Tuesday, September 6, 2011

दिनविशेष : २९,३० व ३१ ऑगस्ट

महिना संपतोय त्यामुळे फक्त ३ दिवसांचे दिनविशेष देत आहे. पुढे गुरुवारी सप्टेंबरच्या आठवड्याचे दिनविशेष देईन.
२९ ऑगस्टः
१. मराठीतील पहिली कादंबरी 'यमुना पर्यटन' लिहिणारे बाबा पद्मनजी यांचे निधन (१९०६)
२. शाहिर अमर शेख यांचे निधन. (१९६९)
३. 'बनगरवाडी' या कादंबरीमुळे लोकप्रिय झालेले लेखक व्यंकटेश माडगुळकर यांचे निधन. (२००१)
इतर पण महत्त्वाचे:
१. सन १८८२ मध्ये इंग्लंड हरल्यानंतर त्या कसोटीत वापरलेल्या बेलची (यष्टिविट्टया ) राख करुन ऑस्ट्रेलियास भेट देण्यात आली. त्यामुळे १८८३ मधले कसोटी सामने 'अ‍ॅशेस' म्हणून संबोधण्यात आले आणि अ‍ॅशेस मालिका सुरु झाली
२. सन १९०५ मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म...
३० ऑगस्टः
१. 'काका , मला वाचवा,' अशी रघुनाथरावांच्या नावाने धावा करणार्‍या नारायण पेशव्याची गारद्यांकडून हत्या. (१७७३)
२. महाराष्ट्रातील अग्रगण्य कायदेपंडित, नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भवानी शंकर नियोगी यांचा जन्म. (१८८६)
३. 'गोटया', 'दाजी' अशा मराठीतील अजरामर व्यक्तीरेखा जन्माला घालणारे लेखक ना. धो. ताम्हणकर यांचा जन्म. (१८९३)
४. महामहोपाध्याय व प्रख्यात वक्ते बाळशास्त्री हरदास यांचा जन्म. (१९१८)
५. ख्यातनाम संगीतकार व भावगीत गायक दशरथ पुजारी यांचा जन्म. दशरथ पुजारी यांनी भावगीत, भक्तिगीते , अभंग , लावण्या, नाटय गीते, समर गीते अशा विविध गान प्रकारांवर स्वत:ची मुद्रा उमटवलेली आहे. पुजारी यांनी स्वरबध्द केलेल्या गीतांची संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त भरते (१९३०)
६. 'चाफा बोलेना' या अजरामर कवितेचे कवी नारायण मुरलीधर गुप्ते - 'बी' (टोपणनाव) यांचे निधन. - (१९४७)
३१ ऑगस्टः
इतर पण महत्त्वाचे:
१. १९६८ - सर गारफील्ड सोबर्स यांनी एका षटकात ६ षटकार फटकावले.
२. ब्रिटीश राजघराण्यातील सौंदर्यवती 'प्रिन्सेस डायना' चे अपघाती निधन..


