Wednesday, May 31, 2017

मोदींची ३ वर्षे : केवळ निराशा

मोदी सरकार अनेक मुद्द्यांवर काम करत असले तरी बेसिक मुद्द्यावर ते फेल होताना दिसत आहेत.
आपण करतो ते काम मस्तच असते अशा भ्रमातून मोदी सरकार ने आधी बाहेर यावे:
नाव कशामुळे झाले?
जीएसटी
नोटबंदी
विदेशवार्या
१००% एफडीआय
बांगलादेश वा अन्य सीमा विवाद
सर्जिकल स्ट्राईक


त्याच मुळे बदनाम कसे झाले?


जीएसटी - यापूर्वी ज्या गोष्टी कधीही टॅक्स मध्ये समाविष्ट नव्हत्या त्या गोष्टी जोडून सामान्य करदात्यांवर मोठा बोजा टाकला. हे आवश्यक कसे होते याबद्दल कोणी मोदीभक्ताने वितंडवाद घालणे अपेक्षित अर्थातच नाहिये. मुद्देसूद विदा पुरवावा.
माझ्या मताच्या समर्थना साठी उदाहरणार्थ :
एक प्रामाणिक करदाता म्हणून मी इन्कम टॅक्स भरुन उरलेल्या रकमेचे सेव्हिंग करुन प्रॉपर्टी विकत घेतो व त्याचा प्रॉपर्टी टॅक्स देखील भरतो. आता ते घर मी भाड्याने दिले तर त्यावर मिळणारे भाडे हे माझे उत्पन्नात जोडले जात असल्यामुळे त्यावरही मी इन्कम टॅक्स भरतो.
मोदी सरकार कृपेने मला या उत्पन्न होणार्‍या घरभाड्याच्या रकमेवर इन्कम टॅक्स देखील भरावा लागणार आहे आणि जीएसटी देखील. शिवाय या घराच्या देखभालीसाठी जो मेंटेनन्स खर्च मला दर वर्षी द्यावा लागतो त्यासाठी देखील जीएसटी भरावा लागणार आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत, जसे बेदाण्यांवर जीएसटी मध्ये भरपूर टॅक्स लावलाय, इत्यादी इत्यादी..
नोटबंदी - नोटबंदीचा निर्णय ऐतिहासिक असला तरी त्यातून जनतेला होणारा त्रास देखील ऐतिहासिक असाच होता. एटीएम कॅलिबरेशन गृहितच न धरल्यामुळे सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय झाली. या घटनांमध्ये शेकडोंनी प्राण गमावले. उदाहरणार्थ : एकटे राहणारे वृद्ध तासन तास रांगांमध्ये उभे राहून उश्माघात, हार्ट अ‍ॅटॅक , उच्च रक्तदाब , मानसिक ताण अशा गोष्टींमुळे मेले आहेत. गर्भवती स्त्री कडे नोटबंदीमुळे दवाखान्यात भरण्यासाठी नव्या नोटा नव्हत्या त्यामुळे तिला तिचे बाळ उपचाराअभावी गमवावे लागले.
जनतेच्या अशा त्रासाची भलावण सीमेवर लढणार्या सैनिकांबरोबर केली गेली. सैनिक देशासाठी गोळ्या खातात तर आपण एवढा साधा त्रास सहन करु शकत नाही का असा प्रचार केला गेला. ही तद्दन फालतूगिरी आहे असे माझे मत आहे. सैनिकांचे काम देशाचे रक्षण करण्याचे आहे. त्यासाठी ते वंद्य आहेत व राहतील. पण जे तरुण नाहीत, आजारी आहेत, गर्भवती आहेत, दुसर्यांवर अवलंबून असलेले आहेत, अशिक्षित आहेत, गरीब आहेत, आदिवासी विभागतले आहेत, खेडेगावांत राहतात, काही प्रमाणात अशिक्षित स्त्रीया आहेत ज्यांना व्यवहारातले फारसे कळत नाही. विदेशात कामासाठी गेले आहेत व कोणत्याही परिस्थितीत ते भारतात एक वर्ष तरी येऊ शकणार नाहियेत. अशा शेकडो प्रकारांचे लोक सरकार ने एकाच तराजूत तोलले आणि अचानक नोटबंदी घोषित केली. मी नोटबंदीचा समर्थक आहे हे येथे स्पष्टपणे नमूद करतोय. एकाही नागरिकाचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ते करणे हे सरकारचे फक्त कामच नव्हे तर प्राथमिक जबाबदारी आहे.
