Tuesday, September 6, 2011

दिनविशेष : ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट

मी सुटीवर असल्याकारणाने दिनविशेष देऊ शकलो नाही. त्यामुळे ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट काळातील दिनविशेष देत आहे
११ ऑगस्टः
- प्रसिद्ध विदुषी लेखिका इरावती कर्वे यांचा स्मृतीदिन - यांनी लिहिलेली युगान्त , भोवरा , महाराष्ट्र एक अभ्यास, इ... अनेक पुस्तके गाजली. (१९७०)
- भिंगारकर देशमुखांनी चार हजार रुपयांसाठी इंग्रजांना नगर किल्ल्यात कसे शिरावे, याची माहिती दिली आणि इंग्रजांनी तो किल्ला सहज जिंकला. (१८०३)
- ज्येष्ठ पत्रकार व लेखक वि. स. वाळिंबे यांचा जन्म. (१९२८)
- 'भारत छोडो' आंदोलनाला उग्र रुप. मुंबईत चार ठिकाणी गोळीबार. (१९४२)
- ज्येष्ठ क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचे निधन. (१९९९) - सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी घडवलेला पहिला कसोटी क्रिकेटपटू म्हणून हे ओळखले जात.
१२ ऑगस्ट :
- पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म. (१८७२)
- लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात यांचा जन्म. (१९०६) - लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात हे ’चीफ ऑफ जनरल स्टाफ’ या पदावर होते
- चलेजाव चळवळीत पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार - दोन ठार १६ जखमी (१९४२ )
- सर विठ्ठलदास ठाकरसी यांचे निधन एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ यांच्याच देणगीतून साकार झाले. त्यांनी महर्षी कर्वे यांना यासाठी १५ लाख दिले होते. (१९२२)
- प्रख्यात लेखक आणि वक्ते बाळशास्त्री हरदास यांचा मृत्यु. (१९६८)
- पहिली जागतिक मराठी परिषद सूरु. अध्यक्ष होते कविवर्य कुसूमाग्रज. (१९८९ )
१३ ऑगस्टः
- बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे - यांचा जन्मदिवस (१८९०) - खानदेशातील काळ्या मातीत या अत्भुत कवीरत्नाचा जन्म.
(मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यांचा गौरव होतो. अवघी १० वर्षांची लेखनकारकीर्द आणि अजरामर होण्या एवढे लेखनकौशल्य )
- पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे निधन (१७९५) 
- आचार्य अत्रे (प्रल्हाद केशव अत्रे) यांचा जन्म. (१८९८) - व्यासंगी, प्रभावी लेखक आणि वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमूल्य योगदान, असे हरहुन्नरी प्रतिभावंत.
- साहित्यिक विश्राम बेडेकर यांचा जन्म. (१९०६) - यांच्या रणांगण या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
- ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते. (१९८८)
- नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले. (२००४) अभूतपूर्व आणि अविस्मरणीय घटना
१४ ऑगस्ट:
- मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. (१८६१)
- 'ठणठणपाळ' नावाने प्रसिद्ध लेखक, साहित्यिक व नाटककार जयवंत दळवी यांचा जन्म. (१९२५)
१५ ऑगस्ट:
- भारताचा स्वातंत्र्यदिन मुंबईत दिमाखाने साजरा (१९४७) - हेच चित्र सर्व महाराष्ट्रात होते. सर्वत्र दिवाळीच्या सणासारखे वातावरण होते.
१७ ऑगस्ट - हा थरारक दिवस कोण विसरेल बरे?
- छत्रपति शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कावेबाज पकडीतून आणि त्याच्याच साम्राज्यातून केलेली स्वत:ची आणि बालसंभाजीची यशस्वी आणि थरारक सुटका. (१६६६)
- शिक्षणतज्ज्ञ गुरुवर्य बाबूराव जगताप यांचा जन्म (१८८८) - यांच्याबद्दल दुर्दैवाने मला फारशी माहिती उपलब्ध झाली नाही. ज्यांच्याकडे ही माहिती असेल त्यांनी कृपया द्यावी.
१८ ऑगस्ट:
- पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्म. (१७००) - प्रचंड पराक्रमी असले तरी मस्तानी साठी जास्त (कु)प्रसिद्ध झाले. पण मराठी साम्राज्याच्या पेशवाईची मुहुर्तमेढ याच पेशव्यानी रोवली.
१९ ऑगस्ट :
- सुप्रसिध्द मराठी अभिनेते मास्टर विनायक यांचे निधन (१९४७ )
- पुण्याचे जगप्रसिध्द जादूगार रघुवीर (भोपळे) यांचे निधन. (१९८४)
२० ऑगस्टः
- महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांचा जन्म. (१२२१)
- पेशवाईतील पराक्रमी सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांचे निधन. (१७६७)
२१ ऑगस्ट :
- मुंबईचे राज्यपाल माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी मराठीतून शिक्षण देण्यासाठी जनहितार्थ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था व शाळा स्थापन केली. (१८२२)
- सेवासदन' या संस्थेचे संस्थापक गोपाळकृष्ण देवधर यांचा जन्म. (१८७१)
- महाराष्ट्र्रीय चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्म. (१९१०)
- विष्णू दिगंबर पलूस्कर स्मृतीदिन (१९३१) - महर्षितुल्य , संगीत प्रसारक , गायनाचार्य पंडित म्हणून हे ओळखले जात.
- भारताचे गाजलेले अष्टपैलू क्रिकेटपटू विनू मांकड यांचे निधन. (१९७८)
२२ ऑगस्ट :
- मराठी चित्रपट व नाटयसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुर्यकांत मांढरे यांचे निधन.



