-महान इजिप्शियन संस्कृती-
सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते। ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.
ह्या महान इजिप्शियन संस्कृतीचे तीन मुख्य काळ होते,’सुरुवातीचा काळ’, 'मध्य काळ' आणि 'अस्तकाळ'। सुरुवातीच्या काळात इजिप्शियन संस्कृती प्रगतीसाठी प्रयत्नशील होती। त्यानंतरचा मध्यकाळ हा इजिप्शियन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ मानला जातो. याच मध्यकाळात इजिप्शियनांनी प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते. त्यांच्या हातून अनेक अविस्मरणीय कलाकृतींची निर्मिती झाली. इजिप्शियन संस्कृतीने प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते तो काळ सुमारे ४०० वर्षांचा मानला जातो. अशी ही महान इजिप्शियन संस्कृती सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी उदयास आली.
इजिप्तचे 'अपर इजिप्त' म्हणजे 'दक्षिण इजिप्त' आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' असे दोन भाग पडतात। इजिप्शियन संस्कृती मुख्यत: ह्या 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' मध्ये भरभराटीस आली. पुढील नकाशा ही गोष्ट स्पष्ट करेन.
इजिप्तच्या सुवर्णमध्याच्या काळात तुतनखामुन (तुत-आँख-अमुन)(Tutankhamun) ' हा राजा इजिप्तच्या राजगादीवर आला. हा 'तुतनखामुन' राजा इजिप्तमध्ये अतिशय लोकप्रिय होता.'तुतनखामुन' हा 'फॅरोह' (pharaoh) वंशाचा राजा होता.ह्या 'तुतनखामुन'च्या कबरीचा पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. ते म्हणतात की, जगात जेवढे म्हणून पिरॅमिडस् असतील त्यात 'तुतनखामुन' चा पिरॅमिड सर्वोत्कृष्ट ठरेल.
या 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडचा शोध १९२२ मध्ये 'सर हॉवर्ड कार्टर' या इतिहास संशोधकाने लावला. 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडमध्ये प्रवेश केल्यावर त्याच्या कबरीमध्ये त्याची 'ममी' पहायला मिळते.'तुतनखामुन' च्या ममीच्या चेहर्यावर जो मुखवटा आहे, तो पूर्णपणे शुद्ध सोन्याचा आहे. या मुखवट्यावरील कलाकुसर बघण्यासारखी आहे. या मुखवट्यावर नाग आणि गरुड ही दक्षिण इजिप्शियनांची चिन्हे आढळतात.
तुतनखामुनच्या नावात येणारी (तुत-आँख-अमुन) अमुन ही इजिप्शियन देवता होती.
ही महान इजिप्शियन संस्कृती इजिप्तमधील पिरॅमिडस् साठी प्रसिद्ध आहे. कारण हे पिरॅमिडस् म्हणजे जगातील एक आश्चर्यच आहे. ह्या पिरॅमिडसची बांधणी विशिष्ट प्रकारची आहे. पिरॅमिडला चार बाजू असतात. सर्व बाजू ज्या टोकापाशी मिळतात, त्या ठिकाणी ९० अंशांचा कोन होतो. आज आपण असा पिरॅमिड बांधायला गेलो तर आपण असा पिरॅमिड बांधू शकत नाही. कारण पिरॅमिड बांधायचे इजिप्शियनांचे एक विशिष्ट तंत्र होते. ते तंत्र आपल्याला अजून तरी अवगत नाही. पिरॅमिडस् बांधण्यासाठी इजिप्शियनांनी मोठ-मोठे अवजड दगड वापरले आहेत. इतके अवजड दगड इजिप्शियनांनी वाहून कसे नेले हे एक न सुटलेले कोडे आहे. हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.
एकदा दक्षिण इजिप्तच्या राजाने स्वत:च्या कबरीसाठी खास इमारत बांधायचे ठरवले। त्याप्रमाणे त्याने त्याच्या वजिराला ते काम सांगितले। त्या राजाचा "इमहॉटेप" नावाचा हुशार वजिर होता। त्याने आधी पिरॅमिडची आखणी केली। मग पक्के दगड वापरुन जगातील पहिला पिरॅमिड बांधला. हा पहिला पिरॅमिड उभारायला बराच वेळ लागला. हा पिरॅमिड बांधण्यासाठी 'इमहॉटेप' वजिराने खूप मजूर कामास लावले होते। ह्या पिरॅमिडनंतर असे अनेक पिरॅमिडस् बांधले गेले. हे पिरॅमिडस् बांधणे खूप अवघड होते. पण कारागिरांना एकदा हे तंत्र कळाल्यावर हे पिरॅमिडस् वेगात बांधले गेले. पण हे पिरॅमिडस् बांधणे अतिशय खर्चाचे काम असल्यामुळे ते केवळ राजे व श्रीमंत लोक यांनाच शक्य होते.