एटीएम व बँकेच्या रांगेत उभे राहणारे वृद्ध, स्त्रिया, गरिब वा आजारी व्यक्तीदेखील तितक्याच गंभीरपणे घेतल्या गेल्या पाहिजेत जितक्या गंंभीरपणे बलात्कारित निर्भयाला काही तासांत विदेशात उपचारांसाठी पाठवण्याची तत्परता दाखवली. व्यक्ती व्यक्तीचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असू शकतात पण त्यांच्यासाठी ते खूप गंभीर असतात.सरकार ने घेतलेला कोणताही निर्णय कोणाही नागरिकाच्या जिवावर उठला नाही पाहिजे. ही खूप बेसिक गोष्ट आहे.
विदेशवार्या
पंतप्रधानाची विदेशवारी प्रामुख्याने विदेशातील नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी व त्याचा आपल्या देशाला व्यापारिक व आर्थिक दृष्ट्या फायदा होण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे मी याही मुद्द्याचा समर्थक आहे. पण नेमके काय झाले?
ज्या ज्या देशांची वारी मोदीजी करुन आले तेथून आपल्या देशांत आर्थिक गुंतवणूक अजिबात झाली नाही. मोदींनी क्वांटीटी वर जास्त भर दिला. क्वालिटी वर भर देऊन नेमके १० देश जरी टारगेट केले असते तरी त्याचा फायदा झाला असता. प्रत्यक्षात विदेशी गुंतवणूक भारतात येण्याऐवजी बाहेर जास्त गेली. परिणामी रोजगार व उत्पादन क्षेत्रात फटका बसतोय. अलिकडचे उदाहरण : शेवर्ले कंपनीने भारतातील कार विक्री पूर्ण बंद केली आहे. हे जरा मोठे उदाहरण ठरावे. पण अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी भारतातील गाशा गुंडाळलाय.
१००% एफडीआय:
या भुमिकेचे ठळकपणे दाखवता येतील असे कोणतेही आकडे सरकार देऊ शकले नाहिये. ज्यामुळे या पॉलिसिचा काही फायदा भारतात विदेशी चलन येण्यासाठी झालाय.
बांगलादेश वा अन्य सीमा विवाद : मोदी सरकारने (पर्यायाने भाजप भक्तांनी) जेवढा ढोल बडवला , त्यामुळे आजही मला नेमकी अधिकृत माहिती मिळालेली नाही.
बर बांगलादेश बरोबर सीमा विवाद सोडवला आणि काही भूभाग त्यांना दिला व तेथील हिंदू बहुल भाग भारतात आणला. हे एक क्षण खरे मानले तरी मोदी सरकार ने पुढील ३ गोष्टी तातडीने करण्याची गरज होती. जी त्यांनी केली नाही आणि त्यामुळेच झालेली घटना खरी की खोटी ? आणि खरी असलीच तर भारताच्या फायदयाची झाली की तोट्याची? असे प्रश्न उपस्थित होणे अतिशय स्वाभाविक आहे. ज्यामुळे याही मुद्द्यातील हवा निघून गेली.
क्रमांक १ : सीमा विवाद सोडवला तर भारताची सीमा बदलणे स्वाभाविक आहे. भारत सरकार ने असे जर काही झाले असेल तर बदललेल्या सीमेसकट भारताचा नवा नकाशा प्रकाशित केला का? केला नाही ही माझी माहिती आहे. केलाच असेल तर कोणीही तो द्यावा.
क्रमांक २ : सीमा बदलल्यामुळे भारताच्या भौगोलिक सीमेतील बदल युनायटेड नेशन्स सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कळवला का? हेही आपण केलेले नाहिये.
