Monday, September 19, 2022

सोफी झांग डाटा सायंटिस्ट हिने फेसबुक चां वापर राजकीय फायद्यासाठी लाखो फेक अकाउंट उघडून केला जातो हे सिद्ध करून डाटा जाहीर केला आहे. त्याचे हे डिटेल्स.

हे महत्त्वाचे आहे. वाचा, शेअर करा, कॉपीपेस्ट करा, इमेलवर, वॉट्सॅपवर पुढे पाठवा.
ट्रोल नेटवर्क्सनी हे रिपोर्ट केल्यानंतर फेसबुकमधले भगवे गुलाम ही पोस्ट कदाचित् काढून टाकतील. कदाचित् असं काही आम्ही करत नाही हे दाखवायला ठेवतीलही. माहीत नाही.
---------------------
आज मला अभिमान वाटतो, एका निर्भय, तत्त्वनिष्ठ स्त्रीने फेसबुक कंपनीचा निगरगट्टपणा चव्हाट्यावर आणला आहे. फेसबुकमधल्या सोफी झांग या डाटा सायन्टिस्टने कंपनीला तिने दिलेला अंतर्गत इशारा प्रसिद्ध झाला आहे. आझरबैजान, होंड्युरास, भारत, युक्रेन, स्पेन, ब्राझील, बोलिव्हिया, आणि इक्वेदॉर या देशांत राजकीय पक्षांची तळी उचलून धरणारे लाखो खोटे- फेक अकाउंट्स फेसबुकवर आहेत, आणि त्यांनी अगदी कट करून राजकीय दृष्टीने असत्य अशा गोष्टींचा फैलाव केला हे लक्षात आणून देऊन सुद्धा फेसबुकने त्याबाबत काहीही पावले उचलणे नाकारले असे तिने उदाहरणांसहित स्पष्ट दाखवून दिले आहे. हा तिचा इशारा किंवा मेमो ६६०० शब्दांचा आहे. असे करणारे लोक नेमके कोण आहेत हे तिला नेहमीच कळले आहे असे नाही, पण इंटरनेट-फेसबुक-फॅन्सची संख्या फुगवून दाखवण्यासाठी खोटी अकाउंट्स हजारोंच्या संख्येने तयार केली गेली होती हे तिला स्पष्टच दिसत होते.
झँग म्हणते गेली तीन वर्षे मी फेसबुकमध्ये काम करताना हे पाहात आले आहे, की इतर परदेशी शासनांकडून फेसबुकचा वापर स्वतःच्या नागरिकांचीच दिशाभूल करण्यासाठी सर्रास केला जातो आहे. याबद्दलच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.
फेसबुकवर तिचे नेमलेले काम होते फेसबुकचा गैरवापर करणारे बॉट्स शोधणे, खोटा प्रचार करणाऱ्या झुंडी शोधणे. हे करत असताना तिने स्वतःहून अनेकदा कारवाई केली आणि असले प्रयत्न थांबवलेही. पण फेसबुकच्या व्यवस्थापनाने मात्र याबाबत आपली जबाबदारी टाळली. जे कर्मचारी स्वतःच्या सत्यनिष्ठेतून असले प्रकार रोखू पाहात होते त्यांना फेसबुकने पाठबळ तर दिलेच नाही, उलट त्रास द्यायला सुरुवात केली. तिने आपल्या मेमोत अशा ज्या उदाहरणांचा उल्लेख केला आहे त्यात भारतातल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दिल्ली निवडणुकांवर प्रभाव टाकू पाहाणाऱ्या फेसबुक फेकआयडींच्या गटाचाही उल्लेख आहे. त्या तो हजारोंचा गट काढून टाकला. पण फेसबुकने त्याची वाच्यता होऊ दिली नाही.
यावर फेसबुकचे अधिकृत म्हणणे असे आहे की “राजकीय गैरवापरासोबतच आम्हाला स्पॅमशीही झगडा करावा लागतो. मिस झँगने मांडलेल्या हेतुपुरस्सर   प्रश्नांसोबत आम्हाला ही शहानिशाही करावी लागते. त्यामुळे आम्ही संपूर्ण माहिती आल्याशिवाय वाच्यता करत नाही.”
झँगने आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की २०२०च्या अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीत समस्या निर्माण होऊ नयेत हे फेसबुकचे प्रयत्न आहेत. त्यात अडथळा येऊ नये म्हणून मी सारेच काही जाहीर करत नाही.
