्या वेळी चीनचे हे अधिकारी पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी (एनडीए) येथे भेट देणार होते. हे सत्र कधीपासून चालू आहे हे सरकारलाच माहिती. जसवाल यांची नियुक्ती जम्मू व काश्‍मीरसारख्या संवेदनशील भागात आहे. तेथील लोक वेगळे पारपत्र (व्हिसा) घेऊन येतात. जसवाल काश्‍मीरमधून येत असल्याने त्यांना चीनच्या दौर्‍याची परवानगी देता येणार नाही,' असे चीनतर्फे भारताला कळविण्यात आले. असे असताना एनडीए ही देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणारी संस्था आहे. शेजारचे राष्ट्र सामरिकदृष्ट्या बलवान होत असताना देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणार्‍या संस्थेची गुपितं उघड करणे याला कोणत्या बुद्धीचे परराष्ट्र धोरण म्हणता येईल? ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणू शकते एवढी साधी गोष्ट सरकारच्या ध्यानात येऊ नये?

चीनचा ड्रॅगन आपले पंजे आधी बळकट करतो आहे आणि मगच हळूहळू पाय पसरतो आहे. चीनची ही नीती लक्षात येत नसेल तर आपले पराष्ट्र धोरण आखणारे सरकारच विफल ठरते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. तिबेटच्या स्वायत्ततेसाठी आवाज उठवणार्‍या दलाई लामा यांना भारतात आश्रय घ्यावा लागला, केवळ दोन दिवसांच्या अंतरावर आखाताशी संपर्क चीनने निर्माण केला, तेलाचा प्रचंड साठा केला गेला आहे. लष्कराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला आहे. काही लोकांना चीनशी चांगले संबंध ही एक सुवर्णसंधी वाटते आहे. अशा लोकांनी या घडणार्‍या घटनांकडे डोळसपणे पहावे व जागे व्हावे एवढेच सांगून थांबतो.

धन्यवाद,
-सागर

एकी नसल्यामुळे सरकारचे फावते आहे


लोकांमध्ये सरकारच्या मनमानी कारभाराबद्दल प्रचंड प्रक्षोभ आहे.
पण सर्व जनआंदोलकांमध्ये एकी नसल्यामुळे सरकारचे फावते आहे.

फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती काँग्रेस आजपर्यंत वापरत आले आहे.
म्हणूनच सामान्य जनता अण्णा हजारे, रामदेवबाबा व तत्सम इतर लोकनेत्यांमागे जरी जात असली तरी त्यात चार दिवसांची जत्रा होते एवढेच
सरकार मात्र मूग गिळून हा तमाशा बघत बसले आहे.
एकाच व्यासपीठावर अण्णा हजारे, रामदेव बाबा , श्री श्री रविशंकरजी, सर्व धर्मीय संत-इमाम-फादर एकत्र आले तर सरकारची काय हिम्मत आहे की विरोधाने अशी आंदोलने चिरडून टाकण्याची?

सामान्य जनता आज गांधीजींची ३ माकडे झाली आहेत.

एकी हेच बळ हा पुस्तकी सुविचार सर्वसामान्य जनता आचरणात आणेन तो दिवस भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा आहे.

आजपर्यंत जनतेने नुसत्या पुढच्या अफरातफरीवर नजर टाकली असती तरी हे सरकार पडावे यासाठी ठोस भूमिका घेऊन आंदोलने केली असती.
मतदान करुन ५ वर्षांसाठी सरकार निवडण्याचा हक्क जसा सामान्य जनतेला आहे
तसाच हक्क जर ते सरकार कार्यक्षमतेने काम करत नसेन तर  ५ वर्षे पूर्ण होण्याअगोदर खाली खेचण्याचा हक्कही सामान्य जनतेला आहेच.
या हक्काची अंमलबजावणी कोण करते आज?

विकास होत नसेन तर आपल्या कार्यक्षेत्रातील आमदार - खासदाराला जाब विचारण्याचा अधिकार घटनेने सर्वसामान्य जनतेला दिला आहे.
तो हक्क कार्यक्षमतेने वापरण्याऐवजी आपण या नेत्यांच्या दहशतीखाली दबून जातो.

नाहीतर
बोफोर्स कांड
विमान खरेदी कांड
कॉमनवेल्थ घोटाला
हवाला घोटाळा
२जी स्पेक्ट्रम घोटाळा
राडिया कांड
आयपीएल कांड

इत्यादी ... इत्यादी ...

अशी भ्रष्टाचाराची वाढती कमान असलेल्या नेत्यांना आपण पुन्हा पुन्हा निवडून देता?