क्रमांक ३ : सीमेतील बदलाला बांगला देश आणि भारत दोघांची सहमती आहे असे दोघांचे संयुक्त पत्रक निघायला हवे होते. तेही कधी दिसले नाही.
सर्जिकल स्ट्राईक :
या मुद्द्यावर तर सरकार एकदम तोंडावर आपटले आहे. येथे हे कृपया लक्षात घ्या की सर्जिकल स्ट्राईक च्या दरवाज्याने मला सैन्य दलावर कोणतीही कमेंट करायची नाहिये. तर रोख सरकारी अकार्यक्षमतेवर आहे. तर समजूयात की सर्जिकल स्ट्राईक खरे आहे. गुप्ततेच्या नावाखाली त्यात लपवण्यासारखे काय आहे? अशी कोणती गोष्ट जगासमोर येणार आहे? अमेरिकेने लादेनच्या हल्ल्याचे फुटेज व संपूर्ण वृत्तांत जगजाहीर केलाय. मग अशा गोपनीय कारवाईबद्दल लपवा लपवी कशाला?
पाकीस्तान भारतीय लश्कर जे पॅलेट गन्स वापरतो त्याचे व्हिडिओ फुटेज भारताविरुद्ध युनोत मानवाधिकाराचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी वापरत असताना आपण का आपली चड्डी निघेल या भितीने ही कारवाई लपवतो आहे? सर्जिकल स्ट्राईक चे फुटेज व फोटो सैन्याने सरकार्ला दिले या फक्त मिडियातील बातम्या आहेत. प्रत्यक्षात अशी कारवाई झाली असेल तर त्या फुटेज द्वारे पाकिस्तान आतंकवाद्यांचे प्रशिक्षण कॅम्प त्यांच्या सीमेत आणि तेही लश्करी सैन्याच्या तालमीत करतो आहे हे जगापुढे एक्स्पोज करायची सुवर्ण संधी असताना का हे सर्जिकल स्ट्राईकचे फुटेज लपवले जाते आहे?
फेल कुठे झाले?
- निवडणुकीच्या घोषणांपैकी प्रमुख घोषणा फेल झाल्या त्या अशा.
१. काश्मीर मुद्दा १०० दिवसांत सोडवू - त्रांगडे अजून क्रिटिकल करुन ठेवले
२. १ कोटी लोकांना रोजगार देऊ - नवे वक्तव्य - प्रत्येकाला जॉब देऊ शकत नाही. लोकांनी स्वत:च स्वयंरोजगार करावा (हे अमित शहांचे अधिकृत स्टेटमेंट आहे. )
३. सत्तेपूर्वी पाकिस्तानशी युद्धाची भाषा करत होते. आता जे होते आहे त्याचा बदला देखील घेऊ शकले नाहिये.
४. प्रामाणिकपणे टॅक्स भरणार्या सर्वसामान्य नागरीकांची प्रचंड मोठी निराशा. पंतप्रधानांनी स्वतः भाषणात म्हटले आहे की फक्त २३ लाख लोक १०% पेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात. जे लोक कर भरतच नाहीत त्या ९० % लोकांना करप्रणालीत आणण्याऐवजी टॅक्स्चा मोठा भार याच ५ ते ७ % लोकांवर सध्याच्या सरकार ने टाकला आहे.
२०१४ च्या निवडणुकीत मोदीना मत द्या म्हणून प्रचार करणारा व माझे शेकडो मित्र वरील सर्व गोष्टींमुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला मतदान करणार नाही असे आम्ही ठरवले आहे. हे आजचे चित्र आहे. पुढील दोन वर्षांत मोदींनी काही खरोखर करुन दाखवले तर जरुर विचार करता येईल.
अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील मूलभूत फरक मोदीजी विसरले आहेत.
भारताला प्रगती हवी आहे पण "अन्न -वस्त्र - निवारा "या मूलभूत गरजांतून भारत अजूनही बाहेर आलेला नाहिये हे कृपया मोदी सरकार ने लक्षात घ्यावे.