सागर ~ या निमित्ताने कित्येक गोष्टींना उजाळा मिळतो, हे या अनोख्या धाग्याचे वैशिष्ठ्य ठरत आहे.
अभिनेते सूर्यकांत यांच्या स्मृतीदिनानिमित्य एक आठवण जागी झाली. इथे तिच्याविषयी थोडेसे लिहिले तर तुम्हाला गैर वाटणार नाही अशी आशा आहे.
पडद्यावर अन्यायाविरूध्द मुठी उंचावून लढणारा रांगडा नायक दाखविणार्‍या या आमच्या कोल्हापुरच्या तितक्याच रांगड्या नायकाला मात्र प्रत्यक्ष जीवनात कोर्टकचेर्‍यांने जेरीस आणले होते. १९८८ च्या आगेमागे सदनिकेसाठी पैसे भरल्यावर बिल्डरने अंतर्गत सजावटीसाठी जवळजवळ दोन लाख श्री.सूर्यकांत यांच्याकडून घेऊन ते हडप केले होते आणि रिकामा फ्लॅट त्याना देऊ केला होता. त्या अन्यायाविरूद्ध संतापून जाऊन ते कोर्टात गेले होते. पण नित्याच्या त्या 'दे तारीख पे तारीख...तारीख पे तारीख' असे करत करत त्याना कोर्टाकडून न्याय मिळायला तब्बल नऊ वर्षे लागली....आणि ज्यावेळी निकाल त्यांच्या बाजूने लागला त्या अगोदर तीन वर्षे त्यांचा मृत्यू झाला होता. [कोल्हापूरात फार चर्चिला गेला होता हा प्रसंग. करवीरकरांचे खूप प्रेम होते चंद्रकांत आणि सूर्यकांत या बंधूंवर ]
Real Life आणि Reel Life मधील हा फरक मन विषण्ण करतो.

धन्यवाद सागर.
का कोण जाणे, माझा असा समज झाला होता की तुम्ही देत असलेल्या 'दिन विशेष' मध्ये अधिकची [किंवा त्या त्या व्यक्तीच्या अप्रकाशित घटनांविषयी] माहिती देणे उचित नसते. पण ज्याअर्थी व्यवस्थापक तसेच धागाकर्ते म्हणजे तुम्ही 'सूर्यकांत' विषयी आक्षेप घेतलेला नाही, त्याअर्थी तशी माहिती देणे गैर नाही.
असो. वर तुम्ही 'गुरुवर्य बाबुराव जगताप' यांच्याबाबत काही माहिती असल्यास द्यावी असे सुचविले आहे. कोल्हापूरातील शैक्षणिक सुधारणाच्याबाबतीत त्यांचाही वाटा होता. मागे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु एम.जी.ताकवले यांना 'गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार' मिळाला त्यावेळी अवॉर्डच्या निमित्ताने श्री.जगताप यांच्या कार्याविषयीही माहिती [जरी अल्प असली तरी] मिळाली होती.
१८९३ मध्ये जन्म झालेल्या बाबुरावानी १९१४ मध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या पदरी बडोद्यात ए.डी.सी. म्हणून सेवेत रूजू झाले. तेथील अनुभवाच्या आधारावर १९१८ मध्ये पुण्यात येऊन त्यानी 'श्री शिवाजी मराठा हायस्कूल' ची स्थापना केली. शिक्षकी पेशात उतरणार्‍या युवकांनी 'बी.एड.' चे शिक्षण घेणे गरजेचे आहे याचा त्यानी सातत्याने पाठपुरावा केला होता. निव्वळ त्याच विषयाला वाहिलेले 'शिक्षक' नावाचे मॅगेझिन त्यानी तब्बल ४० वर्षे चालविले होते. शासनाच्या पाठयपुस्तक मंडळाने पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गांसाठी श्री.जगताप यानी संपादित केलेली पाठयपुस्तके अभ्यासक्रमात लावली होती, हे त्यांचे फार मोठे योगदान होते. पुणे जिल्हा शिक्षण बोर्डाचे ते सलग ५ वर्षे अध्यक्ष होते तर सरकारने 'कोल्हापूर संस्थाना'चे एज्युकेशनल डायरेक्टर म्हणूनही त्यांची नियुक्ती केली होती. त्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील दूरस्थ भागातील मुलांनी 'फ्री बोर्डिंग' मध्ये प्रवेश घेऊन आपली शैक्षणिक उन्नती करावी यासाठी त्यानी प्रचार केला होता. लॉ बोर्डाच्या कमिशनर पदीही त्यांची सरकारने काही काळासाठी नियुक्ती केली होती. १९६२ मध्ये ते पुण्याचे महापौर म्हणून निवडले गेले होते.
१ आक्टोबर १९७८ ला पुण्यात त्यांचे निधन झाले.
पुण्याच्या शुक्रवार पेठेत त्यांचा पुतळाही उभा करण्यात आला आहे.
 
 

No comments:

Post a Comment