विरोधी पार्टी पण तशीच आहे असे म्हणून आपण भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा निवडून देतो. त्यामुळे स्वतःचाच पैसा लुटला जातोय ही जाणीवच जनतेला नाहिये.
५०० रुपयाच्या बिलापैकी
३९० रुपये जेवणाचे असतात आणि ११० रुपये आपण सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट पोटी देतो हे कोणीतरी बघते का?

२०-२५ रुपये किलोने मिळणारा तांदूळ (जे गरिबांचे प्रमुख अन्न आहे) तो आज ६० - ७० रुपये किलोने मिळतो आहे.  ( चांगला बासमती १०० च्या पुढे मिळतो)

पेट्रोलचे भाव कित्येक वेळा वाढवले.  ३८- ४० रुपयांनी मिळणारे पेट्रोल आज  ७० रुपयांच्या च्या पुढे गेले आहे

एकत्र व्हा. तरच लोकशाहीचा फायदा सामान्य जनतेला मिळेन. नाहीतर नेतेपणाचा बुरखा पांघरलेले लुटारु तुमच्या कष्टाचा पैसा लुटल्याशिवाय राहणार नाहीत.


Wednesday, June 12, 2013

महान इजिप्शियन संस्कृती

-महान इजिप्शियन संस्कृती-

सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते। ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती. 


ह्या महान इजिप्शियन संस्कृतीचे तीन मुख्य काळ होते,’सुरुवातीचा काळ’, 'मध्य काळ' आणि 'अस्तकाळ'। सुरुवातीच्या काळात इजिप्शियन संस्कृती प्रगतीसाठी प्रयत्नशील होती। त्यानंतरचा मध्यकाळ हा इजिप्शियन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ मानला जातो. याच मध्यकाळात इजिप्शियनांनी प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते. त्यांच्या हातून अनेक अविस्मरणीय कलाकृतींची निर्मिती झाली. इजिप्शियन संस्कृतीने प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते तो काळ सुमारे ४०० वर्षांचा मानला जातो. अशी ही महान इजिप्शियन संस्कृती सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी उदयास आली.


इजिप्तचे 'अपर इजिप्त' म्हणजे 'दक्षिण इजिप्त' आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' असे दोन भाग पडतात। इजिप्शियन संस्कृती मुख्यत: ह्या 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' मध्ये भरभराटीस आली. पुढील नकाशा ही गोष्ट स्पष्ट करेन.


इजिप्तच्या सुवर्णमध्याच्या काळात तुतनखामुन (तुत-आँख-अमुन)(Tutankhamun) ' हा राजा इजिप्तच्या राजगादीवर आला. हा 'तुतनखामुन' राजा इजिप्तमध्ये अतिशय लोकप्रिय होता.'तुतनखामुन' हा 'फॅरोह' (pharaoh) वंशाचा राजा होता.ह्या 'तुतनखामुन'च्या कबरीचा पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. ते म्हणतात की, जगात जेवढे म्हणून पिरॅमिडस् असतील त्यात 'तुतनखामुन' चा पिरॅमिड सर्वोत्कृष्ट ठरेल. 



या 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडचा शोध १९२२ मध्ये 'सर हॉवर्ड कार्टर' या इतिहास संशोधकाने लावला. 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडमध्ये प्रवेश केल्यावर त्याच्या कबरीमध्ये त्याची 'ममी' पहायला मिळते.'तुतनखामुन' च्या ममीच्या चेहर्‍यावर जो मुखवटा आहे, तो पूर्णपणे शुद्ध सोन्याचा आहे. या मुखवट्यावरील कलाकुसर बघण्यासारखी आहे. या मुखवट्यावर नाग आणि गरुड ही दक्षिण इजिप्शियनांची चिन्हे आढळतात.



तुतनखामुनच्या नावात येणारी (तुत-आँख-अमुन) अमुन ही इजिप्शियन देवता होती. 