म्हणूनच २ रुपयांत पोट भरु शकणार्‍या अम्मा कँटीन ची देणगी देणारी जयललिता तमिळनाडूत देवीसारखी पूजनीय होते आणि नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, जीएसटी अशा गोष्टी करुनही मोदीजी लोकांचा विश्वास जिंकू शकत नाहियेत.
मी कठीण निर्णयांचा समर्थक निश्चितच आहे. पण भारतातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य ठरते. कठीण निर्णयासाठी कोणी आपल्याच घरातल्या लोकांचे बळी देत नाही. भारत हा कुटुंब प्रधान देश आहे. भावना जपणार्‍या लोकांचा देश आहे. वसुधैव कुटुंबकम असे जगाला सांगणार्या भारताच्या पंतप्रधान श्री मोदीजी यांनी भारतात राहणार्‍या कुटुंबाकडेही योग्य लक्ष द्यावे ही अपेक्षा ...
-  सागर

Wednesday, May 3, 2017

महाराष्ट्र देशात सर्वात जास्त 34% शेतकर्यांच्या आत्महत्या होणारे राज्य

शेतकर्यांच्या आत्महत्येचे सुप्रीम कोर्टात केंद्र सरकार ने दिलेले आकडे:
महाराष्ट्राची अवस्था खूपच वाईट आहे शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्याबाबत. शेतकर्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे. देशातील आत्महत्या करणारे 34 % शेतकरी महाराष्ट्र राज्यात येतात याची सगळ्याच राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे. काहीतरी करा.... 👐👐👐👐
#DevendraFadnavis #BJP #GovernmentofMaharashtra #PMofIndia #PMOINDIA #NARENDRAMODI
#GOVERNMENTOFINDIA

क्रमांक एक : महाराष्ट्र - 4291 शेतकर्यांच्या आत्महत्या
क्रमांक दोन : कर्नाटक - 1569 शेतकर्यांच्या आत्महत्या
क्रमांक तीन : तेलंगण - 1400
क्रमांक चार : मध्य प्रदेश - 1290
क्रमांक पाच : छत्तीसगड - 954
क्रमांक सहा : आंध्र प्रदेश - 916
क्रमांक सात : तामिळनाडू - 606

देशाची परिस्थिती बघा. एकाही शेतकर्याने आत्महत्या करणे हे कोणत्याही सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे.

2015 : 12,602 शेतकर्यांच्या आत्महत्या
2014 : 12,360 शेतकर्यांच्या आत्महत्या
2013 : 11,772 शेतकर्यांच्या आत्महत्या


Monday, May 1, 2017

संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाचे एक अपयश ...

आज 1 मे... महाराष्ट्र दिवस.... भारत स्वतंत्र झाला तो 1947 साली. पण अगोदरपासूनच अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राला कायदेशीर रूप मिळण्यासाठी 1960 साल उजाडावे लागले व त्यासाठी 106 महाराष्ट्रीय लोकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करणार्या केंद्र सरकारने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी समोर शरणागती पत्करताना मुंबई जी भौगोलिक दृष्टीने महाराष्ट्रातच होती तिला महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यास परवानगी दिली. पण केंद्र सरकारने महाराष्ट्र निर्माण करताना एक ग्यानबाची मेख मारून दिली. बेळगाव कारवार निपाणी या मराठी बहुभाषिक असलेले  महाराष्ट्रातील प्रदेश सीमा तोडून  कर्नाटकात जोडून दिले.