इजिप्शियन लोकांच्या अद्भुत पिरॅमिडस् प्रमाणेच इजिप्शियनांच्या 'ममीज्' देखील प्रसिद्ध आहेत। राजे किंवा श्रीमंत लोक स्वत:च्या मृत्यूनंतर स्वत:च्या पिरॅमिडमध्ये स्वत:ची 'ममी' तयार करुन ठेवायचे. शेकडो वर्षे उलटली तरी या 'ममीज्'जशाच्या तशाच आहेत.'ममी' म्हणजे शरीरावर काही विशिष्ट प्रक्रिया करुन ते शरीर सुकवणे. अशा अनेक 'ममीज्' इजिप्तमधल्या अनेक पिरॅमिडमध्ये सापडल्या आहेत. सध्या पिरॅमिडस् ची बरीच पडझड झाली आहे. तरीही आज अनेक पिरॅमिडस् सुस्थितीत आहेत.पाच हजार वर्षांपूर्वीच्या 'ममीज्' जशाच्या तशा आढळतात हे ही एक आश्चर्यच आहे.ह्या 'ममीज्' कशा तयार करायच्या ह्याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. पण हे इजिप्शियन 'ममीज्' सहज बनवायचे.अर्थातच स्वत:ची ममी तयार करणे हेही खर्चाचेच काम होते, त्यामुळे हे ही फक्त राजे आणि श्रीमंत लोक यांनाच परवडत असे.
ह्या इजिप्शियनांची एक श्रद्धा होती की, राजा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होतो। आपल्या प्रिय राजाला पुढे उपयोगी पडाव्यात म्हणून त्या राजाच्या पिरॅमिडमध्ये इजिप्शियन लोकांनी भाकरीचे तुकडे, घोडे वगैरे प्राणी इ. अनेक वस्तूंच्या 'ममीज्' बनवून राजाच्या कबरीजवळ ठेवल्या आहेत. तसेच मातीची भांडीदेखील राजाच्या कबरीजवळ ठेवलेली आढळतात. एकदा तर इजिप्शियनांनी आपला राजा जिवंत झाल्यावर समुद्रपर्यटनासाठी त्याला उपयोगी पडावी म्हणून नावेचे तुकडे त्याच्या पिरॅमिडमध्ये पुरुन ठेवले होते. पुरातत्त्व संशोधकांनी हे तुकडे जोडल्यावर १३० फूट लांबीची भलीमोठी नाव तयार झाली. ह्या नावेची डोलकाठी २९ फूट उंच होती.
इजिप्शियन लोकांची लेखनाची जी लिपी होती, ती लिपी 'हायरोग्लिफ' या नावाने ओळखली जाते। आपली जशी अक्षरलिपी आहे तशी इजिप्शियनांची 'हायरोग्लिफ' ही चित्रलिपी होती. इजिप्शियनांना अक्षरलिपी ज्ञात नव्हती, पण त्यांना ही चित्रलिपी चांगली अवगत होती.इसवी सन ३१०० वर्षी 'हायरोग्लिफ' लिपी अप्पर आणि लोअर इजिप्त मध्ये प्रचलित झाली.
हे इजिप्शियन लिहिण्यासाठी कागदासारखी एक वस्तू वापरायचे। 'पेपिरस' नावाच्या झाडाचा पांढरा रंग असलेला पापुद्रा, विशिष्ट प्रक्रिया करुन तो वाळवून, त्यापासून कागदासारखी एक वस्तू तयार करायचे. आपल्या कागदापेक्षा त्यांचा कागद हा वेगळ्या प्रकारचा होता. इजिप्शियनांनी तयार केलेला कागद वजनाने हलका आणि लवचिक असल्याने त्या कागदाच्या घड्याही पडायच्या.
नाइल नदी ही इजिप्तची देणगीच होय. एका विशिष्ट दिवशी नाइलला प्रचंड असा महापूर यायचा. पण वर्षातून फक्त एकदाच. ह्या नाईलला एवढा महापूर यायचा की, कित्येक गावे, कित्येक जमीन पाण्याखाली जायची. ह्या नाइल नदीमुळेच इजिप्शियनांनी पंचांग वा कॅलेंडर बनवले. 'ग्रहण' एकाच ठिकाणी दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते. (आजचे सौरचक्र २२ वर्षांचे मानले जाते. कदाचित त्या काळचा पृथ्वी आणि सूर्यसापेक्ष वेग आणि आजचा वेग यात तफावत असू शकेल)
एवढेच नव्हे तर कोणता तारा, कोणत्या महिन्यात कुठे दिसेल, हेही इजिप्शियन्स सांगू शकत होते। यावरुनच कळून येते की इजिप्शियनांची खगोलशास्त्रातदेखील चांगली गती होती. खरोखर हे इजिप्शियन्स् म्हणजे जगातील आश्चर्याचा नमुनाच होते.
सर्वात शेवटी येतो तो ह्या इजिप्शियन संस्कृतीचा अस्त काळ। ह्या संस्कृतीचा अस्त साधारणपणे इ.स्.पूर्व ४,०००-इ.स्.पूर्व ३,९०० वर्षांपूर्वी झाला. एवढी प्रगत, थोर संस्कृती नष्ट झाली. पण ही संस्कृती कशी नष्ट झाली हे मात्र कोणालाच माहित नाही. आजचे संशोधक, पुराणशास्त्रज्ञ ह्या विषयावर केवळ तर्क लढवित आहेत, पुरावे गोळा करत आहेत.पण अजून तरी त्यांच्या हाती या संस्कृतीच्या अस्ताविषयी काहीच लागलेले नाही.
अशी होती ही इजिप्शियन संस्कृती ... महान इजिप्शियन संस्कृती ...
- सागर