Ashok Patil Replies:
सागर ~ ज्या घटना एरव्ही दुर्लक्षिल्या गेल्या असत्या त्या तुमच्या या अनोख्या धाग्यामुळे प्रकर्षाने समोर येत आहेत हे पुन्हा एकदा सांगणे भाग आहे आणि तुम्ही आपले नित्याचे काम सांभाळून ही माहिती गोळा करता हे आणखीन् एक वैशिष्ट्य.
आता काहीसे या तीन दिवसातील तपशीलाबद्दल :
१. मराठीतील पहिली कादंबरी 'यमुना पर्यटन' लिहिणारे बाबा पद्मनजी यांचे निधन (१९०६) : खरे नाव बाबा पदमनजी [पुस्तकावरही असेच नाव आहे]
३. 'बनगरवाडी' या कादंबरीमुळे लोकप्रिय झालेले लेखक..... : असा उल्लेख करणे म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांच्या 'माणदेशी माणसं' वर अन्याय होईल. 'बनगरवाडी' चे प्रथम प्रकाशन 'मौज' च्या १९५४ च्या दिवाळी अंकात तर पुस्तक रूपात ते डिसेंबर १९५५ मध्ये आले. पण त्या अगोदर १९४८ मध्ये 'माणदेशी माणसं' सार्‍या महाराष्ट्रात गाजली.
'माणदेशी माणसं' बद्दल खुद्द व्यंकटेश माडगूळकर यानी लिहिले आहे : "माणदेशी माणसं" हे पुस्तक वयाची चाळिशी गाठेअल, त्याची गणना मराठीतील साहित्य-लेण्यांत होईल, असं मात्र मला वाटलं नव्हतं. काही पुस्तकं लेखकाला चकवून मोठी होतात, हेच खरं."
यावरून स्पष्ट होईलचे की व्यंकटेश माडगूळकर हे नाव सर्वत्र लोकप्रिय झाले ते 'माणदेशी माणसं' मुळेच.
असो.
३. सन १९०५ मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म... : सरकारतर्फे हा दिवस "क्रीडा दिन" म्हणून संपन्न होतो.
४. १९६८ - सर गारफील्ड सोबर्स यांनी एका षटकात ६ षटकार फटकावले. : यातील एक गंमत म्हणजे ग्लॅमॉर्गनच्या ज्या गोलंदाजाने ते सहा चेंडू टाकले त्याचे नाव 'माल्कम नॅश'. हा त्यानंतर कुठेच चमकला नाही, पण तो नेहमीच 'सर गारफिल्ड सोबर्स' यांच्याबाबत कृतज्ञ राहिला. कारण ? त्याच्या मते 'सोबर्समुळेच माझे नाव 'जागतिक रेकॉर्डे' मध्ये नोंदविले गेले'.
५. "डायना' बद्दल काय लिहावे ? तुम्ही केवळ "डायना" चा मृत्यु असे जरी लिहिले असते तरी ती सौंदर्यवती नजरेसमोर आलीच असती.

अरे सागरबाबा, धन्यवाद कशाबद्दल ? किंबहुना तू आमच्या डोक्याला या धाग्यानिमित्ताने काही खाद्य पुरवितोस त्याबद्दल इथले सदस्य तुलाच धन्यवाद देत असतात. असो.
१. २९ ऑगस्ट 'क्रिडा दिन' साजरा केला जातो हे वर आले आहेच. या दिनाचे आणखीन् एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी भारताचे राष्ट्रपती क्रिडा क्षेत्रातील 'अर्जुन', 'द्रोणाचार्य', 'खेल रत्न' आदी पुरस्कार त्या त्या विजेत्यांना राष्ट्रपती भवनात प्रदान करतात, हे माहीत असणे गरजेचे आहे. [यंदाच्या 'अर्जुन' वीरात आमच्या कोल्हापुरचे दोघे १. जलतरणपटू वीरधवल खाडे आणि २. नेमबाज कु.तेजस्विनी सावंत होते, ही आम्हा करवीरकरांसाठी एक विशेष बाब.]
२. कवि 'बी' यांचा उल्लेख तुम्ही केला आहे. इथे हे सांगणे गरजेचे आहे की 'बी' या टोपणनावाने दोघे लिखाण करीत असत. एक वरील कवि नारायण मुरलीधर गुप्ते तर दुसरे बाळकृष्ण अनंत भिडे. श्री.गुप्ते स्वतःला 'BEE' असे संबोधित तर श्री.भिडे यानी बाळकृष्ण मधील B घेतले होते.


Siddhu Patil Replies:
दिनविशेष माहिती दिल्यामुळे आमच्या ज्ञानात मोलाची भर पडली. अशीच माहिती शक्य असेल तर दररोज देत चला..
सन १८८२ मध्ये इंग्लंड हरल्यानंतर त्या कसोटीत वापरलेल्या बेलची (यष्टिविट्टया ) राख करुन ऑस्ट्रेलियास भेट देण्यात आली. त्यामुळे १८८३ मधले कसोटी सामने 'अ‍ॅशेस' म्हणून संबोधण्यात आले आणि अ‍ॅशेस मालिका सुरु झाली.
'अ‍ॅशेस'
१८८२ च्या कसोटी मालीकेमध्ये इंग्लंड हरल्यानंतर त्या कसोटीत वापरलेल्या यष्टिविट्टया ची राख करुन एका कुपीत भरुन ती कुपी ऑस्ट्रेलियास भेट देण्यात आली. तेव्हापासुन इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधील कसोटी मालीका म्हणजे 'अ‍ॅशेस'.
 

No comments:

Post a Comment