महाराष्ट्र व कर्नाटक या गुण्यागोविंदाने नांदणार्या दोन राज्यांत जम्मू काश्मीर सारखा भेदभावपूर्ण कायमस्वरूपी कलगीतुरा केंद्र सरकार ने लावून दिला.  भाषिक आधारावर राज्याची निर्मिती या मूलभूत नियमाचा पूर्णपणे चुराडा केंद्राने महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना केला. याची राजकीय कारणे काहीही असोत पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मुंबई मिळाली या आनंदात सीमा भागातील बहुसंख्य मराठी बांधवांचा पूर्ण विसर पडला. त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ समितीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असती तर आज महाराष्ट्रात सर्वार्थाने मराठी लोक अधिक असते. बेळगाव महापालिकेत मराठी लोक बहुसंख्येने निवडून येतात तरीही ते नीट काम करू शकत नाहीत.  कारण कर्नाटक सरकार त्यांचे प्रशासन बरखास्त करत असते. दरवर्षी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती 1 मे ला महाराष्ट्र दिन साजरा करते. पण आपण महाराष्ट्रातील लोक त्यांच्या वेदनांशी फारकत घेऊन आपापल्या उद्योगात मग्न असतो. महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाने वा विरोधी पक्षांतील कोणत्याही नेत्यांनी महाराष्ट्र खर्या अर्थाने संयुक्त होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नाही केले. बेळगाव प्रांत हा मराठी भाषिक असूनही हा भूभाग  महाराष्ट्रात नसणे हे संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाचे एक अपयश आहे. तसेच बेळगाव कर्नाटकात असणे ही अमर असणार्या अश्वत्थाम्याच्या कायम स्वरूपी भळभळत्या जखमेसारखी दुःखद आठवण आहे. महाराष्ट्र दिवस आज साजरा कराच पण सीमा भागातील आपले असूनही नसलेल्या या मराठी बांधवांसाठी दोन थेंब अश्रू आठवणीने डोळ्यांत असू द्यात.

Friday, April 7, 2017

गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते? आणि पुराणातील कालगणना

मिसळपाव.कॉम वर पूर्वप्रकाशित 

23 Mar 2012

गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नंदननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.
गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
यानिमित्ताने वाचकांना प्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते हे सांगायचा हा अल्पसा प्रयत्न
शके १९३४ या वर्षाचे नाव आहे नंदन. तर दरवर्षी शक संवत्सराचे नेमके नाव कसे ठरवले जाते? हे पाहण्यापूर्वी हिंदू पंचांगपद्धतीत कालगणना नेमकी कशी मोजली जाते ते उलट्या क्रमाने पाहूयात, म्हणजे हा ६० नावांचा गुंता सुटायला सोपा पडेल.
१ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.
१ शिवनिमिष म्हणजे विष्णूच्या १००० घटिका
१ विष्णूची घटका म्हणजे १००० ब्रह्माची आयुष्ये
१ ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य म्हणजे ३६००० कल्पे
१ कल्प अर्थात ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे १४ मनु
१ मनु म्हणजे ७१ महायुगे
१ महायुग म्हणजे ४ युगे
१ कृत युग म्हणजे ४८०० दिव्य वर्षे
१ त्रेता युग म्हणजे ३६०० दिव्य वर्षे
१ द्वापर युग म्हणजे २४०० दिव्यवर्षे
१ कलि युग म्हणजे १२०० दिव्य वर्षे
१ दिव्य वर्ष म्हणजे ३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे
१ संवत्सर चक्र म्हणजे ६० वर्षे (संवत्सरे)
(ही माहिती पुराणांतून दिलेली आहे)
हे गणित लक्षात आले म्हणजे एका संवत्सर चक्रात येणार्‍या ६० वर्षांच्या ६० नावे का ठरवली गेलीत याचे उत्तर मिळते. नेमकी हीच ६० नावे का? याचे उत्तर मात्र माझ्याजवळ सध्या नाहिये. त्यावर कधीतरी सवडीने अभ्यास करुन लिहिन.
शके १९३४ चे संवत्सरनाम नंदन आहे. जे मी पुढील यादीत ठळक केले आहेच. एकदा ही ६० नावे माहिती झाली की पुढील वर्षाचे म्हणजे शके १९३५ साठी कोणते संवत्सरनाम असेल हे तुम्ही स्वतःच ओळखू शकाल :)
६० वर्षांचे चक्र.
१. प्रभव
२. विभव
३. शुवल
४. प्रमोद
५. प्रजापति
६. अंगिरा
७. श्रीमुख
८. भाव
९. युवा
१०. धाता
११. ईश्वर
१२. बहुधान्य
१३. प्रमाथी
१४. विक्रम
१५. विश्व
१६. चित्रभानु
१७. सुभानु
१८. तारण
१९. पार्थिव
२०. व्यय
२१. सर्वजित्
२२. सर्वधारी
२३. विरोधी
२४. विकृत
२५. खर
२६. नन्दन
२७. विजय
२८. जय
२९. मन्मथ
३०. दुर्मुख
३१. हेमलम्ब
३२. विलम्ब
३३. विकारी
३४. शर्वरी
३५. प्लव
३६. शुभकृत्
३७. शोभन
३८. क्रोधी
३९. विश्वावसु
४०. पराभव
४१. प्लवंग
४२. कीलक
४३. सौम्य
४४. साधारण
४५. विरोधकृत्
४६. परिधावी
४७. प्रमादी
४८. आनन्द
४९. राक्षस
५०. नल
५१. पिंगल
५२. कालयुक्त
५३. सिद्धार्थ
५४. रौद्र
५५. दुर्मति
५६. दुन्दुभि
५७. रुधिरोद्गारी
५८. रक्ताक्ष
५९. क्रोधन
६०. क्षय
लेखात काही चूक असेल तर ती अवश्य लक्षात आणून द्यावी ही वाचकांना नम्र विनंती
धन्यवाद,
- सागर