ही महान इजिप्शियन संस्कृती इजिप्तमधील पिरॅमिडस् साठी प्रसिद्ध आहे. कारण हे पिरॅमिडस् म्हणजे जगातील एक आश्चर्यच आहे. ह्या पिरॅमिडसची बांधणी विशिष्ट प्रकारची आहे. पिरॅमिडला चार बाजू असतात. सर्व बाजू ज्या टोकापाशी मिळतात, त्या ठिकाणी ९० अंशांचा कोन होतो. आज आपण असा पिरॅमिड बांधायला गेलो तर आपण असा पिरॅमिड बांधू शकत नाही. कारण पिरॅमिड बांधायचे इजिप्शियनांचे एक विशिष्ट तंत्र होते. ते तंत्र आपल्याला अजून तरी अवगत नाही. पिरॅमिडस् बांधण्यासाठी इजिप्शियनांनी मोठ-मोठे अवजड दगड वापरले आहेत. इतके अवजड दगड इजिप्शियनांनी वाहून कसे नेले हे एक न सुटलेले कोडे आहे. हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.
एकदा दक्षिण इजिप्तच्या राजाने स्वत:च्या कबरीसाठी खास इमारत बांधायचे ठरवले। त्याप्रमाणे त्याने त्याच्या वजिराला ते काम सांगितले। त्या राजाचा "इमहॉटेप" नावाचा हुशार वजिर होता। त्याने आधी पिरॅमिडची आखणी केली। मग पक्के दगड वापरुन जगातील पहिला पिरॅमिड बांधला. हा पहिला पिरॅमिड उभारायला बराच वेळ लागला. हा पिरॅमिड बांधण्यासाठी 'इमहॉटेप' वजिराने खूप मजूर कामास लावले होते। ह्या पिरॅमिडनंतर असे अनेक पिरॅमिडस् बांधले गेले. हे पिरॅमिडस् बांधणे खूप अवघड होते. पण कारागिरांना एकदा हे तंत्र कळाल्यावर हे पिरॅमिडस् वेगात बांधले गेले. पण हे पिरॅमिडस् बांधणे अतिशय खर्चाचे काम असल्यामुळे ते केवळ राजे व श्रीमंत लोक यांनाच शक्य होते. 

इजिप्शियन लोकांच्या अद्भुत पिरॅमिडस् प्रमाणेच इजिप्शियनांच्या 'ममीज्' देखील प्रसिद्ध आहेत। राजे किंवा श्रीमंत लोक स्वत:च्या मृत्यूनंतर स्वत:च्या पिरॅमिडमध्ये स्वत:ची 'ममी' तयार करुन ठेवायचे. शेकडो वर्षे उलटली तरी या 'ममीज्'जशाच्या तशाच आहेत.'ममी' म्हणजे शरीरावर काही विशिष्ट प्रक्रिया करुन ते शरीर सुकवणे. अशा अनेक 'ममीज्' इजिप्तमधल्या अनेक पिरॅमिडमध्ये सापडल्या आहेत. सध्या पिरॅमिडस् ची बरीच पडझड झाली आहे. तरीही आज अनेक पिरॅमिडस् सुस्थितीत आहेत.पाच हजार वर्षांपूर्वीच्या 'ममीज्' जशाच्या तशा आढळतात हे ही एक आश्चर्यच आहे.ह्या 'ममीज्' कशा तयार करायच्या ह्याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. पण हे इजिप्शियन 'ममीज्' सहज बनवायचे.अर्थातच स्वत:ची ममी तयार करणे हेही खर्चाचेच काम होते, त्यामुळे हे ही फक्त राजे आणि श्रीमंत लोक यांनाच परवडत असे.



ह्या इजिप्शियनांची एक श्रद्धा होती की, राजा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होतो। आपल्या प्रिय राजाला पुढे उपयोगी पडाव्यात म्हणून त्या राजाच्या पिरॅमिडमध्ये इजिप्शियन लोकांनी भाकरीचे तुकडे, घोडे वगैरे प्राणी इ. अनेक वस्तूंच्या 'ममीज्' बनवून राजाच्या कबरीजवळ ठेवल्या आहेत. तसेच मातीची भांडीदेखील राजाच्या कबरीजवळ ठेवलेली आढळतात. एकदा तर इजिप्शियनांनी आपला राजा जिवंत झाल्यावर समुद्रपर्यटनासाठी त्याला उपयोगी पडावी म्हणून नावेचे तुकडे त्याच्या पिरॅमिडमध्ये पुरुन ठेवले होते. पुरातत्त्व संशोधकांनी हे तुकडे जोडल्यावर १३० फूट लांबीची भलीमोठी नाव तयार झाली. ह्या नावेची डोलकाठी २९ फूट उंच होती.


इजिप्शियन लोकांची लेखनाची जी लिपी होती, ती लिपी 'हायरोग्लिफ' या नावाने ओळखली जाते। आपली जशी अक्षरलिपी आहे तशी इजिप्शियनांची 'हायरोग्लिफ' ही चित्रलिपी होती. इजिप्शियनांना अक्षरलिपी ज्ञात नव्हती, पण त्यांना ही चित्रलिपी चांगली अवगत होती.इसवी सन ३१०० वर्षी 'हायरोग्लिफ' लिपी अप्पर आणि लोअर इजिप्त मध्ये प्रचलित झाली. 