कंपनीबद्दल काहीही नकारात्मक न बोलण्याच्या अटीवर मिळणारी ६४ हजार डॉलर्सची ग्रॅच्युइटी मिळण्याची योजना झँगने नाकारली होती. ६४ हजार डॉलर्स म्हणजे ४७ लाखापेक्षा थोडे अधिक रुपये. (४७ लाख सोडा, ४७हजार रुपयासाठी सुद्धा अनेक लोक सत्याशी तडजोडी करतात). यामुळे तिला फेसबुकच्या कार्यालयातच निर्भीडपणे टीका करण्याचा हक्क प्राप्त झाला. आणि अमेरिका वा योरोपेतर देशांतील फेसबुकी राजकीय कारस्थानांना पायबंद घालण्यासाठी तिने या हक्काचा वापर केला.
फेसबुकवरील फेक अकाउंट्सची नेटवर्क्स शोधून काढण्यात झँगने प्रावीण्य मिळवले होते. पण फेसबुकला सत्यापेक्षा वाढत्या पसाऱ्यातून मिळणाऱ्या वाढत्या उत्पन्नाची हांव अधिक आहे असे आत्ता तरी दिसते आहे.
आपण पाहिले आहे, असल्या खोट्या आयडींच्या नेटवर्क्समधून विरोधकांच्या पोस्ट्स रिपोर्ट करून त्या खाली काढायला फेसबुकला सांगितले जाते. आणि अगदी विषारी वक्तव्ये मात्र रिपोर्ट करूनही- छे छे, आम्हाला यात आमच्या कम्युनिटी स्टॅन्डर्डच्या विरुद्ध जाणारे काहीही सापडले नाही अशी उत्तरे येतात. अत्यंत द्वेषी फेसबुक पेजेस फेसबुक सुखेनैव सुरू ठेवते. भारतीय संदर्भात या कामात आता फेसबुक कर्मचाऱ्यांतही भगवे चोर शिरले आहेत ही बातमी आहेच. फेसबुकची कर्मचारी अंखी दास ही भाजपच्या रश्मी दासची जुळी बहीण असल्यामुळे भारतातील फेसबुक भाजपाबाबत सैल आहे याची चर्चा आहेच.
एकेका नेटवर्कमध्ये सहासात लाख खोटी अकाउंट्स असतात, १० कोटी फेक कमेन्ट्स आणि फेक फॅन्स असतात. यांचा वापर करून जगभरात निवडणुकांवर, सार्वजनिक चर्चांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न चालतो ही एक जगड्व्याळ समस्या आहे.
फेसबुक जबाबदारी काम करते आहे ते केवळ अमेरिका आणि युरोपमध्ये. बाकी जगात वाट्टेल ते लोक, झुंडीने हैदोस घालत आहेत असे झँग म्हणते.
तिने आपल्या कामाच्या ठरल्या वेळेपेक्षा जास्त काम करून भारतासहित काही देशातील असली नेटवर्क्स शोधून काढली आणि रिपोर्ट केली. तेव्हा तिला सांगण्यात आलं की अखेर जनसंपर्क महत्त्वाचा आहे... तिने हे काम असं एकटीच्या जबाबदारीवर करू नये असंही तिला सुचवण्यात आलं. या गोष्टी मोठ्या वृत्तपत्रांत आल्या तर बघू म्हणाले...
तिचा अंतर्गत संघर्ष तिने तरीही सुरूच ठेवल्यानंतर या महिन्यात तिला कामावरून काढण्यात आले तेव्हा तिने आपला ६६०० शब्दांचा मेमो लिहिला. तिने आपल्या सहकाऱ्यांना फेसबुकमध्ये राहून फेसबुक सुधारण्याचा प्रयत्न करत रहायला सांगितलं आहे. ती म्हणते, फेसबुक हा फार प्रचंड मोठा प्रकल्प आहे, तो नीट चालावा यासाठी प्रयत्न करणं हे एकट्यादुकट्याचं काम नाही. तत्त्वनिष्ठा ठेवून अनेकांनी मिळून हा संघर्ष सुरू ठेवणे आवश्यक आहे.
खरोखर, जगभरात पोहोचलेले हे माध्यम बंद तर होणार नाहीच. पण ते ताळ्यावर रहावे म्हणून काम केले पाहिजेच. झँगने आपल्याला मिळणाऱ्या भरघोस पगाराचीच पर्वा करून गप्प बसायचे ठरवले असते, आणखी काही लोकांनी गेल्या महिन्यात जसा आवाज उठवला तसा उठवला नसता तर सारे छपून राहिले असते.
काही निर्भय लोकांमुळे सत्य नेहमीच उसळून वर येते आणि मग पसरत रहाते, कधी ना कधी असत्याला पराभूत करते.
झँग या तरुणीला सलाम.
फेसबुक सुधारेल अशी आशा.
 
मुग्धा कर्णिक

No comments:

Post a Comment