 याच माहितीच्या धाग्यावरुन चर्चा करताना खेडुत या सदस्याकडून पुढील माहिती  मिळाली

पुराणांतील काळगणना
------------------
पृथ्वीवरचा काल :
परम अणु : ज्याचे विभाजन होऊ शकत नाही .
२ परम अणु - १ अणु
३ अणु - १ त्रसरेणु (हा आपण पाहू शकतो)
३ त्रसरेणुंना सूर्यप्रकाश पार करतो तो काल - त्रुटि
३०० त्रुटि - १ बोध
३ बोध - १ लव
३ लव - १ निमेष
३ निमेष - १ क्षण
५ क्षण - १ काष्ठा
१५ काष्ठा - १ लघु
१५ लघु - १ घटी
२ घटी - १ मुहूर्त
५ ते ७ घटी - १ प्रहर
४ प्रहर - १ दिन
४ प्रहर - १ रात्र
८ प्रहर - १ अहोरात्र (अह: - दिन)
७ अहोरात्र - १ सप्ताह
१५ अहोरात्र - १ पक्ष (१ कृष्ण, १ शुक्ल)
२ पक्ष - १ मास (मास - महिना)
२ मास - १ ऋतु
३ ऋतु - १ अयन (१ उत्तरायण, १ दक्षिणायन)
-----------------------------
पितरलोकांचा काल:
पृथ्वीवरचा शुक्ल पक्ष - पितरांची रात्र
पृथ्वीवरचा कृष्ण पक्ष - पितरांचा दिवस
पृथ्वीवरचा महिना - पितरांची अहोरात्र
पृथ्वीवरचे ३० महिने म्हणजे पितरांचा एक महिना
पृथ्वीवरची ३६० वर्षे - पितरांचे एक वर्ष
--------------------------
स्वर्गातला काल:
१ उत्तरायण - देवांचा १ दिन
१ दक्षिणायन - देवांची १ रात्र
२ अयन - १ वर्ष (देवांची १ अहोरात्र)
देवांच्या ३६० अहोरात्री (माणसांची ३६० वर्षे) - १ देववर्ष (दिव्यवर्ष)
----------------------
त्रैलोक्याबाहेरचा काल:
माणसाची ३०३० वर्षे - १ सप्तर्षिसंवत्सर
माणसाची ९०९० वर्षे - १ क्रौंच संवत्सर
------------------------------------------------
४००० दिव्यवर्ष (माणसांची ३६० X ४००० वर्षे) - १ सत्ययुग (कृतयुग)
संधि - ८०० दिव्यवर्ष (एक युग संपल्यानंतर दुसरे युग येण्यापूर्वीचा काल)
(माणसांची ३६० X ८०० वर्षे)
३००० दिव्यवर्ष ( माणसांची ३६० X ३००० वर्षे ) - १ त्रेतायुग
संधि - ६०० दिव्यवर्ष
(माणसांची ३६० X ६०० वर्षे)
२००० दिव्यवर्ष (माणसांची ३६० X २००० वर्षे) - १ द्वापरयुग
संधि - ४०० दिव्यवर्ष
(माणसांची ३६० X ४०० वर्षे)
१००० दिव्यवर्ष ( माणसांची ३६० X १००० वर्षे) - १ कलियुग