हे इजिप्शियन लिहिण्यासाठी कागदासारखी एक वस्तू वापरायचे। 'पेपिरस' नावाच्या झाडाचा पांढरा रंग असलेला पापुद्रा, विशिष्ट प्रक्रिया करुन तो वाळवून, त्यापासून कागदासारखी एक वस्तू तयार करायचे. आपल्या कागदापेक्षा त्यांचा कागद हा वेगळ्या प्रकारचा होता. इजिप्शियनांनी तयार केलेला कागद वजनाने हलका आणि लवचिक असल्याने त्या कागदाच्या घड्याही पडायच्या.

नाइल नदी ही इजिप्तची देणगीच होय. एका विशिष्ट दिवशी नाइलला प्रचंड असा महापूर यायचा. पण वर्षातून फक्त एकदाच. ह्या नाईलला एवढा महापूर यायचा की, कित्येक गावे, कित्येक जमीन पाण्याखाली जायची. ह्या नाइल नदीमुळेच इजिप्शियनांनी पंचांग वा कॅलेंडर बनवले. 'ग्रहण' एकाच ठिकाणी दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते. (आजचे सौरचक्र २२ वर्षांचे मानले जाते. कदाचित त्या काळचा पृथ्वी आणि सूर्यसापेक्ष वेग आणि आजचा वेग यात तफावत असू शकेल)
एवढेच नव्हे तर कोणता तारा, कोणत्या महिन्यात कुठे दिसेल, हेही इजिप्शियन्स सांगू शकत होते। यावरुनच कळून येते की इजिप्शियनांची खगोलशास्त्रातदेखील चांगली गती होती. खरोखर हे इजिप्शियन्स् म्हणजे जगातील आश्चर्याचा नमुनाच होते. 



सर्वात शेवटी येतो तो ह्या इजिप्शियन संस्कृतीचा अस्त काळ। ह्या संस्कृतीचा अस्त साधारणपणे इ.स्.पूर्व ४,०००-इ.स्.पूर्व ३,९०० वर्षांपूर्वी झाला. एवढी प्रगत, थोर संस्कृती नष्ट झाली. पण ही संस्कृती कशी नष्ट झाली हे मात्र कोणालाच माहित नाही. आजचे संशोधक, पुराणशास्त्रज्ञ ह्या विषयावर केवळ तर्क लढवित आहेत, पुरावे गोळा करत आहेत.पण अजून तरी त्यांच्या हाती या संस्कृतीच्या अस्ताविषयी काहीच लागलेले नाही.

अशी होती ही इजिप्शियन संस्कृती ... महान इजिप्शियन संस्कृती ...
- सागर

Tuesday, June 11, 2013

मिनोअन आणि मायसिनिअन संस्कृती

मिनोअन आणि मायसिनिअन संस्कृती

पुरातन संस्कृती म्हटले की आपसूकच इजिप्शियन, ग्रीक, माया, इंका, सुमेरियन अशा सर्व संस्कृतींचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर येतो.
मिनोअन आणि मायसिनिअन या दोन संस्कृती तशा दुर्लक्षित पण महत्त्वाच्या होत्या. त्यांची थोडक्यात ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न

मिनोअन संस्कृतीचे सर्वात महत्वाचे शहर म्हणजे 'नोसेस'. आज फ्रान्समध्ये पॅरिसला जे महत्त्व आहे ते महत्त्व त्या काळी 'नोसेस' या शहराला प्राप्त झालेले होते. नोसेस शहराच्या बाबतीत दोन वेळा चमत्कारिक घटना घडल्या. एका मोठ्या भूकंपात नोसेस हे शहर जमिनीत गाडले गेले. लोकांनी मेहनत घेऊन पुन्हा हे नोसेस शहर उभारले. त्यानंतर पुन्हा भूकंप झाला व हे शहर दुसर्‍यांदा गाडले गेले. त्याहीवेळी तेथील लोकांनी हे शहर पुन्हा उभे केले. नोसेस या शहराला काही जण नोसिस या ही नावाने ओळखतात.
मिनोअन राजाने हे नोसेस किंवा नोसिस शहर वसविले. 'मिनोसस' हे त्या राजाचे खरे नाव होते. एजियन समुद्राच्या दक्षिण टोकास ग्रीस जवळ एका खडकाळ बेटांत हे नोसेस शहर होते. येथेच ही मिनोअन संस्कृती सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी उदयास आली.


