आजच साहित्य संमेलनाची सांगता झाली आणि या संमेलनाचे कौतुकसोहळे पुढील कित्येक दिवस गायिले जातील. साहित्य चपराकचे संपादक श्री. घनःश्याम पाटील यांनी जानेवारी २०१४ च्या अंकात संपादकीय मधे पुढील विचार मांडले आहेत,
त्या अनुषंगाने मी मांडलेले विचार
घनश्यामजी हा खरोखर जटील मुद्दा आहे. तुमचे आभार की या महत्त्वाच्या संपादकीयावर मी विचार व्यक्त करावेत अशी आपण इच्छा व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाणांनी तेव्हाच्या राजकारण्यांना एक आदर्श निर्माण करुन दिला होता पण इतिहासातील चुकांमधून शिकणे हे आपल्या मातीतच नाहिये हे वारंवार सिद्ध झालेले आहे. त्याच प्रमाणे यशवंतराव चव्हाणांनंतरच्या राजकारण्यांनी एकही क्षेत्र सोडले नाही जे समाजमनाशी वा समाजभावनेशी जवळून निगडीत आहे. मग ते क्रिकेट असो, साहित्य असो, चित्रपट माध्यम असो, शिक्षण असो, जात-पात असो वा अन्य इतर. समाजाच्या मनावर परिणाम करणारे घटक आपल्या ताब्यात ठेवले की समाजमन आपल्याला हवे तसे वळवता येते असा त्यांचा एक गैरसमज आहे. राजकारण्यांच्या या अजाणतेपणामुळे काय नुकसान होते आहे हे त्यांच्या लक्षात येणे अवघडच आहे.
- भाषेचा र्हास
- सृजनशीलतेचा र्हास
- बुद्धीमत्तेचा र्हास
- परंपरेचा र्हास
- समानतेच्या भावनेचा र्हास
- दुसर्याच्या कष्टांचा सन्मान करणार्या भावनेचा र्हास , इत्यादी अनेक आहेत.
समाज व्यक्त करत नाही म्हणजे ती भावना त्याच्यात नसतेच असे नाही. असंतोष हा कायम खदखदत राहतो आणि एक दिवस त्याचा भडका उडतोच उडतो.
मला व्यक्तीशः असे वाटते की - आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा राजकारण्यांना जागेवर आणण्यासाठी साहित्यिक मोठे विचार देण्याचे काम करतात. हे जर राजकारण्यांना मान्य असेल तर - राजकारण्यांनी व्यासपीठ साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसाठी मोकळे ठेवावे व स्वतः खाली इतर प्रेक्षकांबरोबर बसावे. फार तर व्हीआयपी म्हणून त्यांना पुढील जागा देण्यास हरकत नसावी. साहित्य हे तेव्हाच खर्या अर्थाने साहित्याच्या दर्जाचे राहते जेव्हा साहित्यिक राजकारण्यांपुढे लोटांगण घालणे बंद करतील. राजकारणी कितीही मोठा नेता झाला तरी तो साहित्य संमेलनाच्या ठिकाणी एक सामान्य वाचकच असतो. समाजमनाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या जबाबदारीने या राजकारण्यांनी आपापले साहित्य क्षेत्रातील अनुभव जरुर सांगावेत. साहित्यामुळे त्यांना काय प्रेरणा मिळाल्या? सध्याचे साहित्य किती खालच्या वा वरच्या पातळीवर गेलेले आहे याबद्दलची परखड मते (प्रामाणिकपणे) त्यांनी मांडली पाहिजेत. साहित्य क्षेत्रातील निर्मितीमधला जिवंतपणा व सृजनशीलता टिकवायची असेल तर घालीन लोटांगण वंदीन चरण ही प्रवृत्ती साहित्य क्षेत्रातील सर्वच साहित्यिकांनी सोडली पाहिजे. जे चांगले आहे त्याला (जात-पात, रंग-रुप, कोणताही कंपूबाजीपणा न करता) निर्भेळपणे चांगले सर्वजण म्हणू लागतील तो दिवस साहित्य क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. असे झाले तरच आपली मराठी खर्या अर्थाने माय मराठी म्हणून पुढची हजार वर्षे जगात स्वतःचे अस्तित्त्व टिकवू शकेल. अन्यथा पुढील ५० वर्षांनी मराठी वाचणारे एन्टिक पीस म्हणून सापडतील. साहित्यिकांनी स्वतः साहित्य क्षेत्रात हे भान व ही जबाबदारी टिकवणे अत्यंत गरजेचे म्हणूनच आहे. सांगावे तितके कमीच आहे. पण तूर्तास ही लेखणी इथे थांबवतो.