संधि - २०० दिव्यवर्ष
(माणसांची ३६० X २०० वर्षे)
४ युग - १ चौकडी (१२००० दिव्यवर्ष - ३६० X १२००० = ४३,२०,००० मानवी वर्ष)
-----------------------------------
मनु-कल्प:
७१ चौकड्या - १ मन्वंतर (मन्वंतरात इंद्र, मनु व सप्तर्षी बदलतात व नवे निर्माण होतात.)
७१ X ३६० X १२००० = ३०६७२०,००० मानवी वर्षे
१४ मन्वंतरे - ब्रह्मदेवाचा १ दिवस (सृष्टीनिर्मिती) - १ कल्प
(१४ X ३०,६७,२०,००० = ४,२९,४०,८०,००० मानवी वर्षे)
१४ मन्वन्तरे - ब्रह्मदेवाची रात्र(सृष्टीसंहार)
२८ मन्वन्तरे - ब्रह्मदेवाची अहोरात्र
************************************************
ब्रह्मदेवाचा काल:
ब्रह्मदेवाच्या ३६० दिनरात्री - १ ब्रह्मवर्ष
ब्रह्मदेवाचे आयुष्य - १०० ब्रह्मवर्ष
१०० ब्रह्मवर्षे - १४ भुवन ब्रह्मांडांचा (सप्तपाताळ, सप्तस्वर्गासहित भूलोक) नाश होतो - महाप्रलय, यावेळी ब्रह्मदेव ब्रह्मलोकातील इतर मुक्त जीवांबरोबर भगवंतामध्ये विलीन होतात.
अशी अनंत ब्रह्मांडे या विश्वात आहेत. त्यांचे स्वामी अनंत ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत.
महाविष्णूच्या नाभीकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते.
************************************************
विष्णुचा काल:
महाविष्णूच्या एका श्वास घेण्याने ब्रह्मांडे निर्माण होतात.
महाविष्णूच्या एका श्वास सोडण्याने ब्रह्मांडे नाश पावतात.
१०० ब्रह्मवर्ष - विष्णूचा १ दिन
१०० ब्रह्मवर्ष - विष्णूची १ रात्र
२०० ब्रह्मवर्ष - विष्णूची १ अहोरात्र
विष्णूच्या ३६० अहोरात्री - विष्णूचे १ वर्ष
विष्णूचे आयुर्मान - २०० विष्णूवर्षे
************************************************
शिवाचा काल:
३०० विष्णूवर्षे - शिवाचा १ दिन
३०० विष्णूवर्षे - शिवाची १ रात्र
६०० विष्णूवर्षे - शिवाची १ अहोरात्र
शिवाच्या ३६० अहोरात्री - १ शिववर्ष
शिवाचे आयुर्मान - ३०० शिववर्षे
म्हणून शिवाला पुराणपुरुष म्हणतात.
त्याला साक्षात ब्रह्मा व विष्णुही जाणू शकत नाहीत.
************************************************