Monday, May 1, 2017

संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाचे एक अपयश ...

आज 1 मे... महाराष्ट्र दिवस.... भारत स्वतंत्र झाला तो 1947 साली. पण अगोदरपासूनच अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राला कायदेशीर रूप मिळण्यासाठी 1960 साल उजाडावे लागले व त्यासाठी 106 महाराष्ट्रीय लोकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करणार्या केंद्र सरकारने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी समोर शरणागती पत्करताना मुंबई जी भौगोलिक दृष्टीने महाराष्ट्रातच होती तिला महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यास परवानगी दिली. पण केंद्र सरकारने महाराष्ट्र निर्माण करताना एक ग्यानबाची मेख मारून दिली. बेळगाव कारवार निपाणी या मराठी बहुभाषिक असलेले  महाराष्ट्रातील प्रदेश सीमा तोडून  कर्नाटकात जोडून दिले.

महाराष्ट्र व कर्नाटक या गुण्यागोविंदाने नांदणार्या दोन राज्यांत जम्मू काश्मीर सारखा भेदभावपूर्ण कायमस्वरूपी कलगीतुरा केंद्र सरकार ने लावून दिला.  भाषिक आधारावर राज्याची निर्मिती या मूलभूत नियमाचा पूर्णपणे चुराडा केंद्राने महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना केला. याची राजकीय कारणे काहीही असोत पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मुंबई मिळाली या आनंदात सीमा भागातील बहुसंख्य मराठी बांधवांचा पूर्ण विसर पडला. त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ समितीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असती तर आज महाराष्ट्रात सर्वार्थाने मराठी लोक अधिक असते. बेळगाव महापालिकेत मराठी लोक बहुसंख्येने निवडून येतात तरीही ते नीट काम करू शकत नाहीत.  कारण कर्नाटक सरकार त्यांचे प्रशासन बरखास्त करत असते. दरवर्षी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती 1 मे ला महाराष्ट्र दिन साजरा करते. पण आपण महाराष्ट्रातील लोक त्यांच्या वेदनांशी फारकत घेऊन आपापल्या उद्योगात मग्न असतो. महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाने वा विरोधी पक्षांतील कोणत्याही नेत्यांनी महाराष्ट्र खर्या अर्थाने संयुक्त होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नाही केले. बेळगाव प्रांत हा मराठी भाषिक असूनही हा भूभाग  महाराष्ट्रात नसणे हे संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाचे एक अपयश आहे. तसेच बेळगाव कर्नाटकात असणे ही अमर असणार्या अश्वत्थाम्याच्या कायम स्वरूपी भळभळत्या जखमेसारखी दुःखद आठवण आहे. महाराष्ट्र दिवस आज साजरा कराच पण सीमा भागातील आपले असूनही नसलेल्या या मराठी बांधवांसाठी दोन थेंब अश्रू आठवणीने डोळ्यांत असू द्यात.

No comments:

Post a Comment