या संस्कृतीचा शोध अगदी अलिकडे म्हणजे साधारण शंभर वर्षांपूर्वी लागला. १९३९ साली 'सर आर्थर वॉल' या ब्रिटीशाने या मिनोअन संस्कृतीचा शोध लावला. 'मायरिया पटोस' या ठिकाणीदेखील या संस्कृतीचे अवशेष सापडले. जगात सर्वप्रथम 'ड्रेनेज सिस्टीम'चा वापर कोणी केला असेल तर तो या मिनोअन संस्कृतीच्या लोकांनी.

हे मिनोअन लोक शांत व कलाप्रेमी म्हणून ओळखले जात. त्यांच्यात वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला, धातुकला, इत्यादी अनेक कलांमध्ये हे मिनोअन लोक पारंगत होते.

त्यातही त्यांची धातुकलेमधील प्रगती अगदी वाखाणण्याजोगी होती असे सापडलेल्या अवशेषांवरुन दिसून येते. मिनोअन लोक धातूची भांडी तयार करायचे व त्यावर कोरीवकाम, नक्षीकाम करायचे.


व्यापारातही या लोकांनी चांगलीच प्रगती केली होती. आज आपण कागदोपत्री व्यवहार करतो, पैसे देतो. पण हे मिनोअन लोक कोणताही व्यवहार कागदोपत्री , नाणी वा पैसे वापरुन न करता 'वस्तूच्या बदली वस्तू घेणे' म्हणजेच व्यापार मानत. 'बार्टर एक्स्चेंज' पद्धतीची सुरुवात मिनोअन संस्कृतीपासून झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. इजिप्तकडून हे मिनोअन लोक धातू घ्यायचे व त्याबदल्यात धातूची भांडी इजिप्शियनांना द्यायचे.

तसेच दक्षिण आफ्रिकेकडून मिनोअन लोक हस्तीदंत मोठ्या प्रमाणावर घ्यायचे व त्याऐवजी हस्तीदंतावर कोरीव काम केलेल्या वस्तू त्यांना द्यायचे. (अर्थातच जास्त हस्तीदंताच्याबदल्यात कमी कोरीव काम केलेल्या वस्तू हा हिशोब असायचा)
तर असा चालायचा मिनोअन लोकांचा व्यापार.
या मिनोअन लोकांची चित्रकला बरीच चांगल्या दर्जाची होती. हे लोक निसर्गप्रेमी होते असे त्यांनी काढलेल्या चित्रांच्या अवशेषांवरुन स्पष्ट होते. त्यांनी काढलेली बव्हंशी चित्रे ही निसर्गाचीच आहेत.


एजियन समुद्रात 'सॅटोनिमी' नावाचे एक बेट होते. या बेटाला हे मिनोअन लोक 'थेरा' म्हणायचे. हे 'थेरा' बेट त्यांच्या 'नोसेस' शहरापासून केवळ पंच्याहत्तर मैल अंतरावर होते. या थेरा बेटावर प्रचंड असा ज्वालामुखीचा स्फोट झाला. या ज्वालामुखीतून झालेल्या लाव्हारस, राख, धूळ व विषारी वायू यांच्या उद्रेकामुळे शंभर मैल परिसरातील सर्व गोष्टी नष्ट झाल्या. यातच ही मिनोअन संस्कृती नष्ट झाली असे मानले जाते.

मायसिनिअन संस्कृतीचा उदय:
इ.स.पूर्व (म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी सुमारे ) १९५० ते १९०० वर्षे या काळात मिनोअन संस्कृतीचा उदय झाला. ही संस्कृती सुमारे सहाशे वर्षे सुवर्णकाळात होती. याच वेळी युनान प्रदेशात 'मायसिनिअन' संस्कृतीचा उदय झाला. या मायसिनिअन लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा दैवावर वा नशिबावर अजिबात विश्वास नव्हता. त्या लोकांचा विश्वास केवळ स्वत:च्या पराक्रमावर होता. या लोकांकडे संपत्तीही भरपूर होती. साधारणत: इसवी सन पूर्व १९०० ते २००० हा या संस्कृतीचा उदयकाळ मानला जातो. युनान प्रदेशात काही हल्लेखोर टोळ्या होत्या. त्यापैकी 'डोनिअयन' लोकांच्या टोळ्यांनी वारंवार या मायसिनिअन लोकांवर हल्ले केले. साधारणपणे इसवीसन पूर्व १२०० मध्ये केवळ साडेचारशे वर्षांत या संस्कृतीचा नाश झाला. मिनोअन संस्कृतीच्या तुलनेत मायसिनिअन संस्कृतीची माहिती बरीच कमी उपलब्ध आहे.

- सागर 

(टीपः या लेखात वापरलेली चित्रे जालावरुन घेतलेली आहेत व त्यांचे सर्वाधिकार त्या त्या व्यक्ती वा संस्थांकडे सुरक्षित आहेत.)